कराड: यशवंतराव चव्हाण यांच्या साधी राहणी आणि आदर्श विचारसरणीने महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला. त्यांच्या या विचारसरणीची महाराष्ट्राला आज निश्चितपणे गरज असल्याचे गौरवद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीतीसंगमावरील त्यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर समाधी परिसरात आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींची शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आवर्जून उपस्थित राहात अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, यशवंतप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं “राष्ट्रवादीला तीन-चार जागाच मिळतील ही…”
अजित पवार म्हणाले की, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने दिवंगत ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णा – कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत आहे. शासनाच्या माध्यमातून लोकहिताचे काम करीत असताना असे उर्जा व प्रेरणा स्त्रोत सहायभूत ठरतात. महाराष्ट्राच्या जडण घडणीत यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे आज कृतिशील व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे. शेती, व्यापार, आरोग्य, शिक्षण, सहकार यासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा पाया भक्कम उभा आहे. राजकारण, समाजकारण त्यांनी वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. त्यांची नाळ शेवटपर्यंत जनतेशी जोडली गेली होती. राजकारणावर त्यांचा वेगळा ठसा व प्रभाव होता. दिल्लीतील त्यांचे निवासस्थान उभ्या महाराष्ट्राला आपलसं वाटत होते, यशवंतराव चव्हाण व वेणुताई चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार हा साहित्य क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.