Maharashtra Politics Updates Today: महाराष्ट्रात निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. अवघ्या १९ दिवसांनी महाराष्ट्र लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. हा सामना कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच उमेदवार याद्या जाहीर होत असताना काहीसं नाराजीचं चित्र आहे. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीही झालेली दिसते आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यादिवशी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. माहीममध्ये मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना तिकिट दिलंय. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या आणि निवडणुकीच्या संदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Today, 01 November 2024 | महाराष्ट्रात निवडणुकांच्या तयारीची लगबग, ४ नोव्हेंबरला बंडखोर काय करणार?
"महाराष्ट्रात महिला भगिनींचा अपमान करणं, हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महिलांचा अपमान केला, त्यांना लाडक्या बहिणी घरी बसवतील. त्यांना योग्य ती जागा दाखवली जाईल. बाळासाहेब आज असते आणि जर एखाद्या शिवसैनिकाने असे उद्गार काढले असते, तर त्याचे थोपाड फोडलं असतं. लाडक्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना त्या कायमचे घरी बसवतील", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या विधानावर बोलताना दिली.
लातूर जिल्ह्यात लिंगायत मतपेढीही प्रभावशील मानली जाते. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात लिंगायत समुदाय मोठ्या संख्येत असून, त्यांची मतपेढी यावेळी कोणाच्या बाजूने राहील, यावर जिल्ह्यात आतापासूनच चर्चेचे फड रंगू लागले आहेत. सविस्तर वाचा…
महायुतीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात शिवसेनेनेही (एकनाथ शिंदे) उमेदवारांना एबी अर्ज दिले आहेत. सविस्तर वाचा…
अकोला, वाशीम जिल्ह्यातील विधानसभेच्या आठही मतदारसंघांमध्ये यावेळेस तिरंगी व चौरंगी लढतीचे चित्र आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुती, मविआ व वंचित आघाडी यांच्यात तिरंगी सामना होईल. काही मतदारसंघात प्रभावशील नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने त्या ठिकाणी चौरंगी लढतीचे संकेत आहेत. सविस्तर वाचा…
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात २०० च्या वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत होणाऱ्या १४ उमेदवारांमध्ये चारजण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहेत. इतर १० जणांनी यापूर्वी एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा निवडणूक लढविली आहे. सविस्तर वाचा…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धृतराष्ट म्हणणारे नारायण राणे यांनी तर मुलांसाठी भाजपला खिंडार पाडले, त्यामुळे भाजपने तो यावेळी वचपा काढला पाहिजे. राणे व दिपक केसरकर यांनी शिवसेनेला दगा दिला, शिवसेना संपवण्याची भाषा करत आहेत. आता जनतेसह जुन्या शिवसैनिकांनी राणे यांची घराणेशाही व केसरकर यांच्या ढोंगीपणाचा पराभव करून जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जुन्या शिवसैनिकांनी कडून करण्यात आले आहे.
शिवसेना (उबाठा) राजन तेली यांच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत उमेदवार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उमेश कोरगावकर बोलत होते. यावेळी रमेश गावकर,शब्बीर मणियार, मंदार शिरसाट, सुंदर गावडे, शैलैश गवंडळकर, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी महायुतीत विसंवादाच्या घटना घडत असताना मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. सविस्तर वाचा…
माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत संभाजी पवार या जुन्या भागीदारांचे राजकीय वारस नायगाव विधानसभा मतदारसंघात परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सविस्तर वाचा…
Devendra Fadnavis on Maharashtra Assembly Election: महायुतीतील बंडखोरीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया...
आमचेच लोक आहेत. त्यांना समजावून सांगणं आमचं कर्तव्य आहे. अनेकदा रोष मोठा असतो. पण शेवटी पक्षाचं व्यापक हित लक्षात घेऊन सगळ्यांनी मानसिकता दर्शवली आहे. मला विश्वास आहे की आम्ही सगळ्यांना समजावण्यात यशस्वी ठरू - देवेंद्र फडणवीस</p>
महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा गुजराती कँप यांना निवडणुकीत विजयी करायचं नाही हे जनतेने ठरवलं आहे. हा जनतेचा आत्मविश्वास आहे, अतिआत्मविश्वास नाही. तसंच मनसेला मदत करणं या मागे भाजपाचा हेतू हा फक्त शिवसेनेची मतं कापण्याचा आहे. हे त्यांचं राष्ट्रीय धोरण आहे अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यांत अनेक महत्वाच्या लढती पहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माहीम येथील निवडणूक . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवणार असून त्यामुळे तेथे मनसे वि. शिवसेना ठाकरे गट वि. शिवसेना शिंदे गट अशी बिग फाईट पहायला मिळणार आहे. माहीम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे ठरवल्यामुळे सरवणकर यांनी फॉर्म मागे घ्यावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र सरवणकर हे अद्याप आपल्या भूमिकेवरच ठाम आहेत. अशी माहिती समोर येते आहे. त्यामुळे माहीमच्या जागेचा पेच भाजपासह महायुती सोडवणार का? हा प्रश्न आहे.
करुणा शर्मा यांना अश्रू अनावर झाले कारण त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख राक्षस असा करत आपलं म्हणणं इन्स्टाग्रामवर मांडलं आहे.
महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे त्यामुळेच..महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता. असं करुणा शर्मा म्हणाल्या, तसंच त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख राक्षस असा केला आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोहोंकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. आता नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.