Maharashtra Updates Today, 19 May : अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राज्यभर निरनिराळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या केतकी न्यायालयीन कोठडीत असली, तरी तिला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या भागातील पोलीस तयारीत आहेत. एकीकडे केतकी चितळे प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आणि पुण्यातील सभेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रभरातील आणि देश-विदेशातील अशा प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसह सर्व अपडेट…
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
संभाजीराजेंनी वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही भेट राज्यसभा निवडणुकीबाबत आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आहे हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळेच चर्चांना उधाण आलं आहे.
"मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने ८ दिवसांत आधीचा निर्णय बदलून परवानगी देणे अनाकलीय व आश्चर्यकारक आहे. त्यातही दोन दिवसांत मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाने दुसरा अहवाल तयार करणे हा चमत्कारच म्हणावा लागेल," असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राला मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर राज्य सरकारने ५ दिवस या कबरीवर जाण्यास मज्जाव केलाय. यावर विचारलं असता भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याची घोषणा केलीय. तसेच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. यावर भाजपा संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेत पाठिंबा देणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.
सैराट चित्रपट कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे, सल्या उर्फ अरबाज शेख यांनी यवतमाळमधील टिपेश्वर अभरण्य येथे जंगल सफारीला हजेरी लावून आनंद लुटला. टिपेश्वरमधील आर्ची वाघिणीने सध्या सर्वांना भुरळ घातली आहे. त्याच आर्चीला पाहायला सैराटचे कलाकार आले होते.
नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात १६ मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या १७ मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या कामासाठी पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.
काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. मागच्या सुनावणीत यासीन मलिकने दहशतवादासाठी फडिंग केल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाळ्या आधी होणाऱ्या नालेसफाई कामाची झाडाझडती घेण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. त्यानंतर राजकारणाला ऊत आला आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. अधिक वाचा...
संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून टीका केली आहे. “राज ठाकरेंची पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली? ते मला माहिती नाही. उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांच्या विरुद्ध त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी काही भूमिका घेतली होती. पण एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले. त्यामुळे तिकडच्या काही लोकांनी यावर लोकशाही मार्गाने प्रश्न विचारले असतील”, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ फिरताच शहर मनसेमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. पक्षाच्या कोणत्याही बैठकीला का बोलाविले जात नाही, अशी विचारणा झाल्याने शिवाजीनगर विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. वादविवाद टोकाला पोहोचल्याने झटापटीचा प्रसंगही घडला.
बाठिया आयोगाचा अहवाल आला की मध्य प्रदेश सरकार जसं सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं आम्ही जूनमध्ये बाठिया कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर आमचं म्हणणं मांडणार आहोत. मध्य प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही ५० टक्क्यांच्या पुढे जागा न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं असा आमचा प्रयत्न राहील - अजित पवार
पुन्हा एकदा घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरानुसार सिलेंडर किंमती १ हजार रुपयाच्या पुढे गेल्या आहेत. घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये ३ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडर ८ रुपयांनी महागला आहे. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत १००३ रुपये झाली आहे. गेल्या १२ दिवसात घरगुती सिलेंडरच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी ७ मे २०२० ला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे पुण्यात सभा घेणार होते. मात्र, ऐनवेळी ही सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावरून शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता मनसेनं दिपाली सय्यद यांना खुलं आव्हान दिलं आहे.
बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खुलं आव्हान देणाऱ्या शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आता पुन्हा एकदा मनसेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सातत्याने घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि त्यातून बदलणारी राजकीय समीकरणं यांचे सर्व अपडेट्स!