Maharashtra Political News Today : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिले आहे. त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले. या विषयावरून दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद अद्यापही सुरू आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दुसरीकडे २७ फेब्रुवारी रोजी देशभरात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी कोण-कोण उमेदवार दिले जाणार याची चर्चा सुरू आहे. नुकतीच पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. तर मराठा आरक्षणासाठी १० फेब्रुवारीपासून बेमूदत उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आज ते छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात दौऱ्यासाठी आले आहेत. नाशिकमध्ये येऊन ते भुजबळ यांच्याबद्दल काय बोलतात, याकडेही आपले लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Live News Today 08 February 2024

20:17 (IST) 8 Feb 2024
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे. माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला माहिती देताना या घटनेला दुजोरा दिला. अभिषेक घोसाळकर यांना दहीसर पश्चिम येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा गोळीबार कुणी केला? का केला? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सविस्तर वृत्त वाचा

19:46 (IST) 8 Feb 2024
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रघुराम राजन यांचे नाव देण्याची शक्यता

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रिझर्व्ह बँकेचे माझी गव्हर्नर रघुराम राजन यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त दिले असले तरी अद्याप काँग्रेस किंवा राजन यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

17:43 (IST) 8 Feb 2024
२८ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. महायुती सरकारचा या विधानसभेतील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू होईल. २६ फेब्रुवारी पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून २८ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील.

17:03 (IST) 8 Feb 2024
"शिवसेना सोडा, पंक्षातर करा, नाहीतर तुरुंगात जा", उबाठा गटाच्या नेत्यांना धमकी

"शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे", असे ट्विट शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1755545704674848813

17:02 (IST) 8 Feb 2024
तासगाव तालुक्यात तरुणाचा खून

सांगली : सावळज (ता. तासगाव) येथील भारत उर्फ संतोष संजय पाटील (वय 29) याचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता उघडकीस आली असून त्याच्या आईच्या तक्रारीनंतर चार जणांना तासगाव पोलीसांनी गुरूवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मृत तरूण बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता बाहेर जाउन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. बराच वेळ घरी आला नाही म्हणून शोध घेतला असता संजय पवार यांच्या शेततळ्याजवळ कच्च्या रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तरूणाची आई वैशाली पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून काही जणांवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, खूनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

16:55 (IST) 8 Feb 2024
“उत्तर नागपुरातील उड्डाण पूल बांधकामाचे चुकीचे नियोजन,” नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचा आक्षेप

नागपूर : उड्डाण पुलाची चुकीची रचना आणि उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने उत्तर नागपुरातील नागरिकांना रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडे ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

वाचा सविस्तर...

16:31 (IST) 8 Feb 2024
नागपूर : फडणवीस यांची ग्रामस्थांशी ‘चाय पे चर्चा‘, म्हणाले…

नागपूर: भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यपातळीवर ‘गाव चलो’ अभियान सुरू केले आहे. नागपूरमध्ये या योजनेची सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह बुथपातळीवरील सर्व प्रमुख आणि स्थानिक नेते त्यात सहभागी झाले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील पारडशिंगा या गावाला भेट दिली. त्यानंतर हातला गावाला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी ‘चायपे चर्चा’ केली.

वाचा सविस्तर...

16:26 (IST) 8 Feb 2024
"उद्धव ठाकरेंबरोबर जे जातात, ते रसातळाला..", आशिष शेलारांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, काँग्रेस मुंबईत आता लोणच्यालाही उरणार नाही. जे जे लोक उद्धव ठाकरेंबरोबर जातात, ते रसातळाला गेल्याशिवाय राहत नाहीत, असेही ते म्हणाले.

16:13 (IST) 8 Feb 2024
किमान समान कार्यक्रमाशिवाय आघाडी अशक्य, ॲड. प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून घालवयाचे आहे, केवळ एवढ्यासाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवेसनेच्या आघाडीत सहभागी व्हावे असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. किमान समान कार्यक्रम निश्चित झाल्याशिवाय आम्ही आघाडीत सामील होणे अशक्य आहे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

वाचा सविस्तर...

