कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मिळून बनलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत यांना अधिकृतपणे पाठिंबा दिलेल्या पक्षांव्यतिरिक्त अपेक्षेनुसार भाजपचीही साथ मिळाल्यामुळे विजयाचा झेंडा रोवणे सहज शक्य झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. भाजपने मात्र शिवसेनेशी युती असल्याचे सांगत सेनेचे उमेदवार राजीव साबळे यांना मतदान करण्याचे जाहीर केले होते. पण सर्व प्रमुख पक्षांचे बलाबल पाहता सुमारे तीनशेपेक्षा जास्त मतांनी विजयी झालेल्या अनिकेतना भाजपचीही मते लक्षणीय प्रमाणात मिळाल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीसाठी असलेल्या ९४० मतदारांपैकी सर्वात जास्त शिवसेनेचे (२९३) होते. त्या खालोखाल राष्ट्रवादी (१७४), भाजप (१६४), महाराष्ट्र स्वाभिमान (९८), शेकाप (९२), काँग्रेस (६९),  रिपब्लिकन (२४), मनसे (१२) आणि इतर (१४) असे बलाबल होते. यापैकी अधिकृत भूमिकेनुसार भाजपच्या मतदारांनी सेनेच्या उमेदवाराला मते दिली असती तर साबळे यांना ४५७ मते पडणे आवश्यक होते. प्रत्यक्षात त्यांना फक्त ३०६ मते पडली. याचा अर्थ सेनेच्या मतांमध्ये केवळ १३ इतर मतांची भर पडली आणि राष्ट्रवादीसह जाहीरपणे पाठिंबा दिलेल्या पक्षांची मिळून ४४५मते मिळणे अपेक्षित असलेल्या अनिकेत तटकरेंनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत तब्बल ६२० मते मिळवली.

रिपब्लिकन आणि इतर सदस्यांचीही सर्व मते त्यांनाच मिळाली, असे मानले तरीही ही बेरीज ४८३ पर्यंतच पोचली असती आणि निसटत्या विजयावर त्यांना समाधान मानावे लागले असते. पण मतदानाची आकडेवारी वेगळेच चित्र दाखवत असून भाजपच्या छुप्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालेले नाही.

केंद्र आणि राज्याच्या सत्तेमध्ये ‘धाकटा भाऊ’ असलेल्या सेनेला जागा दाखवण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचे गेल्या साडेतीन-चार वर्षांत सातत्याने दिसून आले आहे. फक्त त्यासाठी काहीतरी निमित्त शोधले जाते. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्याचा भाजपचा प्रस्ताव सेनेने झिडकारल्याचे शल्य होतेच. त्यात भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे होत असलेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना सेनेने उमेदवारी देत जखमेवर मीठ चोळले. त्यामुळे भडकलेल्या भाजप नेत्यांनी लगेच या निवडणुकीत सेनेला झटका देत वचपा काढला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीने संधी मिळेल तेव्हा एकत्र येत सेनेला एकाकी पाडले आहे.

त्याचीच याही निवडणुकीत पुनरावृत्ती झाली आहे आणि कन्येला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवल्यानंतर आता चिरंजीवांना विधान परिषदेत विनासायास प्रवेश मिळवून देत सुनील तटकरे यांनी पुढच्या पिढीचे राजकीय बस्तान नीट बसवले आहे.