Monsoon Session of Maharashtra Legislature, Day 2 : राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी राज्य सरकारने सुमारे ४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी विधिमंडळात सादर केल्या. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांमधील मूलभूत सुविधांसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, काल अर्ध्या तासात विधानसभेचं कामकाज संपलं. शोकप्रस्ताव सादर झाल्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे आज विविध मुद्द्यांवरून विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपा नेता किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचा.

Live Updates

Maharashtra Latest News Live : वाचा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी

17:39 (IST) 18 Jul 2023
"कोकणाचं कौतुक होतं, प्रश्नही सोडवा"; नितेश राणेंची सभागृहात मागणी

काजू-आंबा उत्पादानाला योग्य दर मिळावा, नैसर्गिक आपत्ती, पारंपरिक मच्छिमारांचे संघर्ष यांसह कोकणातील इतर मुद्द्यांवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न मांडले. "कोकणाचं नेहमी कौतुक केलं जातं. पण महत्त्वाच्या प्रश्नावरही लक्ष घाला. महाविकास आघाडीने कोकणावर अन्याय केला. हा अन्याय पुसून टाकण्याचं काम महायुती सरकारने करावं", अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

15:34 (IST) 18 Jul 2023
शेतकरी प्रश्नांवरून बाळासाहेब थोरात विधानसभेत आक्रमक

"२०१४ ला युतीचं सरकार आलं तेव्हा कृषीमंत्री खडसेंकडे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडे हे खातं दिलं. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकामसह अनेक खाती होती, त्यात कृषीखातं होतं. त्यानंतर भाऊसाहेब फुंडकरांना दिलं. पाच वर्षांत चार मंत्र्यांना कृषी खातं जोडून दिलं. कृषी खात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन युतीमध्ये काय आहे हे आपण पाहिलंय. कृषी विभागाला किती गांभीर्याने पाहता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वर्षभरात खरीपाचा विषय तो शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. यशवंतराव चव्हाणांचं कृषी खात्यात व्यक्तिशः लक्ष असायचं", असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

13:57 (IST) 18 Jul 2023
किरीट सोमय्या कथित व्हिडीओप्रकरणी चौकशी होणार, फडणवीसांची ग्वाही

"राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी करण्यात येईल," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

13:38 (IST) 18 Jul 2023
"तुम्ही दिलेला पेनड्राईव्ह पाहणं म्हणजे..."; सोमय्याप्रकरणी निलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

"सोमय्याप्रकरणी फडणवीसांनी चौकशी जाहीर केली आहे. याप्रकरणात एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. व्हिडीओ ब्लर करून चॅनेल्सवरून घराघरात हे शॉर्ट्स दाखवले जातात. आपल्या घरात मुलं मुली पाहतात. मी विनंती करीन की तुम्ही व्हिडीओ ब्लर करत असला तरीही सगळं कृत्य परत परत दाखवा, व्हिडीओ दाखवत असताना थोडं बंधन ठेवा. पोलिसांच्या चौकशीत या वाहिन्यांनी गोपनिय स्वरुपात माहिती द्यावी. जेणेकरून पीडित महिलेपर्यंत पोहोचणं शक्य होईल. तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे फार कठीण परीक्षा आहे माझ्यासाठी. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवराना ते बघायला सांगेन. त्या महिलेचे तक्रार आली पाहिजे", असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

12:41 (IST) 18 Jul 2023
अंमली पदार्थ विक्रीसाठी पानवाला प्रमुख स्त्रोत - जितेंद्र आव्हाड

अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी सभागृहात चर्चा सुरू असातना राष्ट्रादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात महत्त्वाची मागणी केली आहे. पानवाल्याची दुकाने रात्री ११ वाजताच बंद करा, पानवाले हेच अंमली पदार्थ विक्रीसाठी प्रमुख स्त्रोत आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

12:36 (IST) 18 Jul 2023
"नानाभाऊंनी प्रश्न विचारला, मी दिल्लीला कधी जाणार?", फडणवीसांनी दिलं मिश्किल उत्तर

अंमली पदार्थाविषयी सभागृहात चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनीही याविषयी लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नानाभाऊंनी प्रश्न विचारला, मी दिल्लीला कधी जाणार? त्यांनी चिंता करू नये, ते जातील तेव्हाच मी दिल्लीत जाणार", असं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

12:26 (IST) 18 Jul 2023
"अंमली पदार्थ विकणाऱ्या तस्करांना रोखा", रोहित पवारांनी वेधलं लक्ष

"एकीकडे अंमली पदार्थविरोधी सत्पाह साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे अमली पदार्थ खरेदी विक्रीसाठी वेगवेगळ्या नव्या क्लृप्त्या शोधल्या जात असताना तस्कारांना रोखण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने शहराच्या तरुणाईचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी", अशी लक्षवेधी रोहित पवारांनी आज मांडली.

11:26 (IST) 18 Jul 2023
"पेनड्राईव्ह घेऊन येतोय, भेटुया सभागृहात", अंबादास दानवेंचा किरीट सोमय्यांना इशारा!

किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओप्रकरणी राज्यातील वातावरण तापलेलं आहे. त्यातच, अंबादास दानवे यांनी ट्वीट करून किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे.

https://twitter.com/iambadasdanve/status/1681171068625780738?s=20

11:16 (IST) 18 Jul 2023
मुंबईतील नैसर्गिक प्रवाह थांबवले, मुंबईला संपवण्याचं काम सुरू- नाना पटोले

"मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा गर्व आम्हाला सर्वांना आहे. मुंबई यावर्षी तुंबणार नाही, हे वाक्य आपण इतके वर्षे ऐकतोय. मुख्यमंत्री नदी नाले फिरले आहेत. मुंबईतील नैसर्गिक प्रवाह थांबवण्यात आला आहे. एका पावसात मुंबई तुंबते आणि मुंबईत लोक मरतात, यामुळे आर्थिक राजधानी कमकुवत होते. याबाबत सरकार कठोर निर्णय घेणार का? की सोयीप्रमाणे उत्तर देणार. तुम्हाला मुंबईच्या जनतेची काळजी नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी असताना मुंबईला संपवण्याचं काम सरकार करतंय का?" असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला.

10:47 (IST) 18 Jul 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार पंतप्रधानांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. हॉटेल अशोक येथे ही भेट होणार आहे.

10:44 (IST) 18 Jul 2023
विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यावंर आंदोलन, जितेंद्र आव्हाडही सहभागी

"लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो", "मंत्री तुपाशी, जनता उपाशी" यासंह अनेक घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात येतेय. आजच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही आहेत. विरोधकांची संख्या कमी असली तरीही आम्ही एकजूट आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.

Maharashtra Monsoon Session Live 2023

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२३ लाइव्ह

Maharashtra Latest News Live : वाचा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी

Story img Loader