Shivraj Rakshe Suspension Kustigir Parishad : महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे (उपांत्य सामना) यांच्यातील कुस्तीचा निकाल वादग्रस्त ठरला होता. याप्रकरणी मल्ल शिवराज राक्षेचं कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबन केलं आहे. मात्र, शिवराज राक्षेचा पंचांच्या निर्णयावरील आक्षेप योग्य होता हे स्पष्ट झालं आहे. दोघांमधील कुस्तीच्या निकालाप्रकरणी कुस्तीगीर परिषदेने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.
दरम्यान, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरलेल्या शिवराजच्या भविष्याबाबत कुस्तीगीर परिषदेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्यावरील बंदी देखील उठवलेली नाही. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांना विचारलं की शिवराज राक्षे पंचांमुळे चितपट झाला, पंच चुकल्यामुळे राक्षेवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटत नाही का? यावर भोंडवे म्हणाले, “याअगोदरही पंचांच्या चुका झाल्या आहेत. कुस्तीच नव्हे तर सर्वच खेळात पंच चुकतात. क्रिकेटमध्येही पंचांच्या चुका होतात. तिथे आपल्याकडे तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा पर्याय असतो. आपण तिसऱ्या पंचांकडे गेलो नाही तर निकाल बदलत नाही.”
चौकशी समितीच्या अहवालातून काय निष्पन्न झालं?
चौकशी समितीचा अहवाल व पंचांवरील कारवाईचा फायदा काय झाला? यातून काय निष्पन्न झालं? असा प्रश्न विचारल्यावर भोंडवे म्हणाले, “शिवराज राक्षेचे प्रशिक्षक काकासाहेब पवार यांनीच मागणी केली होती की पंचांवर कारवाई व्हावी, त्यानुसार चौकशी समितीच्या अहवालानंतर पंचांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या अहवालानंतर आम्ही पैलवान महेंद्र गायकवाडवरील निलंबनाची कारवाई रद्द केली आहे. त्याने आम्हाला पत्र पाठवलं होतं की मैदानात जे काही घडलं ते त्याच्याकडून गैरसमजुतीने घडलं होतं. त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पत्र स्वीकारून त्याच्यावरील कारवाई रद्द केली आणि निलंबन मागे घेतलं. शिवराज राक्षे पत्र पाठवेल तेव्हा त्यावर आम्ही विचार करू. कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बसून चर्चा करेल आणि निर्णय घेईल.”
पंचांच्या चुकीची शिक्षा शिवराज राक्षेने का भोगायची?
यावर माध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलं की ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यानेच माफी मागायची का? त्यावर संदीप भोंडवे म्हणाले, “शिवराज राक्षेवर अन्याय झाला आहे असं म्हणता येणार नाही. कुस्ती असो अथवा आणखी कुठला खेळ, प्रत्येक खेळात माणूस चुकतो, पंच चुकतात. पंच हा काही देव नाही.” यावर भोंडवेंना विचारण्यात आलं की पंचांच्या चुकीची शिक्षा शिवराज राक्षेने का भोगायची? त्यानंतर भोंडवे म्हणाले, “शिवराजने माफी मागावी असं आम्ही म्हणत नाही. त्याने केवळ पत्र पाठवावं, बंदी हटवण्याची मागणी करावी असं आम्ही म्हणत आहोत.”
…तर शिवराज राक्षेवरील बंदी मागे घेऊ : कुस्तीगीर परिषद
संदीप भोंडवे म्हणाले, “शिवराजने पंचांना लाथ मारली, त्याला पंचांना लाथ मारायचा अधिकार नाही. एखाद्याची चूक झाली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. आता यावर कुस्तीगीर परिषदेच्या न्यायालयाने निर्णय घेतला आहे आणि पंचांवर बंदी घातली आहे. शिवराज राक्षेने आम्हाला पत्र दिलं तर आमची कार्यकारिणी बसून चर्चा करेल. त्यानंतर आमच्यात बहुमाताने निर्णय झाला तर त्याच्यावरील बंदी आम्ही मागे घेऊ.”