सध्या सुरू असलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेत भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये गोंधळ असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात या प्रश्नी निवेदन देत ठिय्या दिला. दरवर्षीपेक्षा यंदा प्रश्नपत्रिकेतील गणिताची काठिण्य पातळी वाढवली होती, गुणवाटणीनुसार प्रश्न विचारण्यात आले नाहीत, असा आक्षेप निवेदनात घेण्यात आला आहे. दोन गुणांसाठी अपेक्षित प्रश्न सात गुणांसाठी विचारण्यात आला. पूर्वी भौतिकशास्त्राचे दोन भाग होते. या वर्षी दोन भाग एकाच प्रश्नपत्रिकेत देण्यात आले. परीक्षा पद्धतीत बदल केल्याने ७० गुणांची प्रश्नपत्रिका सोडविताना विद्यार्थी गोंधळून गेले. प्राध्यापकांनी २५ टक्के अभ्यासक्रम शिकवलाच नाही. त्यामुळे न शिकवलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमातील प्रश्न विद्यार्थ्यांना समजले नाहीत. त्यामुळे या गोंधळास मंडळ जबाबदार असून विद्यार्थ्यांना २५ टक्के गुण प्रदान करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Story img Loader