PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीप्रणित एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) बहुमत मिळवलं असून नरेंद्र मोदी आज (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राला कोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात भाजपा खासदार रक्षा खडसे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी खडसे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीतील विजयाचं आणि या यशाचं श्रेय जनतेला द्यावं लागेल. कारण जनतेमुळेच मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. यासह आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते, त्यांच्या योगदानामुळे मी निवडून आले आहे.”
दरम्यान, यावेळी खासदार खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला की कोणत्या मंत्रिपदाची तुम्हाला जबाबदारी मिळू शकते किंवा निवडणुकीचा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक होता का? यावर रक्षा खडसे म्हणाल्या, “हो! नक्कीच निवडणुकीत आव्हानं होती. परंतु, जनता माझ्याबरोबर ठामपणे उभी राहिली. त्यामुळे मला चांगलं यश मिळालं. तसेच मी तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे, हे (मंत्रिपद) त्याचंच फळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पक्षाने माझ्यावर इतका मोठा विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे.”
खासदार खडसे यांना यावेळी विचारण्यात आलं की तुम्हाला पक्ष नेतृत्वाकडून आता काय अपेक्षा आहेत? त्यावर रक्षा खडसे यांनी उत्तर देणं टाळलं. त्या म्हणाल्या, “आता पुढचं पुढे बघू… पुढे काय होतंय ते ठरवू… मात्र मतदारसंघात कोणकोणती कामं करायची आहेत हे मात्र मी ठरवलं आहे.”
महाराष्ट्रात कोणाला मंत्रिपद मिळणार?
महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, अजित पवार गटाचे प्रफुल पटेल मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच भाजपामधून नारायण राणे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.