मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे निमंत्रित मंत्री, बहुसंख्य आमदार, कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी अशा सर्वानी पाठच फिरवली. त्यामुळे ऐनवेळी अन्य पाहुणे ठरवून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अपवाद वगळला तर गतवेळचे हिंदू केसरी, महाराष्ट्र केसरी विजेतेही अनुपस्थित होते.
शहरातील वाडिया पार्क क्रीडासंकुलात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ व कै. पै. छबुराव लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘कै. पै. छबुराव लांडगे क्रीडानगरीत’ गुरुवारी सायंकाळी ५८व्या महाराष्ट्र केसरी किताब लढत २०१४ चे उद्घाटन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. आ. शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पत्रकार नीलेश खरे, माजी आमदार भीमराव धोंडे, अभय आगरकर, स्वागताध्यक्ष दादा कळमकर, महाराष्ट्र केसरी योगेश दोडके, सईद चाऊस, अशोक शिर्के आदी उपस्थित होते. प्रारंभी हनुमान, छत्रपती शिवाजीमहाराज व कै. छबुराव लांडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी गांधी म्हणाले, तालीम संघाने पुढील वर्षी नगरमध्ये कुस्तीच्या राष्ट्रीय लढती आयोजित कराव्यात, त्यासाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडून मदत मिळवून देऊ. कुस्तीगिरांना नोकरी देण्यासाठी सरकार, खासगी कंपन्या व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन गांधी यांनी केले. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी प्रत्येक जिल्हय़ाने मॅटवरील प्रशिक्षण केंद्र उभारावे, त्यासाठी परिषद मॅट व प्रशिक्षक देईल, आतापर्यंत २१ जिल्हय़ांत प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत, त्यांना ८० मॅट देण्यात आली आहेत, अशी माहिती दिली. मानाचा किताब मिळवल्यानंतर मल्लांनी केवळ सत्कार घेत फिरू नये, विजेता जर राष्ट्रीय स्पर्धेत खेळला नाहीतर त्याच्यावर बंदी घातली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.
तरुणांनी कुस्ती केवळ छंद म्हणून नाहीतर व्यवसाय म्हणून जोपासावा, असे आवाहन पाचपुते यांनी केले. नीलेश खरे, स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आदींची भाषणे झाली. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे व फिरोदिया यांनी स्वागत केले. या वेळी परिषद, संघाचे पदाधिकारी तसेच कुस्ती रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अॅड. अभिषेक भगत यांनी आभार मानले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
उत्साहाचा अभाव
उद्घाटन कार्यक्रमात उत्साहसुद्धा नव्हता. त्याची जाणीव करून देत व स्पर्धा नगरच्या वैभवात भर टाकणाऱ्या आहेत, असे आवाहन करत गांधी यांनी नगरकरांना टाळय़ा वाजवण्याचे आवाहन केले, तेव्हाच कोठे टाळय़ा वाजल्या. त्यापूर्वी आणि नंतरही कोठे टाळीचा आवाज झाला नाही. वक्त्यांची भाषणेही त्यादृष्टीने झाली नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा