विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या ५३ आमदारांमध्ये शिंदे गटातील ३९ आणि उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या १४ आमदारांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख नाही.
विश्लेषण: शिंदे गटाने आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंचं नाव का नाही?
राज्यपालांच्या निर्देशानुसार, ३ जुलैला विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली, तर ४ जुलैला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गटाने भाजपाच्या बाजूने तर उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं होतं. यानंतर दोन्ही गटांकडून व्हिपचं उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर द्यावं लागणार आहे.
आदित्य ठाकरेंना का वगळलं आहे?
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली होती. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं होतं. भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना “बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही”, असं सांगितलं होतं.
भाजपाचे राहुल नार्वेकर अध्यक्षपदी
३ जुलैला झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजापचे अॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. या निवडणुकीत नार्वेकर यांना १६४ मतं मिळाल्याने राज्यातील सत्तानाटय़ात शिवसेनाअंतर्गत सुरू असलेल्या सत्तासंघर्षांत भाजपा व शिंदे गटाने बाजी मारीत पहिला अंक जिंकला.
आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना १६४, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तीन आमदार तटस्थ राहिले. निवडणुकीत १० आमदार गैरहजर होते.
दरम्यान ४ जुलैला शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी कऱण्यात आली. यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.