अलिबाग : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रीया बुधवारी शांततेत पार पडली. सरासरी सुमारे ७० टक्के मतदान झाले. १३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. नवीमुंबईतील नेरळ इथे १ जुलैला मतमोजणी होणार आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. सुरवातीला संथगतीने मतदानाला सुरवात झाली. पहिल्या दोन तासात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.३० मतदान झाले. नंतर मात्र मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास सुरुवात झाली. ११ वाजेपर्यंत २०.१५ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३५.६५ टक्के मतदांरांनी मतदान केले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदारांनी मतदान केले. सायंकाळी ५ वाजे पर्यंत ५९.३१ टक्के मतदान झाले. शेवटच्या एक तासात दहा टक्के मतदान झाले असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यातुलनेत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मतदारांमध्ये कमी उत्साह पहायला मिळाला.
हेही वाचा >>> सातारा: सोनसाखळी चोरट्याकडून २७ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
मतदारांना बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांनी चांगलाच जोर लावला होता. मतदार यादीत नावे शोधून मतदारांना मतदान केंद्र आणि यादीतील अनुक्रमांक शोधून देण्यासाठी पक्षांनी विशेष यंत्रणा तैनात ठेवली होती. मतदान आपल्या बाजूने व्हावे यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्नांची शिकस्त सुरू होती. मतदारांना मतदानाची पद्धत समजून सांगण्यात दोन्ही पक्षांचा कस लागत होता. पंसतीक्रम आणि मतदान करतांना योग्य काळजी घेण्याचे बुथ कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते. आवाहन केले जात होते. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने, भाजपच्या निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश कीर यांच्यासह १३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. नवी मुंबईतील नेरळ येथील आगरीकोळी संस्कृती भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.