16:06 (IST) 8 Feb 2024
पुण्यातील तरुणाचा अनैतिक संबंधातून गुवाहाटीत खून, महिलेसह दोघांना अटक

आरोपी अंजलीची संदीप याच्याशी कोलकात्ता येथील विमानतळावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

सविस्तर वाचा...

15:59 (IST) 8 Feb 2024
“दीक्षाभूमीवर ५६ फूट उंच तथागत बुद्धाची मूर्ती,” भदंत सुरेई ससाई यांची माहिती

नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांची चलितमुद्रेतील ५६ फूट उंचीची मूर्ती नागपूरच्या दीक्षाभूमीवर आली असून लवकरच तेथे तिची स्थापना करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

15:46 (IST) 8 Feb 2024
नाशिक : बाल येशू यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक - नाशिकरोड येथील बाल येशू चर्च येथे १० आणि ११ फेब्रुवारी रोजी बाल येशू यात्रा होणार आहे. या दिवशी दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

15:44 (IST) 8 Feb 2024
यंदा ठाण्याच्या गृहउत्सवात शंभरहून अधिक प्रकल्प, क्रेडाई-एमसीएचआय संस्थेचे मालमत्ता प्रदर्शन

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेकडून यंदाही शहरात मालमत्ता प्रदर्शनाच्या माध्यमातून गृहउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात शंभरहून अधिक गृहप्रकल्पांचा समावेश असून या प्रदर्शनात विनामुल्य प्रवेश असणार आहे.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 8 Feb 2024
मेट्रो ६ मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी दोन निविदा सादर, लवकरच निविदा अंतिम करणार

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मेट्रो ६ मार्गिकेच्या कंजूरमार्गमधील कारशेडच्या कामाला मे-जूनमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करणार आहे. या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदा लवकरच अंतिम होणार आहे. दोन कंपन्यांनी आर्थिक निविदा सादर केल्या असून यात सर्वात कमी बोली सॅम इंडिया बिल्टवेल कंपनीची आहे. त्यामुळे या कंपनीला कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 8 Feb 2024
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक – शहरात आयोजित ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी चार वाजता होणार आहे. त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 8 Feb 2024
गाव चलो अभियानात भाजपचे दिंडोरी मतदारसंघावर लक्ष; मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचा ३०० गावांत मुक्काम

नाशिक – भाजपच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या गाव चलो अभियानांतर्गत मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्काम करून केंद्र सरकारच्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. जिल्ह्याचा विचार करता या अभियानासाठी ३०० गावांची निवड करण्यात आली आहे. ही बहुसंख्य गावे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आहेत.

सविस्तर वाचा...

15:39 (IST) 8 Feb 2024
मध्यान्ह भोजनातील अंड्याला धार्मिक संघटनांचा विरोध, सरकारने घेतला ‘हा’ नवा निर्णय

मुंबई : शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्या निर्णयाला शहरातील धार्मिक संस्थांकडून जोरदार विरोध होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन ४० टक्के विद्यार्थी किंवा पालकांनी अंड्याला विरोध केल्यास विद्यार्थ्यांना फळे देण्यात येतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने त्यासाठी नवा अध्यादेशही जारी केला आहे.

सविस्तर वाचा...

15:39 (IST) 8 Feb 2024
जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकावर आधारित वेब मालिका येणार, ‘रानबाजार २’चीही घोषणा

मुंबई : ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी वाहिनीने कार्य विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या आशयनिर्मिती संबंधित समितीवर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अभिजीत पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी पानसे यांच्या नियुक्तीबरोबरच त्यांनीच लिहिलेल्या ‘रानबाजार’ या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय, जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या ‘पुरुष’ या नाटकावर वेबमालिकेची निर्मिती करणार असल्याचेही पानसे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 8 Feb 2024
अजनी रेल्वे स्थानकावरील बुकिंग कार्यालय तात्पुरते स्थलांतर

नागपूर : अजनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे येथील सुविधांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येत आहे. बुधवारपासून विद्यमान बुकिंग कार्यालय, प्रतीक्षालय, विश्राम कक्ष आणि इतर संबंधित कार्यालये तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत. अजनी स्थानकावर तात्पुरते बुकिंग ऑफिस, वेटिंग हॉल आणि रिटायरिंग रूमसह इतर सोयीसुविधा वर्धा एन्डला सुमारे १०० मीटर अंतरावर, दुचाकी पार्किंग क्षेत्राजवळ उभारण्यात आल्या आहेत. स्थानकाचे पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर असताना प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधांचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे.

