महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव चर्चेत आहे ते नाव आहे अजित पवार यांचं. अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात अजित पवार यांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांनी तुमच्या मनात जे आहे ते आमच्या मनात नाही असं सूचक उत्तर दिलं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळीही धनंजय मुंडे यांच्या घरीच सगळं प्लानिंग झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे धनंजय मुंडे यांनी?

धनंजय मुंडे यांना माध्यमांनी विचारलं की राष्ट्रवादीत सगळं काही ओके आहे का? ऑल इज वेल आहे का? त्यावर धनंजय मुंडेंनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “आमच्या पक्षात परफेक्टली वेल आहे” असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. अजित पवार हे भाजपात जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चाही समोर आल्या. मात्र धनंजय मुंडे हे मंत्रालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपात येतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार हे शरद पवारांनाच विचारून निर्णय घेतील. ते सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?

“सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ncp mla dhananjay munde reaction on ajit pawar he said all is well in my party scj