Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे (उपांत्य सामना) यांच्यातील कुस्तीचा निकाल वादग्रस्त ठरला होता. याप्रकरणी मल्ल शिवराज राक्षेवर कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षे निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, दोघांमधील कुस्तीच्या निकालाप्रकरणी कुस्तीगीर परिषदेने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.
अहिल्यानगरमध्ये २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली होती. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने ही स्पर्धा जिंकत यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र, या स्पर्धेच्या उपांत्य व अंतिम फेरीत काही खेळाडूंचा पंचांबरोबर वाद झाला होता.
शिवराज राक्षेवर तीन वर्षे निलंबनाची कारवाई
पंचांशी बाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. तर, उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे आमने-सामने होते. या सामन्यात ४० सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं होतं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे याने पंचांशी वाद घातला. तसेच त्याने एका पंचाला लाथही घातली होती. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेला देखील तीन वर्षांसाठी निलंबित केलं होतं.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले, “२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती झाली होती. या सामन्यात पंचाच्या निर्णयाने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर १५ दिवस समाजमाध्यमांवर मोठा गोंधळ उडाला. आम्ही हा सर्व प्रकार पाहून विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या कुस्ती सामन्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले होते. २८ फेब्रुवारीला या समितीचा अहवाल मिळाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली. राक्षे विरुद्ध मोहोळ सामन्यात पंचांची चूक आहे, असं अहवालात निदर्शनास आलं. त्यामुळे त्या बैठकीमध्ये आम्ही पंचांवर तीन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.”
कारवाई मागे घेण्यात एका पत्राचा अडथळा
भोंडवे म्हणाले, “महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई आहे. पण एकदा निकाल दिल्यानंतर तो बदलता येत नाही. यामध्ये पृथ्वीराज मोहोळची काही चूक नाही. पण पंचानी काय निर्णय द्यावा, हा त्यांचा निर्णय असतो. महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिले होते. त्याच्यावरील कारवाई आम्ही मागे घेतली आहे. परंतु, शिवराज राक्षेने अशा प्रकारचं पत्र दिलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. त्याने पत्र दिलं तर आम्ही निश्चितच सगळे सदस्य बसून कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करू.