School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधारी व विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे मेळावे, पदयात्रा, जाहीर सभा चालू आहेत. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. यासह कोलकाता येथे झालेल्या बलात्कार व खूनप्रकरणी आज (२० ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंबंधीच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल. बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. स्थानिक नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केल्यामुळे मुंबई लोकलसह मेल व एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Live Updates

Marathi News Live Update, 20 August 2024 : राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा

18:38 (IST) 20 Aug 2024
अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, हटवले आंदोलक, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा

बदलापूर : आंदोलक जुमानत नसल्याने अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे रूळ मोकळा केला. पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर आंदोलन रुळावरून हटले. यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली.

वाचा सविस्तर...

18:27 (IST) 20 Aug 2024
तळजाई टेकडी परिसरात लूटमार करणारे गजाआड

पुणे: तळजाई टेकडी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चाेरट्यांना सहकारनगर पोलिसांनी गजाआड केले.गणेश अनंत काथवटे (वय २३), अमित बाबू ढावरे (वय २६, दोघे रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तळजाई टेकडी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत चोरटे असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती.

सविस्तर वाचा

18:10 (IST) 20 Aug 2024
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला

अलिबाग- मुंबई गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा या मागणीसाठी जनआक्रोश समितीकडून आज माणगाव बंदची हाक देण्यात आली होती. या माणगावकरांनी कडकडीत बंद पाळत यास प्रतिसाद दिला. यानंतर आंदोलक आणि स्थानिकांनी रस्त्यावर उतरून महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सविस्तर वाचा....

18:06 (IST) 20 Aug 2024
बदलापूर स्थानकातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, रेल्वे ट्रॅक झाले मोकळे

मंत्री गिरीश महाजन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतरही आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. अखेर १० तास रेल्वेचा खोळंबा झाल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलीस अधीक्षकांनी अधिक पोलीसफाटा बोलावल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून रेल्वे ट्रॅक मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. काही वेळातच बदलापूरमार्गे लोकल व मेल-एक्सप्रेस सेवा सुरू होऊ शकते.

18:04 (IST) 20 Aug 2024
‘मेट्रो २ ब’: कुर्ल्यातील गर्डरच्या उंचीचा मुद्दा आता विमानतळ प्राधिकरणाकडे; एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाला पत्रव्यवहार करणार

मुंबई : ‘अंधेरी पश्चिम - मानखुर्द, मंडाळे मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील कुर्ला हलावपुलावरील गर्डरची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गर्डरची उंची वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला  आहे. ज्या ठिकाणी गर्डर उभा करण्यात आला आहे, तो भाग फनेल झोनमध्ये येतो, त्यामुळे एका निश्चित मर्यादेपलिकडे उंची वाढविता येणार नाही, अशी भूमिका एमएमआरडीएने घेतली होती.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 20 Aug 2024
रामदास कदम यांच्या विरोधात भाजपची कर्जतमध्ये निदर्शने

अलिबाग- शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांचे पडसाद आज रायगड जिल्ह्यात उमटले. भाजपच्या वतीने रामदास कदम यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. युतीचे वातावरण आम्हाला खराब करायचे नाही. पण आमच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा थेट इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला.

17:44 (IST) 20 Aug 2024
अभ्युदय नगर पुनर्विकासात म्हाडाकडून किमान ४९९ चौरस फुटाचे घर! रहिवाशांकडून मात्र ७५० चौरस फुटाची मागणी

मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत करण्याचे निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) या प्रकल्पाची व्यवहार्यता निश्चित करुमून किमान ४९९ चौरस फुटाचे घर रहिवाशांना देऊ केले आहे. रहिवाशांकडून मात्र ७५० चौरस फुटाची मागणी केली जात आहे.

सविस्तर वाचा

17:28 (IST) 20 Aug 2024
" तुमची मुलगी असती तर, सरकारने काय केलं असतं ? " बदलापुरातील संतप्त आंदोलकांचा गिरीश महाजन यांना सवाल

बदलापूर: येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या आठ तासांपासून ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांची गिरीश महाजन यांनी भेट घेतली. यावेळी आंदोलकांपैकी एका महिलेने गिरीश महाजन यांना सवाल केला की या ठिकाणी " तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं ? " असा सवाल करताच सर्व आंदोलकांनी एकच घोषणा करत आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी केली.

सविस्तर वाचा

17:11 (IST) 20 Aug 2024
खारघरच्या मेडीकव्हर रुग्णालयाला 'बॉम्ब' धमकीचा मेल

पनवेल ः पनवेल शीव महामार्गालगत खारघर वसाहतीमधील मेडीकव्हर रुग्णालयाला सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सूमारास बॉम्बने रुग्णालय उडवून देऊ असा इ मेल आल्याने सूरक्षा यंत्रणेसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. अखेर अडीच तास रुग्णालयाची बॉम्ब शोधक पथकाने संपुर्ण तपासणी केल्यावर हा खोडसाळपणा असल्याचे सिद्ध झाले. परंतू हे अडीच तास रुग्ण व रुग्णालयातील कर्मचा-यांच्या जिवाचा ठोका चुकविणारे होते. 

