दुकानं सुरू करण्यावरून कोल्हापूर शहरामध्ये सोमवारी सकाळी व्यापारी व प्रशासनामध्ये संघर्ष झाला. दुकानं सुरू करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. कोल्हापूर शहरातील करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने लॉकडाउनचे निर्बंध कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय काल प्रशासनाने घेतला होता.
गेले दोन आठवडे व्यापारी व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी लढा देत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी दुकानांसमोर उभे राहून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले होते. तर गेले दोन दिवस व्यापाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. त्यामध्ये काही झाले तरी सोमवारपासून व्यापार सुरू केला जाणारच असा निर्धार व्यापाऱ्यांनी केला होता. या मागणीसाठी आज व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.
नक्की पाहा >> Photos: इचलकरंजीत दुकाने सुरु मग कोल्हापूरात बंदीची जबरदस्ती का?; व्यापारी उतरले रस्त्यावर
सोमवारी सकाळपासून दुकानं सुरू करण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. साफसफाई केली जात होती. त्यावर पोलीस आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून दुकानं सुरू करू नका, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा सांगत असह्य जगणे सुरू आहे. आता व्यापार सुरू करणारच अशी भूमिका घेतली. प्रशासनाने करोनाची साथ असल्याने संयम राखावा, असे आवाहन केले. त्यावर ही साथ संपणार तरी कधी, असा प्रतिसवाल व्यापाऱ्यांनी केला. यातून प्रशासन व व्यापारी यांच्यातील वाद वाढत राहिला. या बाबी लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर व्यापार सुरू करण्याच्या भूमिकेवर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या उद्योगनगरी इचलकरंजीतील सर्व दुकाने सोमवारी सुरू झाली. करोना नियमाचे पालन करून इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली आहेत. जीवनमरणाचा प्रश्न बनल्यामुळे व्यापारी वर्गाने दुकाने उघडली आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. इचलकरंजीतील व्यापारी वर्गाने एकजूट होऊन एकीचे दर्शन घडवले आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. ‘इनाम’प्रणित इचलकरंजी व्यापारी असोसिएशनला सर्व व्यापारी संघटनांचा पाठिंबा दिला आहे.
आजपासून राज्यात कठोर निर्बंध
संभाव्य तिसरी लाट आणि करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका (डेल्टा प्लस) यामुळे राज्यात आजपासून निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. दुकाने सायंकाळी ४ पर्यंतच खुली राहतील तर सायंकळी ५ नंतर विनाकारण बाहेर फिरण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारी आदेशाचे राज्यात सर्वत्र कठोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते. रस्त्यावर होणारी गर्दी, लोकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, रुग्णसंख्येत झालेली वाढ, उत्परिवर्तित विषाणूचे आढळलेले रुग्ण यामुळेच निर्बंध पुन्हा कठोर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. संभाव्य तिसरी लाट आणि उत्परिवर्तित विषाणूचा धोका लक्षात घेता गर्दी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्याचा सल्ला कृतिदलाच्या तज्ज्ञांनी सरकारला दिला होता.