MLA Oath Taking Ceremony Features : राज्यात महायुतीच्या मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आज विधिमंडळाच्या सभागृहात विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. आज सत्ताधारी पक्षातील आमदार विविध रंगांच्या फेट्यांमध्ये विधिमंडळ परिसरात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार भगव्या रंगाचे फेटे घालून आल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार गुलाबी रंगाच्या फेट्यांमध्ये दिसले.
किती आमदारांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे भाजपाचे नेते आणि जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांनी संस्कृतमध्ये आमदारकीची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान महाजन यांच्या शपथविधीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गिरीश महाजन यांच्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही संस्कृतमध्ये शपथ घेतली. पुढे भाजपाचेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही यावेळी संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतली.
विरोधी पक्षांच्या आमदारांचा बहिष्कार
आमदारांचा शपथविधी आणि विधानसभेच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक पावित्रा घेतला. याचबरोबर त्यांनी आज आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार अदित्य ठाकरे यांनी ते आज शपथ घेणार नाहीत, असे सांगितले आहे.
हे ही वाचा : बाळासाहेब थोरातांना पराभूत करणारा आमदार खास टोपी घालून विधान भवनात; म्हणाले, “ही टोपी…
हेमंत रासने पहिल्याच दिवशी गोंधळले
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना पराभूत करत भाजपाचा बालेकिल्ला खेचून आणणारे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने विधानसभा सभागृहात पहिल्याच दिवशी गोंधळल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात प्रवेश करताच बाकांवर बसायला निघाले, पण ज्या बाकांवर ते बसत होते, ते विरोधी पक्षांचे बाक होते. तितक्यात अजित पवार यांनी हा प्रकार पाहिला व त्यांनी रासने यांना सत्ताधाऱ्यांच्या बाकावर आणून बसवले. यावेळी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर सभागृहात हशा पिकला होता.
अनेक आमदारांकडून जय श्रीरामचे नारे
आज आमदारांच्या शपथविधीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच प्रामुख्याने शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये भाजपाच्या काही आमदारांनी जय श्रीरामचे नारे दिले. जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केल्याचे दिसले.