एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता 

सोलापूर : शिवसेना फाटाफुटीचे लोण अर्थात जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले असताना सोलापूर जिल्ह्यातही शिंदे गटाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ‘काय झाडी.काय डोंगार.काय हाटिल.’ फेम सांगोल्याचे आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यातून मोहरा सुरुवातीलाच मिळाला आहे. जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढविण्याचा विडा उचललेले आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी येत्या १७ सप्टेंबरनंतर सोलापुरातून आणखी काही बडे नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे डॉ. सावंत हे शिवसेना फोडण्यासाठी आतूर झाले असताना दुसरीकडे ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांनी याच डॉ. सावंत यांच्या दौऱ्यात कडव्या पध्दतीने आंदोलन करीत आहेत. त्याची प्रचीती नुकतीच आली आहे.

हेही वाचा >>> अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? माणिकराव ठाकरे म्हणाले, “काल नांदेडच्या बैठकीत…!”

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील असलेले आणि शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले डॉ. तानाजी सावंत यांना सोलापूर जिल्ह्यात शिवसैनिकांचा मानणारा वर्ग आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुखपद सांभाळले होते. आता शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी डॉ. सावंत हे सोलापूरवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार शिंदे गटाचे चार जिल्हाप्रमुख नियुक्त झाले आहेत. अमोल शिंदे व मनीष काळजे (सोलापूर), महेश चिवटे (माढा) आणि चरणराज चवरे (पंढरपूर) या चारही तरुण जिल्हाप्रमुखांना ताकद देऊन कामाला लावण्यात आले आहे. करमाळय़ाचे माजी आमदार नारायण पाटील हेसुद्धा शिंदे गटासोबत आहेत. केवळ शिवसेनाच नव्हे तर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनाही गळ घातली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे विमान झेप घेण्यासाठी उड्डाण करण्याच्या बेतात असताना दुसरीकडे कडव्या शिवसैनिकांच्या रोषाला डॉ. सावंत यांना सामोरे जावे लागत आहे. माळशिरस, नातेपुते, मोहोळ भागात त्याची प्रचीती आली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे डॉ. सावंत येऊन गेल्यानंतर तेथील मार्गावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून मार्गाचे शुद्धिकरण केल्याचा प्रकार घडला. तर मोहोळ येथे डॉ. सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अर्पण केलेला पुष्पहारनंतर लगेचच काढून टाकत पुतळय़ाला शिवसैनिकांनी दुग्धाभिषेक केला.

डॉ. सावंत यांच्या माळशिरस भागातील दौऱ्याला स्थानिक शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. ऐनवेळी दौऱ्यात शिवसैनिकांकडून गडबड होण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिसांनी खबरदारी म्हणून संबंधित शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या होत्या.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संपली असून आमचीच खरी शिवसेना आहे. ठाकरे गटाकडे शिवसैनिकच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे नातेपुते आणि मोहोळमध्ये त्यांनी हे कृत्य करणे शक्य नाही. तर राष्ट्रवादीवाल्यांनीच हे कारस्थान केल्याचे वाटते.

-डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री