शंभराहून अधिक रुग्ण खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात सोमवारी उपचार घेत होते. यातील अनेक रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याने बॉम्बने रुग्णालयाची इमारत उडवून देण्याच्या धमकीमुळे अचानक रुग्ण इतर कोणत्या रुग्णालयात दाखल करावे असा पेच निर्माण झाला. खारघर पोलीसांना याबाबत माहिती मेडिकव्हर रुग्णालयाच्या सूरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी विनोद राऊत यांनी कळविली. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांसह बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब नष्ट कऱणारे पथक आणि वाढीव पोलीसांचा बंदोबस्त काही क्षणात रुग्णालयात लावण्यात आला. याच दरम्यान नवी मुंबई पोलीसांचे सायबर सेल ज्यामेलवरुन धमकी देण्यात आली. त्याच्या माग काढत होते. अखेर अडीच तासांच्या तपासणीनंतर पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला. या दरम्यान रुग्ण भितीच्या सावटाखाली होते.

17:08 (IST) 20 Aug 2024
धक्कादायक : पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी केली अटक

पुणे शहरातील भवानी पेठेतील एका शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीवर १९ वर्षीय तरुणाने १५ ऑगस्ट रोजी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली.

वाचा सविस्तर...

16:53 (IST) 20 Aug 2024
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करणार; तंबाखूमुक्त युवा मोहिमेंतर्गत राबवणार उपक्रम

मुंबई : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रातर्फे नागरिकांना तंबाखू सेवनाची सवय सोडण्यासाठी मदत करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तंबाखूजन्य आजार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 20 Aug 2024
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर अर्ध्या तासाच्या पावसात कालव्यासदृश स्थिती निर्माण होण्यामागे कमी क्षमतेची निचरा व्यवस्था आणि त्यात अडकलेल्या कचरा-मातीमुळे निचरा होण्यात आलेले अडथळे, ही प्रमुख कारणे असल्याचे उघड झाले आहे. शहरातून जाणाऱ्या सहा किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावर सध्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चार इंच क्षमतेच्या वाहिन्यांची व्यवस्था आहे. मुसळधार पावसात ती अपुरी असल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचआय) आता तिची क्षमता विस्तारण्याचे निश्चित केले आहे.

वाचा सविस्तर...

16:42 (IST) 20 Aug 2024
"पोलिसांनी चिमुकल्यांचा पालकांना १३ तास ताटकळत ठेवलं", बदलापूर प्रकरणावरून अनिल देशमुखांचा आरोप

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1825832175154962817

16:31 (IST) 20 Aug 2024
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार

पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार झाला. याप्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, रा. महालगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 20 Aug 2024
आंतरराष्ट्रीय सनातन आयोगाची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकाकर्त्यांना दहा हजारांचा दंड

मुंबई : राज्यातील गुंफा मंदिरांमधील हिंदू विधींसाठी निधी, आंतरराष्ट्रीय सनातन आयोगाची स्थापना आणि अनेक असंबद्ध मागण्यांसाठी क्राइमिओफोबिया या स्वयंघोषित संस्थेने दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. तसेच, अशी उथळ याचिका करून न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंडही सुनावला.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 20 Aug 2024
नागपूर पोलिसांना झाले तरी काय? शेजाऱ्याला बेदम मारहाण, हात मोडला, आखणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा

नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. गेल्या दोनच दिवसांपूर्वी चक्क कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या मनोज घाडगे आणि भूषण शाहूसाखळे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले तर यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण करून त्याचा हातच मोडून टाकला. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा....

16:18 (IST) 20 Aug 2024
आयएएस शुभम गुप्ता यांचा आणखी एक प्रताप; महिलेला बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले

गडचिरोली : भामरागड एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेते घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी आयएएस शुभम गुप्ता यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

सविस्तर वाचा....

15:51 (IST) 20 Aug 2024
पोलिसांकडून राखी पौर्णिमेची अनोखी भेट; गहाळ झालेले ४० मोबाइल संच तक्रारदारांना परत

पुणे : गर्दीच्या ठिकाणांवरुन मोबाइल संच चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा का मोबाइल संच चोरीला गेला तर परत मिळण्याची शाश्वती नसते. विश्रांतवाडी पोलिसांनी तपास करून तक्रारदारांचे गहाळ, तसेच चोरीला गेलेले मोबाइल संच तांत्रिक तपास करून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आणि कर्नाटकातून शोधून काढले.

