महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही वेळापूर्वीच फेसबुक पोस्ट करत आणि ट्विट कर शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे. तसंच जे आपल्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.शंभूराज देसाई यांना करोना झाल्याने आता राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा करोनाने शिरकाव केला आहे. आज सकाळीच छगन भुजबळ यांना करोना झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता शंभूराज देसाई यांना करोना झाला आहे.
काय म्हटलं आहे शंभूराज देसाई यांनी?
“माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो.” असं ट्वीट शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही करोना
आज सकाळीच छगन भुजबळ यांना करोना झाला असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना करोना झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या छगन भुजबळ हे त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. छगन भुजबळ यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनीही जे आपल्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच २ हजाराहून अधिक सक्रिय करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागच्या २४ तासांत राज्यात ३९७ नवे रुग्ण आढळले असून शनिवारच्या तुलनेत ही संख्या ४० ने कमी आहे. शनिवारी राज्यात ४३७ बाधित आढळले. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकट्या मुंबईत रविवारी १२३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सध्या ४३ कोविड रुग्ण रूग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी २१ ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.