एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्या पराभवाची अनेक कारण पुढे येत आहेत. त्यातील महत्वाचं म्हणजे ठेकेदारांकडुन मंत्री ४० टक्के मागत होते. तर महाराष्ट्र सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. त्या प्रश्नावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आपल्या राज्यात कोणत्याही भागात एखाद्या व्यक्तीला हजारो कोटींची कामं पाहिजे असल्यास मंत्रालयातील एखाद्या मंत्र्यांला पैसे द्यावे लागतात. ही बाब मी खासदार म्हणून जबाबदारी सांगत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद करित शिंदे फडणवीस सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावं लागलं असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपयश आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना केरला स्टोरी मुव्हीचे दोन तिकिट, पॉप कॉर्न ऑफर केले आहेत. अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
भाजपाकडून देशात एक हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जाता होता. तो प्रयत्न कर्नाटक येथील जनतेने मतदानाच्या माध्यमातून हाणून पाडला. भाजपाकडून मध्यप्रदेश निवडणुकीच्या तोंडावर देखील काश्मीर फाईल्स हा चित्रपट आणला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुक लक्षात घेऊन केरला मुव्ही आणला. या दोन्ही चित्रपटांमधून मतांची विभागणी कशी करता येईल याकडे भाजपाने लक्ष दिले. या चित्रपटाच्या माध्यमातून भाजपाचं काहीच साध्य झालं नाही. त्यामुळे मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो आणि यातून महाराष्ट्रातील जनता काही तरी बोध घेईल. असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीचे परिणाम राजस्थान आणि आगामी लोकसभा निवडणुकीत निश्चित दिसतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. तर आता भाजपाचे अच्छे दिन गेल्याचे सांगत भाजपा नेतृत्वावर त्यांनी टीका केली.