राज्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीला राज्यात मिळत असलेल्या जागांबद्दल काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. लोकसभेतील विजयाचं श्रेय पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना दिलं आहे. नाना पटोले म्हणाले, मोदींच्या सरकारविरोधात ही जनतेची लढाई होती. या लढाईला राहुल गांधी यांनी वाचा फोडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर, भारत जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा काढली आणि जनतेने जो प्रतिसाद राहुल गांधींच्या यात्रेला दिला, हे त्याचं फलित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, देशामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, नरेंद्र मोदींशिवाय दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं वारंवार गोदी मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पेरलं जात होतं, त्याला जनतेनं उत्तर दिलं आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लोकशाहीत प्रत्येकाला एक मताचा जो अधिकारी दिला आहे. त्या मताच्या तलवारीनं सत्तेमध्ये ज्यानी गर्व केला असे सत्ताधीश जे होते, त्यांना सत्तेच्या बाहेर करण्याचं काम या देशातल्या जनतेनं केलं आहे. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, मीच या देशाचा सर्वेसर्वा, देश विकला तरी चालेल अशी जी भावना होती तिला जनतेनं संविधानात दिलेल्या मताच्या तलवारीनं सत्तेबाहेर काढलं आहे. जनतेला मताचा अधिकार आहे. या देशामध्ये जनतेपेक्षा कोणी मोठा नाही हे पुन्हा या लोकशाहीनं समजावून सांगितलं आहे.
हेही वाचा : “मी दाव्यानिशी सांगतो की…” मतमोजणीदरम्यान संजय राऊतांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “सरकार बनवण्यासाठी…”
महाराष्ट्रात खोक्यांची व्यवस्था कधीही…
नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानी, शाहु फुलेंच्या महाराष्ट्रानी चमत्कार केला आहे. महाराष्ट्राच्या असंविधानिक सरकारला एक सबक दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असंविधानिक व्यवस्था, खोक्यांची व्यवस्था कधीही चालू शकत नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रानी हाच सबक सत्तेमध्ये बसलेल्यांना दिला आहे.
अग्नीवीर योजना बंद करू
अग्नीवीर योजनेबाबत नाना पटोले म्हणाले, देशात आमचं सरकार आलं की आम्ही अग्नीवीर योजना बंद करू. त्या अग्नीवीर योजनेत पेन्शन नाही आणि शहिदाचा दर्जा पण नाही. त्यामुळे राजकीय व्यवस्थेत नरेंद्र मोदींनी अग्नीवीर योजना आणली होती. राहुल गांधींनी दिलेल्या वचनांची तुलना नरेंद्र मोदींच्या गॅरंटीशी होऊ शकत नाही. कारण मोदींची जुमलेबाजी होती.
हेही वाचा : सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, कार्यकर्त्यांचे मानले आभार; म्हणाले, “काँग्रेसचे सर्व पदाधिकारी…”
या सरकारच्या भ्रष्टाचाराचं सीरीज आम्ही उघडणार
जिथं तिथं भ्रष्टाचार! आता भ्रष्टाचाराचं सीरीज आम्ही या सरकारचं उघडणार आहे. आमच्या जवळ सगळे पेपर आहेत. अपडेट आहेत. माहितीच्या अधिकारात जोडलेली कागदं आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने कसा भ्रष्टाचार केला, रस्त्यांच्या नावाने कसा भ्रष्टाचार केला, नदीचा कचरा काढण्यात भ्रष्टाचार केला. या सगळ्याची कागदोपत्री आमच्या जवळ आहे. भाजप व भाजपसोबतची लोकं एकत्रित का आली होती? राज्याची तिजोरी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या तिजोऱ्या कशा लुटल्या, त्या सगळ्या कागदपत्रांसह आम्ही समोर येणार आहोत. आताचं राज्यातलं सरकार कसं भ्रष्टाचारी आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी कसं खातंय, तरुणांच्या टाळूवरचं लोणी कसं खातंय, हे सगळंच्या सगळं चित्र आम्ही लोकांसमोर आणणार आहोत.