देशात सध्या लॉकडाउन लागू आहे. करोना संसर्गाच्या भीतीनं लोक घरातून बाहेर पडायचं टाळत आहे. संपूर्ण जनजीवन ठप्प असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील विजेवरील प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च अथवा मोबाईलचा फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं. मोदी यांच्या घोषणेवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींच्या या संकल्पनेवर सडकून टीका केली आहे.

मोदी यांनी मेणबत्त्या पेटवण्याचं आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून टीका केली आहे. ‘संपूर्ण देशाला आशा होती की, मोदी साहेब जीवनावश्यक वस्तुंबद्दल बोलतील. भारतातील कोणताही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. मास्क, सॅनिटाएझर आणि औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याची कमरता पडणार नाही, याच्यावर बोलतील. आम्ही नवीन लस शोधून काढतोय, याविषयी बोलतील. टेस्टिंग किट कमी पडणार नाही, याच्यावर बोलतील. देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटल होतं. तर त्यांनी आता नवीनच इव्हेंट काढला. अंधार करा आणि दिवे पेटवा. सगळ्यांच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना प्रधानमंत्र्यांकडून उजेड आणण्याची आवश्यकता आहे. अपेक्षा आहे. अशावेळी तुम्ही सांगता अंधार करा आणि मोबाईलच्या टॉर्च पेटवा. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा, असं यांना का वाटतं? हा तद्दन तद्दन मुर्खपणा आहे. नादान, बालिशपणा आहे. मी आज मात्र जाहीर करू इच्छितो, मी काम करतोय. मी गरिबांमध्ये जातोय. मी गरिबांना जेवण देतोय. मेणबत्तीचे पैसेही मी गरिबांना देईल. मात्र, मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी मुर्ख नाही,”अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली आहे.

आणखी वाचा- “सोचा था चूल्हा जलाने की बात होगी, साहब दिया जलाने का उपदेश दे गए”

मोदींनी केलेलं आवाहन तुम्हाला माहिती आहे का?

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले,”करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशातील गरीब जनतेला बसला आहे. मात्र, जनता कर्फ्यूप्रमाणेच लॉकडाउनला लोकांनी सहकार्य केलं आहे. भारतात जनतेला ईश्वराचं रुप समजलं जातं आणि करोनामुळे निर्माण झालेल्या अंधःकारातून बाहेर पडण्यासाठी मी जनतेकडे काही मागत आहे. मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत. पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. मात्र, हे करत असताना जनता कर्फ्यूवेळी चूक करू नका. तुम्हाला सोशल डिस्टन्सिग पाळायचं आहे. कुणीही एकत्र यायचं नाही. कुठेही गर्दी करायची नाही. एकटं राहायचं आहे. एकटं राहुनच हे करायचं आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे,” असं मोदी म्हणाले.

Story img Loader