जळगाव – सध्या राज्यभरात राजकीय भूकंप घडत आहेत. राजकीय घडामोडींमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक सही संतापाची अभियान सुरू करण्यात आले आहे. ३५ ते ४० हजार जळगावकरांनी स्वाक्षरी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काव्यरत्नावली चौक एक सही संतापाची अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय भोईटे यांनी स्वाक्षरी करून अभियानाचे उद्घाटन केले. याप्रसंगी माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा उपसंघटक राजेंद्र निकम, विभागाचे अध्यक्ष प्रशांत बाविस्कर आदींसह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा >>> “काँग्रेस लुट की दुकान, झुठ का बाजार हैं”, मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांनी चुकीने…”
प्रदेशाध्यक्ष भोईटे, जिल्हाध्यक्ष, ॲड. देशपांडे यांनी सांगितले की, सध्या राज्यभरात राजकीय पटलावर चिखल झाला आहे. विकासाऐवजी जनतेला राजकीय धक्केच अधिक बसत आहेत. या राजकीय घटना-घडामोडींनी राज्यभरातील जनता हैराण झाली आहे. त्यांचे मन मोकळे होण्यासाठी एक सही संतापाची अभियान राज्यभरात राबविले जात आहे. जिल्ह्यातही अभियान राबविले जात आहे. जळगावकरांकडून अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शहरातील स्वातंत्र्य चौक, पांडे चौक, आकाशवाणी चौक, आर. एल. चौफुली, गणेश कॉलनी रस्त्यावरील कोर्ट चौक, नूतन मराठा महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, काव्यरत्नावली चौक आदी भागांत अभियान राबविण्यात आले. ठिकठिकाणी स्वाक्षरीसाठी फलक उभारण्यात आले होते. अभियानाचा रविवारी समारोप होणार आहे.
हेही वाचा >>> “शरद पवार किती ठिकाणी माफी मागणार?” छगन भुजबळांचा उद्विग्न सवाल; म्हणाले, “मला वाईट…”
जळगावात अमित ठाकरेंच्या उपस्थित कार्यक्रम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे १९ आणि २० जुलैला जिल्ह्यात पक्षसंघटनसह विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. त्यासंदर्भात नियोजनासाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पद्मालय विश्रामगृहात झाली. पक्षाचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर, प्रदेशाध्यक्ष विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत जिल्ह्यातील प्रश्नांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रकाश जोशी, प्रशांत बाविस्कर, राहुल चव्हाण, सुमित राठोड, श्रीकृष्ण मेंगडे, उमेश आठरे, सोनू जाधव, नीलेश वाणी आदी उपस्थित होते.