सोलापूर : सोलापुरात इंदिरा गांधी पार्क स्टेडिअममध्ये आयोजिलेल्या रणजी क्रिकेट सामन्यात तिसऱ्याच दिवशी सकाळच्या सत्रात दोन तासांतच सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघाचा ४८ धावांनी दाणून पराभव करीत सामना खिशात घातला. सौराष्ट्रचा धर्मेंद्र जडेजा सामनावीर ठरला.
काल शनिवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाला होता, तेंव्हा महाराष्ट्र संघाला विजयासाठी पाच गड्यांच्या मोबदल्यात १०४ धावांची गरज होती. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात तरणजीतसिंग धिल्लाँ आणि सिद्धार्थ म्हात्रे यांनी सावध सुरुवात करीत पहिला पाऊण तास खेळून काढत विजयासाठी आशा पल्लवित ठेवल्या. या दोघांत सहाव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाली. पण संघाची धावसंख्या १४० असताना सिद्धार्थ म्हात्रे (२७ धावा) पार्थ भूटच्या जाळ्यात अडकला. ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर समोर येऊन खेळण्याच्या नादात म्हात्रेचा तोल गेला आणि तो यष्टिचित झाला. त्यापाठोपाठ लगेच तरणजितसिंग (२८ धावा) हा देखील ४६ व्या षटकात पार्थ भूटने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. पुढच्या षटकातही पार्थ भूटने धनराज शिंदेला शून्यावर बाद करून महाराष्ट्राला आठवा झटका दिला. संघाला आठवा झटका दिला आणि सौराष्ट्र संघाला विजयाजवळ नेऊन ठेवले.
हेही वाचा – महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती
महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव याने आक्रमक फालंदाजी करून सौराष्ट्र संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूने कोणताही फलंदाज थांबायला तयार नव्हता. ५० व्या षटकात पुन्हा एकदा पार्थ भूट वरचढ ठरला. त्याने फिरकीपटू हितेश वाळुंज (१ धाव) याला हार्विक देसाईकडे झेल देण्यास भाग पाडले. ९ बाद १५३ धावा अशी महाराष्ट्र संघाची अवस्था झाली होती. शेवटची विकेट असल्याने केदार जाधव याने जलदगतीने धावा जमविण्याच्या उद्देशाने फटकेबाजी करायला सुरुवात केली, मात्र ५२ व्या षटकात चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने (१८ धावा) विकेट गमावली. महाराष्ट्र संघाचा डाव ५१.४.षटकात १६४ धावांवर गुंडाळला. सौराष्ट्र संघाने ४८ धावांनी सामना खिशात घातला.
हेही वाचा – पडळकर म्हणाले, “ओबीसीच नव्हे तर एससी एसटीच्या आरक्षणावर घाला”
सौराष्ट्र संघाचा फिरकीपटू पार्थ भूट याने महाराष्ट्राचे सात फलंदाज बाद करून चमकदार कामगिरी केली. त्याला युवराजसिंग दोडीया (२ बळी) तर धर्मेंद्र जडेजा (१ बळी) यांनी साथ दिली. सौराष्ट्र संघासाठी पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करून या सामन्यात एकूण पाच बळी घेणारा धमेंद्र जडेजाने सामनावीर होण्याचा मान मिळविला.