महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सोमवारी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसींच्या) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पहायला मिळात आहेत. सोमवारी अध्यक्षांच्या दालनाबाहेर झालेल्या गोंधळाचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातील भाजपाच्या सदस्यांकडून काल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धमकावण्यात आल्याचा आरोप केलाय. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही बदल्याचं राजकारण झालं नाही. मात्र कालच भाजपाच्या एका सदस्याने भास्कर जाधवांना अनिल देशमुख करण्याची आणि भुजबळ करण्याची धमकी दिल्याचं पटोले म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाबाहेर प्रतीसभागृह भरवलं असताना सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाकडून गंभीर मुद्दे मांडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. “२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी खासदार होतो, त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पण माझा फोन टॅप केला आणि माझं नाव ठेवलं गेलं अमजद खान”, असं पटोले सभागृहात म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी हा सर्व प्रकार पुणे पोलिस कश्मिशनच्या माध्यमातून करण्यात आला. हे कोणाच्या आदेशाने झालं हे समोर आलं पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली. सध्या भाजपाचे खासदार असणाऱ्या रावसाहेब दानवेंपासून ते माजी खासदार संजय काकडेंपर्यंत अनेकांचे नंबर टॅप करण्यात आल्याचा आरोप पटोलेंनी केला.

नक्की वाचा >> …म्हणून भास्कर जाधवांच्या आदेशानंतर मार्शल्सने रवी राणांना सभागृहाबाहेर काढलं

पुढे बोलताना भाजपावर निशाणा साधत त्यांनी भाजपाचं राजकारण हे गुंड प्रवृत्ती आणि राडा करणाऱ्या प्रवृत्तीचं असल्याचा आरोप पटोलेंनी केला. इतर राज्यांमध्ये बदल्याचं राजकारण होत असेल तर महाराष्ट्रात असं राजकारण कधी झालं नाही. काल आपल्या दालनामध्ये झालेला गोंधळानंतर एक सदस्य भास्कर जाधवांना सांगत होते की, तुम्ही बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करुन टाकू. बाहेरही सांगताना भुजबळ करुन टाकू अशी धमकी या सभागृहामध्ये दिली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. पुण्यातील कलादिग्दर्शक राजू सापते यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्या प्रकरणाचाही भाजपा आमदाराशी संबंध असल्याचा आरोप पटोले यांनी केला. राजू सापते प्रकरणामध्ये ज्या संघटनेची व्यक्ती पकडली गेली, त्या संघटनेचा अध्यक्ष भाजपाचा आमदार आहे. त्यांचं नाव देखील समोर आलं पाहिजे, असं पटोले म्हणाले.

नक्की वाचा >> १२ द्या, १२ घ्या… आमदार निलंबनावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये होणार का ‘ते’ डील?

भास्कर जाधवांची सुरक्षा वाढवणार

पटोले यांनी मांडलेल्या प्रश्नांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तरं दिली. मागील काळात करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सभागृहाला त्याची माहिती देण्यात येईल, असं वळसे पाटील म्हणाले. त्याचबरोबर भास्कर जाधवांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली जाईल, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

भास्कर जाधवांनी सांगितलं नक्की काय घडलं

काल विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या गोंधळानंतर कामकाज सुरु झाल्यावर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली. त्यावेळी जाधव यांनी सविस्तरपणे आपली बाजू सभागृहासमोर मांडली आणि काय घडलं हे सांगितलं.

नक्की वाचा >> भाजपाने भरवली प्रतिविधानसभा; अध्यक्षांच्या आदेशाने कारवाई झाल्यानंतर भाजपा आक्रमक

“मी मगाशी फडणविसांना म्हटलं की ‘आवरा’. त्यावर…”

“मी विरोधकांना बोलू दिलं, पण जेव्हा मंत्री बोलणार तेव्हा त्यांनाही बोलू द्या अस फडणवीस यांना सांगितलं होतं. प्रस्ताव वाचा मग भाष्य करा असंगही मी सांगितलं होतं. भुजबळांनी प्रस्ताव वाचला आणि त्यांनी एक एक मुद्द्याचं स्पष्टीकरण दिलं. विरोधक म्हणाले राजकीय परतावा आहे पण तो राजकीय कसा नाही हे व्यवस्थित भुजबळांनी सांगितलं. त्यावर विरोधकांना मुद्दे उपस्थित कारायला हवे होते. मला खोटं बोलायला आणि दिलेली वेळ टाळायला आवडत नाही,” असं भास्कर जाधवांनी सांगितलं. “मी मगाशी फडणविसांना म्हटलं की ‘आवरा’. त्यावर फडणवीसांना, “नाही आवरणार, मी रागावलोय” असं उत्तर दिलं. फक्त आशिष शेलारांनी माझी ओरडून माफी मागितली. भास्करराव जाऊ द्या ना… असं शेलार म्हणाले होते,” असंही भास्कर जाधवांनी निलंबनाची कारवाई करताना सांगितलं.

सभागृहाबाहेर केबिनमध्ये नक्की काय घडलं?

त्यानंतर पुढे बोलताना, कदाचित वॉक आऊट करणं हा त्यांच्या योजनेचा भाग असेल असंही जाधव म्हणाले. सभागृह तहकूब झाल्यानंतर काय घडलं हे सुद्धा जाधव यांनी सांगितलं.  “वॉक आऊट करताना व्यासपीठावर काही सदस्य आले आणि माझा माईक ओढण्याचा प्रयत्न केला, राजदंड पाळवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना नेम करणार म्हणालो. नंतर सभागृह तहकूब झाल्यावर मी अध्यक्ष केबिनमध्ये अध्यक्ष खुर्चीवर नाही बसलो. मग फडणवीस रागावले होते. ते केबिनमध्ये आले. पण ते स्वतः शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. फडणवीसांच्या मागून काही सदस्य माझ्या आई बहिणीवरुन शिव्या देत केबिनमध्ये घुसले होते. काही लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर तुटून पडले. पण तुम्हाला राग आहे तर मग भास्कर जाधव ला राग कमी आहे काय? असे मी फडणवीसांना बोललो. तुम्ही सर्व असाल तर मी एकटा आहे. मी पाठ दाखवणार नाही असे बोललो,” असं जाधव यांनी सभागृह तहकूब झाल्यानंतरच्या घडामोडींबद्दल बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> …तेव्हा भास्कर जाधव, फडणवीस आणि नरहरी जिरवाळही झालेले निलंबित

“मी चूक केली असेल तर…”

“सभागृहातील लांच्छनास्पद परिस्थिती का निर्माण करण्यात आली?, इतका का राग यायला हवा?,” असे प्रश्न भास्कर जाधव यांनी भाजपाला विचारले. तसेच पुढे बोलताना, “आदेश वजा सूचना आहे की याचा योग्य निर्णय व्हायला हवा होता. आपण काय करत आहात. सिसिटीव्हीमध्ये आहे, असे मी चंद्रकांतदादांना बोललो. मी एकही चुकीचा शब्द चुकीचा बोललो नाही. जर मी चूक केली असेल तर मी पण शिक्षेला तयार आहे. पण आजचा दिवस हा काळा दिवस आहे. माझ्याबाबत हे घडले आहे ते तसेच आज ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात घडलेली गोष्ट निंदनीय आहे. इथून बाहेर गेल्यावर आपण सर्वच मित्र असतो, मी माझा निर्णय दिलाय. आता सरकारने निर्णय घ्यावा,” असं भास्कर जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra legislative assembly and council session 2021 updates nana patole slams bjp scsg