ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असतानाच आता मुंबईपासून जवळ आणि महानगरपालिका असलेल्या उल्हासनगरमध्ये कुपोषित बालक आढळले. या अतिकुपोषित बालकावर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगरमधील कॅम्प ५ मधील डॉ. आंबेडकर नगर भागात अभिमन्यू ब्राह्मणे राहतात. त्यांना मुकुंद हा दोन वर्षाचा मुलगा असून गेल्या काही दिवसांपासून मुकुंदची तब्येत खालावली. स्थानिक समाजसेवकांना याची माहिती मिळताच त्यांनी बालकाला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र रोकडे यांनी या बालकाचे वजन सरासरीपेक्षा कमी असल्याचे सांगितले. बालकाची तपासणी केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक नांदपूरकर यांनी हे बालक अतिकुपोषित असल्याचे जाहीर केले. जन्मवेळी मुकुंदाचे वजन अडीच किलो होते. मात्र सहा महिन्यानंतर त्याचे वजन कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप असून, यामुळे तो जेवत नसल्याचे समजते. मुकुंदचे वडील अभिमन्यू ब्राह्मणे रोजंदारीवर काम करतात. अनेकदा काम मिळत नसल्याने त्यांना पोटाची खळगी भरणेही कठीण जाते.

मुकुंदला मध्यवर्ती रुग्णालयात दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर ठाणे येथील कुपोषित बालकाच्या पुनर्वसन केंद्रात नेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच बालकाची शारीरिक स्थिती सुस्थितीत येईपर्यंत त्याची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती डॉ अशोक नांदपूरकर यांनी दिली माध्यमांना दिली.

राज्यातील ग्रामीण भागात कुपोषण आणि त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना गंभीर रुप धारण करत असतानाच आता शहरातही कुपोषित बालक सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेले सात दिवस ७३ लाख बालकांना पोषण आहारच मिळाला नसून, यातील शेकडो बालके तीव्र कुपोषणाच्या मार्गावर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. आता या घटनेवर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra malnourished child found in ulhasnagar city near mumbai admitted in central hospital