Maharashtra Politics Crisis Updates : मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषधेच्या शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच कारणामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. तर सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी विचारणा केल्यास आम्ही विचार करू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे कागलमधील निवासस्थान तसेच पुण्यातील कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. परिणामी राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. यासह राज्य, देश तसेच जगभरातील महत्वाच्या घडामोडींची आढावा एका क्लिकवर
Mumbai Maharashtra News Updates : राज्य, देश तसेज जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढाव एका क्लिकवर.
बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने महोत्सवाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर टीका करतात. त्यांनी प्रथम आपले घर वाचवावे. त्यांचे घर कच्चे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली.
सध्या बेस्ट उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. दुमजली बसची एकूण प्रवासी क्षमता ७६ इतकी आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मदतीला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने धाव घेतली आहे. बेस्ट उपक्रमाने दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात आज दिली.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना गणेश विसर्जन दिनी विकत घेण्याचा प्रयत्न फसला, म्हणून त्यांच्याविरुद्ध ‘ईडी’ची कारवाई करण्यात आल्याचा गौप्यस्फोट वजा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला पार पडलेल्या जिजाऊ जयंती महोत्सव निमित्त संध्याकाळी जिजाऊ सृष्टीवर आयोजित मुख्य सोहळ्याला मिटकरी यांनी हजेरी लावली.
समाजात विविध मार्गाने सेवा करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. सेवेने आत्मीयता वाढत असते आणि ती आत्मीयतेमुळेच होऊ शकते. त्यामुळे सेवा ही फॅशनसाठी किंवा गुणवत्ता मिळविण्यासाठी करू नये असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
पश्चिम विदर्भात कापसाच्या भावात चढउतार होत आहेत. कापसाची मोठी बाजारपेठ असलेल्या अकोटमध्ये सुमारे साडेआठ ते नऊ हजारापर्यंतचा दर सध्या मिळत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भासह मध्य प्रदेशातील उत्पादकांनी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी धाव घेतली.
राज्यात गेली अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप यांनी एकत्रित राजकारण केले. २०१९ मध्ये राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला असता शरद पवार यांच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमध्ये शिवसेना हा नवा घटक सहभागी होऊन ‘मविआ’ या नव्या आघाडीकडून शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
कल्याण मधील मलंगगड परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जून मधील शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून माजी नगरसेवक महेश गायकवाड चार महिन्यांपासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
टिळक पत्रकार भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा. श्याम मानव यांनी तीन दिवसांपूर्वी पोलिसांना तक्रार दिल्यावरही कारवाई केली नसल्याकडे लक्ष वेधले. प्रा. मानव म्हणाले, २६ वर्षीय धीरेंद्र कृष्ण, बागेश्वर धाम, जिल्हा छत्तरपूर मध्यप्रदेश यांनी रेशीमबागच्या दिव्य दरबारात विविध ‘चमत्कारिक दाव्यासंबंधी’ कार्यक्रम जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ‘ड्रग अँड मॅजिक रेमेडिज ॲक्ट’ १९५४ कायद्यानुसार गुन्हा ठरतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगव्या ध्वजाशिवाय कोणीही आदर्श नाही. परंतु बाल स्वयंसेवकांना देश कार्यासाठी प्रेरणा मिळायला हवी म्हणून रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही आदर्श मानतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमराजने १५ वर्षांपूर्वी गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला १३ वर्षांचा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी पती-पत्नीमधील घरगुती वादातून पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दोघेही वेगळे राहत होते.
मुलांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या घराण्यांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय बेबनावात आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घराण्याची भर पडली आहे.
महिलेला अर्धवेळ नोकरी देण्याचे आमिष दाखवून बँक खात्यातून लुटलेले साडेसात लाख रूपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. गेल्या सहा महिन्यांत सायबर पोलिसांनी १९३० क्रमांकाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहूून अधिकची रक्कम वाचवली आहे.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ मध्यरात्री एमएनजीएलच्या गॅस वाहिनीतून गळती होऊन आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
डोंबिवली पश्चिमेतील बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम केंद्रात एका ग्राहकाची भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. अदलाबदल करत असताना ग्राहकाला बोलण्यात गुंतवून ग्राहकाच्या बँक खात्यामधील रकमेतील २५ हजार रुपये एटीएमच्या माध्यमातून काढून फसवणूक केली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहे.
पुणे : सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात मध्यरात्री एका भंगार मालाच्या गोदामाला आग लागली. आगीत गोदामातील प्लास्टिक साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
नवी मुंबईच्या खाडी किनारी असलेल्या विस्तीर्ण कांदळवनात लागणाऱ्या आगीचे सत्र पुन्हा सुरु झाले की काय? अशी शंका पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान सानपाडा मोराज सर्कल लगत असलेल्या कांदळवनात आग लागली होती.
ट्विटर, मेटा या जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता अॅमेझॉन कंपनीतही मोठी कर्मचारी केली जात आहे. या कर्मचारी कपातीची अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जासी यांनी पुष्टी केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण १८००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. भारतातही या प्रक्रियेस सुरुवात झाली असून मिळालेल्या माहितीनुसार भारतात एकूण १००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. वाचा सविस्तर
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामी विवेकानंद यांच्याशी तुलना केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे, असे सौमित्र खान म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. वाचा सविस्तर
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात खाजगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला असून या १० जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, किरीट सोमय्या पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार आहेत. मागील वेळी किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे सोमय्या यांनी मुश्रीफ यांना यावेळी मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान दिले आहे. वाचा सविस्तर
राज्य देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर