करोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यांमधील काही भागात निर्बंध कमी करत दिलासा देण्यात आला आहे. नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना काही ठिकाणी मात्र वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्याने नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“रविवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्णसंख्यात जास्त झाल्याचं दिसत आहे. आपण सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढत आहे. संख्या जर अजून वाढली तर अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसातील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
Maharashtra Relaxing Lockdown Rules : निर्बंधमुक्तीच्या दिशेने..
करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण, खाटांची उपलब्धता आणि संसर्गदर या आधारे दर आठवडय़ाला निर्बंध शिथिलीकरणाचे निकष बदलण्यात येतात. सोमवारपासून २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध पूर्णपणे शिथिल होतील किंवा ते अंशत: शिथिल होतील. मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्याने निर्बंध कमी होणे अपेक्षित होते, पण गर्दी टाळण्यासाठी तसेच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्या स्तरातच ठेवण्यात आले. परिणामी, गेल्या आठवडय़ाप्रमाणेच मुंबईत निर्बंध कायम राहतील आणि दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने आज, सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
आठ जिल्ह्य़ांमध्ये दुकाने ४ पर्यंत
ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील. गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वासाठी रेल्वे सेवा नाही..
मुंबई शहराचा तिसऱ्या स्तरात समावेश करण्यात आल्याने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करता येईल. सर्वसामान्यांना या आठवडय़ात रेल्वे सेवेचा वापर करता येणार नाही. रुग्णसंख्या आणखी कमी होईपर्यंत या महिन्यात तरी सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्याची मुभा दिली जाणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
कोकण, प. महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती
– रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त, चौथ्या स्तरात समावेश.
– या जिल्ह्य़ांमध्ये सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू असेल, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव.
– शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच.
– संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास.