मुंबई : प्रसिद्धीमाध्यमांनी विरोधकांचे काम करू नये. मी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतेही ‘शीतयुद्ध’ नसून प्रसिद्धीमाध्यमांनी आमच्यामध्ये भांडणे लावणे चुकीचे असल्याचे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. तर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या अदलाबदलीचे आमच्यात ‘अंडरस्टँडिंग’ असल्याचे शिंदे यांनी मिश्कीलपणे पत्रकारांना सांगितले. महायुतीमध्ये सर्व पक्षांचे नेते एकत्र असून विरोधकांमध्ये मात्र फाटाफूट आहे. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल आणि विधिमंडळात चर्चेची पूर्ण संधी देवून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळ अधिवेशनपूर्व पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी महायुतीतील भांडणांच्या बातम्या, विरोधकांचे आरोप, अर्थसंकल्प व अन्य बाबींविषयी सविस्तरपणे भूमिका मांडली.

धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे यांना तूर्त संरक्षण ?

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप झाल्याने व माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत विचारता फडणवीस म्हणाले, मुंडे यांच्याबाबत सरकारची भूमिका आधीच जाहीर केली आहे. तर कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून निकाल प्रलंबित आहे. त्यांना दोषी ठरविण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयालाही सत्र किंवा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तर त्यांच्या राजीमान्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतरच निर्णय घेतला जाईल. सुनील केदार किंवा अन्य मंत्र्यांबाबतही तत्काळ निर्णय झाला नव्हता, असे फडणवीस यांनी सांगितले.

सापत्न वागणूक दिल्याचा आरोप

● तीन बाजूला तीन तोंड असणारे विसंवादी असे महायुतीचे सरकार असून जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सातत्याने विरोधी पक्षाला सापत्न वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे ‘मविआ’च्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

● कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा होऊनही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यास विलंब लावण्यात आला आहे. तसेच पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर बलात्काराच्या घटनेवर असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या योजना सुरूच राहणार

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’सह महत्त्वाच्या व लोकप्रिय योजना सुरूच राहणार असून त्या योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार सुरू असून त्यात कोणतेही तथ्य नाही. कोणत्याही महत्त्वाच्या योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. योजनेतील अटींनुसार केवळ लाभार्थींच्या तपासणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांबरोबर अंडरस्टँडिंग

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होतो व फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होते. पण आता आमच्या खुर्च्या बदलल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची मात्र कायम आहे. माझे व फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबदलीचे ‘अंडरस्टँडिंग ’ असल्याचे शिंदे यांनी मिश्कीलपणे सांगितल्यावर हंशा पिकला. मी माझी खुर्ची कायम राखू शकलो, तुम्ही राखू शकला नाहीत, तर मी काय करणार, अशी ‘मार्मिक’ टिप्पणी पवार यांनी केल्यावर फडणवीस यांच्यासह सर्वांनाच हसू आवरणे कठीण झाले.

Story img Loader