Mumbai Pune Live News Updates, 24 September 2024 : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा देखील सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील आणि देशातील घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 24 September 2024

12:42 (IST) 24 Sep 2024
सागरी किनारा रस्त्यासाठी हजारो झाडांचा बळी? बेलापूरमध्ये मानवी साखळी आंदोलन करत नागरिकांचा तीव्र विरोध

नवी मुंबई : परिसरात स्वत: लावलेल्या व निर्माण केलेल्या निसर्ग संपदेवर घाला घातला जाणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करत सिडकोचा तीव्र निषेध केला.

सविस्तर वाचा...

12:23 (IST) 24 Sep 2024
"आरोपीने हातात बेड्या असताना बंदूक कशी काढली", सुषमा अंधारे यांचा सवाल

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, आरोपीने हातात बेड्या असताना बंदूक कशी काढली? अक्षय शिंदे मतिमंद होता हे पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग अक्षय शिंदे एवढा हिंस्त्र कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलिसांनी द्यायला हवी", असं सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

12:06 (IST) 24 Sep 2024
सोलापूर : अजित पवारांनी इशारा देऊनही मोहोळमध्ये दोन पाटलांचा संघर्ष सुरूच

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आणि सध्या अजित पवार यांचा दुसरा गट अस्तित्वात असताना या पक्षात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना, त्याच मुहूर्तावर राजन पाटील यांच्या विरोधात मोहोळ बंद पुकारण्यात आला. त्यामुळे अखेर अजित पवार यांना उमेश पाटील यांच्या उपद्रवाची दखल घ्यावी लागली.

सविस्तर वाचा....

12:00 (IST) 24 Sep 2024
महाविकास आघाडीला ‘निर्भय बनो’ चा पाठिंबा, जाहीरनाम्यात मुद्द्यांचा समावेश करण्याची मागणी

पुणे : महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या ‘निर्भय बनो’ या जनआंदोलनाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात ‘निर्भय बनो’ च्या मुद्द्यांचा समावेश करावा, अशी मागणी महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

11:59 (IST) 24 Sep 2024
"काही लपवायचं आहे म्हणून एन्काऊंटर...", संजय राऊतांचा गंभीर आरोप

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारला अनेक सवाल विचारले आहेत. राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. त्या आरोपीला जलदगती न्यायालय खटला चालून आरोपीला शिक्षा द्यायला पाहिजे होती. मात्र, हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यामधून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे. काही लपवायचं आहे म्हणून एन्काऊंटर आहे का?", असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

11:35 (IST) 24 Sep 2024
सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग, लोणीकंद पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

पुणे : सोसायटीतील गणेशोत्सव रहिवासी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हर्ष कपूर (रा. कोणार्क एक्झोटिका, वाघोली-केसनंद रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा सविस्तर...

11:28 (IST) 24 Sep 2024
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी

नांदेड : भारतीय जनता पार्टीत अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांचे किंवा त्यांचे वारसदारांचे राजकीय लाड करताना पक्षातील जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांबाबत सापत्न भाव नको, अशी भूमिका मांडत एका शिष्टमंडळाने मराठवाड्यात विधानसभेच्या चार जागांवर पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

वाचा सविस्तर...

11:02 (IST) 24 Sep 2024
ठाकरे गटातील दुफळीचा दादा भुसेंना आधार

मालेगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची आशा मावळल्यानंतर बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटातील या घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर...

10:47 (IST) 24 Sep 2024
दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांसह तिघांना सक्तमजुरी

पुणे : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या इंदापूर तालुका शाखेत आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक अविनाश घोलप यांच्यासह बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

वाचा सविस्तर...

10:46 (IST) 24 Sep 2024
ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : ईडीकडून दिल्ली, जळगाव व अहमदाबादमध्ये छापे

मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली, जळगाव व अहमदाबाद येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले.

वाचा सविस्तर...

10:21 (IST) 24 Sep 2024
"अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा मुख्य आरोपीला...", संजय राऊतांचा गंभीर आरोप

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर हा मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हे झालेलं आहे. ज्या शाळेत हे प्रकरण घडलं त्या ठिकाणी साफसफाईचं हा आरोपी काम करत होता. मग साफसफाईचं काम करणारा मुलगा पोलिसांची बंदुक घेऊन फायर करेल हे कोणाला पटेल का?", असा सवाल संजय राऊत यांनी केला.

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

Akshay Shinde

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे