ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये गोंधळ घालून गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. या आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे. या आमदारांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबित केलं आहे. केंद्राकडून ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी इमपेरिकल डेटा घेण्याबाबतचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर होताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन अनेक आमदार वेलमध्ये उतरले.
आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीचे भान ठेवतात आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेलं. त्यानंतर थोडावेळ कामकाज तहकूब करण्यात आलं. मात्र राजदंड पळवण्यावरुन सुरु झालेल्या गोंधळातून नंतर अध्यक्षांच्या दालनाबाहेर धक्काबुक्कीही झाली. याच साऱ्या गोंधळानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर १२ आमदारांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. जाधव यांनी सविस्तरपणे आपली बाजू सभागृहासमोर मांडली.
नक्की वाचा >> समजून घ्या : राजदंड म्हणजे काय? सभागृहाच्या कामाकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?
“मी मगाशी फडणविसांना म्हटलं की ‘आवरा’. त्यावर…”
“मी विरोधकांना बोलू दिलं, पण जेव्हा मंत्री बोलणार तेव्हा त्यांनाही बोलू द्या अस फडणवीस यांना सांगितलं होतं. प्रस्ताव वाचा मग भाष्य करा असंगही मी सांगितलं होतं. भुजबळांनी प्रस्ताव वाचला आणि त्यांनी एक एक मुद्द्याचं स्पष्टीकरण दिलं. विरोधक म्हणाले राजकीय परतावा आहे पण तो राजकीय कसा नाही हे व्यवस्थित भुजबळांनी सांगितलं. त्यावर विरोधकांना मुद्दे उपस्थित कारायला हवे होते. मला खोटं बोलायला आणि दिलेली वेळ टाळायला आवडत नाही,” असं भास्कर जाधवांनी सांगितलं. “मी मगाशी फडणविसांना म्हटलं की ‘आवरा’. त्यावर फडणवीसांना, “नाही आवरणार, मी रागावलोय” असं उत्तर दिलं. फक्त आशिष शेलारांनी माझी ओरडून माफी मागितली. भास्करराव जाऊ द्या ना… असं शेलार म्हणाले होते,” असंही भास्कर जाधवांनी निलंबनाची कारवाई करताना सांगितलं.
सभागृहाबाहेर केबिनमध्ये नक्की काय घडलं?
त्यानंतर पुढे बोलताना, कदाचित वॉक आऊट करणं हा त्यांच्या योजनेचा भाग असेल असंही जाधव म्हणाले. सभागृह तहकूब झाल्यानंतर काय घडलं हे सुद्धा जाधव यांनी सांगितलं. “वॉक आऊट करताना व्यासपीठावर काही सदस्य आले आणि माझा माईक ओढण्याचा प्रयत्न केला, राजदंड पाळवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना नेम करणार म्हणालो. नंतर सभागृह तहकूब झाल्यावर मी अध्यक्ष केबिनमध्ये अध्यक्ष खुर्चीवर नाही बसलो. मग फडणवीस रागावले होते. ते केबिनमध्ये आले. पण ते स्वतः शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. फडणवीसांच्या मागून काही सदस्य माझ्या आई बहिणीवरुन शिव्या देत केबिनमध्ये घुसले होते. काही लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर तुटून पडले. पण तुम्हाला राग आहे तर मग भास्कर जाधव ला राग कमी आहे काय? असे मी फडणवीसांना बोललो. तुम्ही सर्व असाल तर मी एकटा आहे. मी पाठ दाखवणार नाही असे बोललो,” असं जाधव यांनी सभागृह तहकूब झाल्यानंतरच्या घडामोडींबद्दल बोलताना सांगितलं.
नक्की वाचा >> …तेव्हा भास्कर जाधव, फडणवीस आणि नरहरी जिरवाळही झालेले निलंबित
“मी चूक केली असेल तर…”
“सभागृहातील लांच्छनास्पद परिस्थिती का निर्माण करण्यात आली?, इतका का राग यायला हवा?,” असे प्रश्न भास्कर जाधव यांनी भाजपाला विचारले. तसेच पुढे बोलताना, “आदेश वजा सूचना आहे की याचा योग्य निर्णय व्हायला हवा होता. आपण काय करत आहात. सिसिटीव्हीमध्ये आहे, असे मी चंद्रकांतदादांना बोललो. मी एकही चुकीचा शब्द चुकीचा बोललो नाही. जर मी चूक केली असेल तर मी पण शिक्षेला तयार आहे. पण आजचा दिवस हा काळा दिवस आहे. माझ्याबाबत हे घडले आहे ते तसेच आज ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात घडलेली गोष्ट निंदनीय आहे. इथून बाहेर गेल्यावर आपण सर्वच मित्र असतो, मी माझा निर्णय दिलाय. आता सरकारने निर्णय घ्यावा,” असं भास्कर जाधव म्हणाले.