राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाल्याचं चित्र सोमवारी पहायला मिळालं. या निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट दोन महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केलाय. येत्या दोन महिन्यांमध्ये फडणवीस योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार असून ते मुख्यमंत्री होतील, असं राणा यांनी भाजपाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

नक्की वाचा >> विधान परिषद निवडणूक: विजय मिळवल्यानंतर प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “रोज सकाळी बोलणारा पोपट आता…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठरवा आणला जाईल. शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. या सरकारला पायउतार व्हावे यासाठी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असं म्हणत राणा यांनी सूचक शब्दांमध्ये इशारा दिलाय. तसेच पुढे बोलताना रवी राणा यांनी भगवान हनुमानाचा आशिर्वाद फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. रावणाची लंका जाळण्यासाठी रामभक्त आणि हनुमानभक्त आमदारांच्या रुपात मैदानात उतरले आहेत. आधी आमदार धडा शिकवतील आणि मग जनताच सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असंही रवी राणा म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी भगवान हनुमानाचा अपमान केला. हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरुन आम्हाला तुरुंगात डांबण्यात आलं. राज्यसभेच्या निकालाच्यावेळीस मी ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरु झाल्याचं म्हटलेलं. हे दोन्ही निकाल त्याचीच सुरुवात आहेत. पुढील दोन महिन्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होतील. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असा दावा राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय.

काँग्रेस विरुद्द काँग्रेस<br>दहाव्या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, उलटेच झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाली़  काँग्रेसने हंडोरे यांच्यासाठी पहिल्या पसंतीच्या २९ मतांची व्यवस्था केली होती. परंतु, हंडोरे यांना २२ मतेच मिळाली. यावरून काँग्रेसची सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले. राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत बेदिली असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेवर नामुष्की
शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली असावीत. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली.

राष्ट्रवादीची ती मतं कुठून?
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. ही मते महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची की भाजपाची, अशी चर्चा सुरू झाली.

भाजपाची मतं वाढली, सरकार स्थिर नाही स्पष्ट झाले
भाजपाचे १०६  आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपाला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले. विधान परिषदेत चमत्काराचे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, पण भाजपानेच चमत्कार केला. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीची मते फोडून भाजपाने सरकार डळमळीत होईल, अशा पद्धतीने पावले टाकली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ १५२ असल्याने या दोन्ही निकालांवरून सरकार लगेचच कोसळेल असे नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भरभक्कम किंवा स्थिर नाही हे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mlc election ravi rana says devendra fadnavis will be cm in next 2 months scsg