सविस्तर वाचा

15:46 (IST) 20 Aug 2024
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर जेष्ठ महिलेचा अपघाती मृत्यू

पनवेल ः पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी पहाटे साडेचार वाजता मोटारीला ट्रकने मागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सीवूड्स येथे राहणा-या जेष्ठ महिला ठार तर कुटूंबातील इतर सदस्य जखमी झाले. जखमींमध्ये १० वर्षीय मुलीचा समावेश आहे. 

सीवूड्स येथील सेक्टर ५० मधील सोमय्या दर्शन या इमारतीमध्ये राहणारे दिनेश शिंदे हे पुणे येथून आपल्या घरी नवी मुंबईत सीवूड्सला द्रुतगती महामार्गावर जात असताना आदई गावाजवळील पुलावरील महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेवरुन मोटार चालवित होते. दिनेश यांच्या मोटारीच्या मागून ट्रकचालक वडी वेलन बोस याने ट्रक दामटविण्याच्या प्रयत्नात मोटारीला धडक दिली.

भरधाव वेगाने ट्रकने मारलेल्या धडकेमुळे मोटारीच्या मागील आसनावर बसलेल्या दिनेश यांच्या आई निर्मला शिंदे या ठार झाल्या तर दिनेश यांच्यासह त्यांची पत्नी शिल्पा, मुलगा वैष्णव आणि मुलगी अदिती हे सुद्धा जखमी झाले. खांदेश्वर पोलीसांनी या अपघाताप्रकरणी ट्रकचालक वडी वेलन बोस याला अटक केली आहे.

15:35 (IST) 20 Aug 2024
Badlapur School Case : बदलापूरातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग; शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश

ठाणे : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागताच, या घटनेनंतर खडबडून जाग आलेले ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 20 Aug 2024
बदलापूर-कर्जत रेल्वे वाहतूक ठप्पच, सहा तासानंतरही ठिय्या आंदोलन कायम

ठाणे : बदलापूर येथे उत्स्फूर्तपणे झालेल्या आंदोलनाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर बसला. कर्जत, खोपोली, बदलापूरहून सुटणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या ठाणे, मुंबईच्या दिशेने येऊ शकल्या नाही. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला. रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी अशी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू ठेवली होती.

सविस्तर वाचा

15:21 (IST) 20 Aug 2024
‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…

MPSC combine exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त गट-ब व गट-क-२०२४ च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना वर्ष उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा....

15:16 (IST) 20 Aug 2024
उरण-पनवेल रस्त्यावर खड्ड्यांमुळे ‘धूळ’वड

उरण : राज्य महामार्ग असणाऱ्या उरण पनवेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने वाहनांमुळे खड्ड्यातील धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा पावसाळ्यानंतरही होणारा त्रास कधी संपणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

वाचा सविस्तर...

15:16 (IST) 20 Aug 2024
Badlapur School Case : “तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”, महिला पत्रकारावर शिंदे गटाच्या नेत्याची वादग्रस्त टिप्पणी!

School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदारावर आगपाखड केली आहे. म्हात्रे यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 20 Aug 2024
पुणे : महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पावले!

पुणे : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढविण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात आणखी ८३ सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. याचबरोबर आवारात आणखी १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

वाचा सविस्तर...

14:32 (IST) 20 Aug 2024
गुगल मॅपवर जाणारा ट्रक उक्षी घाटात अडकल्याने वाहतूक खोळंबली

रत्नागिरी : गूगल मॅपचा आधार घेत मुंबई गोवा महामार्गावरून निवळी मार्गे उक्षी घाटातून जाणारा ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावल्याने ४०० फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना होता होता टळली. ही घटना सोमवारी १९ऑगस्टला सायंकाळी उशिरा घडली.

वाचा सविस्तर...

14:32 (IST) 20 Aug 2024
मित्रांच्या भांडणात एकाचा मृत्यू

पनवेल ः पनवेल तालुक्यातील उसर्ली गावात मित्रांची पार्टी सूरु असताना झालेल्या क्षुल्लक भांडणात एका मित्राचा जीव गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. याबाबत एका जागरुक रुग्णवाहिका चालकाने पोलीसांनी अकस्मात मृत्यूमागील संशय व्यक्त केल्यावर हत्येचा उलगडा झाला. याप्रकऱणी पोलीसांनी ३८ वर्षीय रविचंद्रपाल मेवाती याला सोमवारी रात्री अटक केली. 