15:18 (IST) 8 Feb 2024
झिशान सिद्दीकी काँग्रेसमध्ये राहणार की सोडणार? वर्षा गायकवाड यांनी दिले उत्तर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी काय करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, झिशान सिद्दीकीशी माझं बोलणं झालं आहे. ते पक्षातच राहणार असा शब्द दिला आहे. त्यांना काँग्रेसने खूप काही दिलं आहे.

14:58 (IST) 8 Feb 2024
पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ कधी होणार? खासदार श्रीरंग बारणे यांच्या हिंदीतील प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया मराठीत म्हणाले…

पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विमानतळावर भारतीय वायु सेनेच्या विमानांचे प्रमाण जास्त आहे.

सविस्तर वाचा...

14:47 (IST) 8 Feb 2024
छत्रपती संभाजीनगर : हायवा-दुचाकी अपघातात तीन बहीण-भावंडांचा मृत्यू

वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहिण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

14:47 (IST) 8 Feb 2024
कोथरूडमधील थोरात उद्यानात मोनोरेल; प्रकल्पाला पुणेकरांचा विरोध… जाणून घ्या कारण

स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवून त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली होती. त्याचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांना देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

14:33 (IST) 8 Feb 2024
करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाची शक्यता; नवी मुंबई महापालिकेच्या ठेवी १,३८४ कोटींवरून १,५०० कोटींवर जाणार

नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पुढील काही दिवसांत सादर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नसलेलाच अर्थसंकल्प सादर होणार असल्याची शक्यता असून यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या १,३८४ कोटींच्या ठेवींच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ठेवींमध्ये वाढ होत या ठेवी १,५०० कोटी होणार आहेत.

सविस्तर वाचा…

14:30 (IST) 8 Feb 2024
पदपथांवरील पार्किंगमुळे कोपरखैरणेवासीय त्रस्त; परिसरातील उपहासात्मक फलक चर्चेचा विषय

कोपरखैरणेत पार्किंग समस्येने उग्र रूप धारण केले आहे. रस्त्यावरून दुतर्फा पार्किंग आणि पदपथावरही दुचाकी पार्किंगमुळे लोकांनी चालावे कसे असा प्रश्न आहे. त्यात एका अनोळखी व्यक्तीने एक फलक लावला आहे. सविस्तर वाचा…

13:48 (IST) 8 Feb 2024
सुशासन निर्देशांकात रायगड जिल्हा राज्यात प्रथम

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर वाचा...

13:27 (IST) 8 Feb 2024
वाशीम : पैशांचा पाऊस…८ लाखाचे दुप्पट …अन पोलीस बनून लूट!

वाशीम : महाराज असल्याचा बनाव करून जादूटोण्याने भस्माच्या डबीतून दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष देत एका व्यक्तीची ८ लाख रुपयाने फसवणूक झाल्याचा प्रकार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून यामध्ये राज्य स्तरीय टोळीचा सहभाग असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनी दिली.

वाचा सविस्तर...

13:26 (IST) 8 Feb 2024
राज्याच्या काही भागात पावसाचे सावट

नागपूर : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागातून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे. मात्र, त्याचवेळी आता विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

13:22 (IST) 8 Feb 2024
विद्यार्थ्यांना सहजपणे मिळणार इंटर्नशिप! विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये आता इंटर्नशिप सेल!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांकडून कार्य प्रशिक्षण कक्ष (इंटर्नशिप सेल) स्थापन करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 8 Feb 2024
'पुणे की पसंत मोरे वसंत', मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मनसेचे नेते वंसत मोरे इच्छूक असल्याचे अनेकदा दिसले आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक ठेवलेले स्टेटस सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. "आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत" असं स्टेटस वसंत मोरे यांनी ठेवलं आहे.

Maharashtra News Live Today 28 August 2023

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Story img Loader