तब्बल ३५ वर्षांनंतर नगरला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांना उद्यापासून (गुरुवार) येथील कै. पै. छबुराव लांडगे क्रीडानगरीत (वाडिया पार्क क्रीडा संकुल) प्रारंभ होत आहे. राज्यातील ४४ जिल्ह्य़ांच्या संघातील मल्ल मंगळवारीच येथे दाखल झाले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा तालीम संघ व कै. पै. छबुराव लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या मैदानाला नगरचे जुन्या पिढीतील नामांकित पहिलवान कै. छबुराव लांडगे क्रीडानगरी असे नाव देण्यात आले आहे. फोर्स मोटर्स मुख्य प्रायोजक आहेत. महाराष्ट्र केसरी पदासाठी चांदीची गदा व १ लाख रुपये तर उपविजेत्यासाठी ५१ हजार रुपये अशी पारितोषिके आहेत.
राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्य़ांच्या संघातील मल्ल मंगळवारी नगरमध्ये दाखल झाले. त्यांचे आज वजन करून घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. उद्या सकाळी ९.३० वाजता प्राथमिक गटातील कुस्त्यांना प्रारंभ होणार होणार असून सायंकाळी ५ वाजता तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, राष्ट्रीय जलसंधारण समितीचे सदस्य पोपटराव पवार, आमदार शिवाजी कर्डिले आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम व स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून कुस्तीप्रेमी नगरकरांच्या मदतीने ही स्पर्धा भव्यदिव्य होईल, असा विश्वास जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी व्यक्त केला.
स्पर्धेसाठी मॅटचे २ व मातीचा १ असे १५० फूट गुणिले ५० फूट आकाराचे तीन आखाडे तयार करण्यात आले आहेत. ५७ व ६५ किलो वजन गटातील लढतींना गुरुवारी सकाळी सुरुवात होणार आहे. तीन दिवस वेगवेगळ्या वजनगटातील मल्लांच्या लढती होतील. रविवारी (दि. २८) सायंकाळी महाराष्ट्र केसरी या मुख्य इनामी लढतीसाठी कुस्ती सुरू होईल. स्पर्धेत मॅट व माती अशा दोन्ही प्रकारांत लढती होणार असल्या तरी इनामी लढत मॅटवरच होणार आहे. लढती पाहण्यासाठी साइड स्क्रीनही उभारण्यात आले आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा