ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारपासून सक्षम जनलोकपालाच्या मागणीसाठी उपोषणाचे अस्त्र उगारताच काँग्रेसकडून हे आंदोलन मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास हजारे यांची भेट घेऊन तब्येतीचे कारण पुढे करत उपोषण मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा संदेश हजारे यांना दिला. माझी तब्येत ठणठणीत असून विधेयक संमत झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे हजारे यांनी थोरात यांना या वेळी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे हजारे यांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्घी येथे येत असल्याचा संदेश शासकीय यंत्रणांना आला. दुपारी साडेचारच्या सुमारास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नागपूरहून विमानाने पुण्यास व तेथून हेलिकॉप्टरने राळेगणसिद्घीस पोहोचले. राळेगणसिद्घी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये थोरात यांनी जिल्हाधिकारी संजीवकुमार दयाळ, जिल्हा पोलीसप्रमुख रावसाहेब शिंदे यांच्याशी चर्चा करून हजारे यांच्या उपोषणाचा आढावा घेतला. तेथून ते उपोषणस्थळी आले. येथे यादवबाबा मंदिरात बंद खोलीत थोरात यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. थोरात यांच्यासमवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, पोलीस अधीक्षक शिंदे होते. सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेदरम्यान थोरात यांनी उपोषण थांबविण्याचा मुख्यमंत्र्यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. हजारे यांची प्रकृती ठीक नसल्याचा नगर जिल्हा शल्यचिकित्सक रवींद्र निटूरकर यांचा अहवाल आहे. तो राज्य सरकारला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने आपण उपोषण थांबवावे, यासाठी आपण आल्याचे थोरात यांनी हजारे यांना सांगितले.
 दरम्यान, हजारे यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणस्वामी यांनी सकाळीच येत्या अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मांडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हजारे यांचे आंदोलन सुरू होताच ते थांबवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.

Story img Loader