पनवेल येथील उसर्ली गावातील ओमेगा इमारतीमधील एका सदनिकेत दोन दिवसांपूर्वी (रविवारी) रविचंद्रपाल, २७ वर्षीय विजय कळसे व इतर दोन मित्र पार्टी करत होते. पार्टी सूरु असताना विजय व रविचंद्र यांच्यात  भांडण झाले. इतर मित्रांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान रविचंद्रपालने विजयला मारहाण केल्याने विजय बेशुद्ध झाला. यानंतर विजयला बेशुद्ध अवस्थेत पनवेल शहरात नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले.

मात्र विजयच्या अंगावर डाव्याबाजूला छातीवर तिक्ष्ण हत्याराने भोसकल्याचे व्रण दिसल्यावर डॉक्टर व रुग्णवाहिका चालकाला संशय आला. रुग्णवाहिका चालकाच्या तक्रारीनंतर पोलीसांनी संशयीत इतर मित्रांकडे चौकशी केल्यावर रविचंद्रपालने विजयला मारल्याची बाब उजेडात आली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने हत्येचा गुन्हा दाखल करुन रविचंद्रपाल याला अटक केली आहे.

13:52 (IST) 20 Aug 2024
ना सेल्फी, ना फोटो, ना मोबाईल… तरीही पक्ष कार्यकर्त्यांना मिळणार प्रशिक्षण

वर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने प्रत्येक राजकीय पक्ष विविध परीने तयारीस लागल्याचे चित्र आहे. रस्त्यावर लढून राजकारण करणारा पक्ष, असे संघटनेस महत्व नं देणारे काँग्रेस नेते कधी काळी म्हणत. मात्र आता भाजपच्या धर्तीवर काँग्रेस पण संघटनात्मक कार्यक्रम आखू लागला आहे. आता तर संवादात्मक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू होणार.

वाचा सविस्तर...

13:03 (IST) 20 Aug 2024
बदलापुरातील आंदोलन चिघळलं, तीन तासांच्या रेल रोकोनंतर आंदोलक व पोलीस आमनेसामने, तणाव वाढला

बदलापूरमधील नागरिकांचं आंदोलन चिघळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांनी तीन तासांपासून रेल्वे थांबवल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या अधिक तुकड्यांना पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांवर दगडफेक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

13:00 (IST) 20 Aug 2024
उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच

उरण : शासनाची मंजुरी मिळूनही मागील १४ वर्षांपासून रखडलेल्या उरणच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ८४ कोटी पैकी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. त्यामुळे उरणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.

अनेक वर्षे हे रुग्णालय रखडल्याने ५६ कोटी रुपयांच्या बांधकाम खर्चात वाढ होऊन तो ८४ कोटींवर पोहचला आहे. मात्र निधी वेळेत न मिळाल्यास या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उरणच्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलने केल्यानंतर शासनाने प्रशासकीय खर्चाला अखेर मंजुरी दिली आहे. यासाठी आ. महेश बालदी यांनी पाठपुरावा केला आहे. मात्र यासाठी उरणकरांना तब्बल दीड दशकांची प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे उरण येथे शंभर खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय तसेच अधिकारी व कर्मचारी निवासांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यातही वैद्याकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान हे उरण शहरातील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असेल तर रुग्णालय उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा येथे असेल.

sanjay raut NDA

संजय राऊत - नवाब मलिक

“नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’, देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावं…”, संजय राऊत यांची मागणी

महायुतीत ऑल इज नॉट वेल अशीच परिस्थिती आहे. जागा वाटपाच्या बैठकीत रक्ताचे पाट वाहू शकतात असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच नवाब मलिक हे आत्ता सत्ताधारी पक्षात आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केलं पाहिजे की त्यांच्यावर खोटे आरोप केले होते. नवाब मलिक यांना अडकवण्यात आलं होतं, आमच्यावर जसे खोटे आरोप केले तसेच खोटे आरोप नवाब मलिकांवर करण्यात आले हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसंच लवकरच एक चित्रपट येतोय येक नंबर नावाचा. त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे येक नंबर खोटारडे आहेत अशीही बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

“महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. ती युती नाही, संघर्ष होतो आहे. रोज त्यांच्या मारामाऱ्या सुरु आहेत त्या दिसत नाहीत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण टोकाला गेलं आहे हे पाहू शकता. कारण मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनला आहे. ठेकेदारांकडून महाराष्ट्रात लूट सुरु आहे. पाटबंधारे खातं, रस्ते विकास खातं हे सगळी शिंदे गटाची एटीएम मशीन्स झाली आहेत त्यामुळे कामं होत नाहीत अशी स्थिती आहे. सरकार पैशांच्या मागे लागलं आहे. खड्ड्यांमध्ये अपघात होऊन लोकांचे मृत्यू होत आहेत मात्र सरकारचं लक्ष नाही. जागावाटपावरुनही यांच्यात मारामाऱ्या होणार आहेत, खून खराबा होऊ एवढीच आमची इच्छा आहे.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.