पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे. पहिल्या दिवसाचे पिठासीन अध्यक्ष भास्कर जाधव आणि काँग्रेसचे आमदार तसेच माजी मुख्यमंत्री यांनी भाजपाने भरवलेली प्रतिविधानसभा ही सभागृहाचा अपमान असल्याचं सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नरहरी जिरवाळ यांनी प्रतिविधानसभेमधील माईक जप्त करण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> …म्हणून भास्कर जाधवांच्या आदेशानंतर मार्शल्सने रवी राणांना सभागृहाबाहेर काढलं

भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर उपस्थित केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिविधानसभा भरवणं हा सभागृहाचा अपमान असून हा सर्व काय प्रकार सुरु आहे असा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच हे प्रतिविधानसभा भरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे असं मत व्यक्त करतानाच ही प्रतिविधानसभा सुरु राहणार असेल तर आपण आपलं कामकाज बंद करुयात, अशा शब्दांमध्ये चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. कारवाई होणार असेल तर तोपर्यंत सभागृहाचं कामकाज थांबवण्याचं मतही चव्हाण यांनी नोंदवलं. त्याचप्रमाणे एका वृत्तवाहिनीवर सुरु असणारं प्रतिविधानसभेचं लाइव्ह प्रक्षेपण थांबवण्याची मागणीही चव्हाण यांनी केली. या प्रतिविधानसभेसमोर कॅमेरा आणि सर्व यंत्रणा असून त्याचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जात असल्याचा मुद्दा मांडत चव्हाण यांनी या थेट प्रक्षेपणावरही आक्षेप घेतला.

या आक्षेपानंतर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. अभिरुप सभागृहाजवळ विधानभवनाच्या मार्शल्सने मीडियाला दूर केलं तर भाजपा आक्रमक झाली. त्यानंतर भाजपाने मीडिया स्टँडजवळ जात आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला.

नक्की वाचा >> कृषी कायद्यांमध्ये कोणते बदल आवश्यक वाटतात?, ठाकरे सरकार सर्वसामान्यांकडून सल्ले मागवणार

“सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विधानसभेत काळा अध्याय लिहिला गेलाय. खोटे आरोप लावून आमच्या १२ जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. शांतपणे प्रतिअधिवेशन सुरू होते. मार्शल्स पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही करण्यात आली. आमचं अधिवेशन चालणार पण पत्रकारांना हाकलत असतील तर प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार. लोकशाहीच्या दोन्ही सभांना कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करतंय. आम्ही आता पत्रकार कक्षात प्रतिअधिवेशन भरणार,” असं फडणवीस म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून विधानसभेत सोमवारी मोठा गदरोळ झाला. या गदारोळानंतर भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. या कारवाईचे आज सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. त्याचबरोबर विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला असून, भाजपाच्या प्रतिविधानसभेवर विधानसभेत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, अध्यक्षांनी तसे आदेश दिले आहेत.