जनलोकपाल विधेयक संसदेमध्ये मंजूर करावे, या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राळेगणसिद्धीमध्ये येणार आहेत. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे विश्वस्त श्याम असावा यांनी ही माहिती दिली.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. अण्णांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात नागपूरमधून निघाले आहेत. अण्णांनी थोरात यांच्याशी जनलोकपाल विधेयकावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळेच ते राळेगणसिद्धीला येत आहेत, असे असावा यांनी सांगितले. जनलोकपाल विधेयक मंजूर होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.