Abu Azmi son Farhan Azmi detained in Gao: समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर ते अडचणीत आले होते. त्यानंतर आज आमदार अबू आझमी यांनी माफी मागितली. मात्र आता त्यांचा मुलगाही अडचणीत आला आहे. त्यांचा मुलगा आणि उद्योगपती अबू फरहान आझमी याला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडी चालवण्यावरून दोन स्थानिकांशी वाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी दोन स्थानिक नागरिक आणि फरहान आझमी यांचा चालक शाम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

कलंगुट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३५ अनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर चारही जणांना प्राथमिक चौकशीनंतर सोडून देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझमी त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि चालक शाम मर्सिडिज एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. सुपरमार्केटच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या वाहनातील प्रवाशांशी त्यांचा वाद झाला. आझमी यांच्या वाहनाने डाव्या बाजूला वळत असताना सिग्नल दिला नाही, असा आरोप मागच्या वाहनातील इसमाने केला. यावरून आझमी आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर स्थानिक लोक आणि मागच्या वाहनातील इसमाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

गोवा पोलिसांनी या प्रकरणी एक निवेदन जाहीर केले. ज्यात म्हटले की, वादात सहभागी असलेल्या चारही लोकांना पोलीस ठाणयात आणण्यात आले. दोन्ही पक्षांना आपापली तक्रार दाखल करण्याची संधी दिली, मात्र दोघांनीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया म्हणून दोन्ही पक्षांच्या लोकांना वैद्यकीय चाचणी करावी लागणार होती. मात्र यासाठी दोन्ही पक्षांनी नकार दिला. अबू फरहान आझमी यांच्याकडे वादाच्यावेळी पिस्तूलही होते. त्याचा रितसर परवाना त्यांनी सादर केला.

मात्र दोन्ही पक्षांनी मिळून सार्वजनिक शांतता बिघडवल्याबद्दल कलंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश सिनारी यांनी दोन्ही पक्षांविरोधात तक्रार दाखल केली. बीएनएस कलम १९४ (दंगलीचा गुन्हा) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अभिनेत्री आयशा टाकियाशी लग्न

अबू फरहान आझमी यांची पत्नी आयशा टाकिया ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे. आयशाने २००४ साली ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘डोर’, ‘नो स्मोकिंग’, ‘वाँटेड’ या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. नागेश कुकुनूरच्या ‘मोड’ चित्रपटात ती शेवटची दिसली.

फरहान आझमी आणि अभिनेत्री आयशा टाकिया यांचा विवाह १ मार्च २००९ रोजी झाला होता. त्यानंतर २ वर्षांनी म्हणजे २०११ पासून आयशाने बॉलिवूडकडे पाठ फिरवली. आयशाला मिकेल नावाचा मुलगा आहे. ती बॉलिवूडपासून दूर झाली असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Story img Loader