महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक संशयी आत्मा आहेत. दिवसातला अर्धा दिवस हा त्यांचा संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्रात जातो. त्यांना असंही वाटलं असेल की बदलापूरचं आंदोलन हे पण जादूटोणा झाल्यानेच झालं असेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते म्हणाले आपले मुख्यमंत्री जादूटोणाप्रेमी आहेत. पण त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर कळेल की लाखो लोक चिडून रस्त्यावर उतरले. तुमच्या मुलाच्या मतदारसंघात लोक उतरले. तुमचा मुलगा तिथला खासदार आहे हे विसरु नका असं संजय राऊत म्हणाले आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी राखी पौर्णिमेबाबत प्रश्न विचारला असता मी नाशिकला होते असं म्हणत उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात बदलापूरसारख्या घटना घडणं निंदनीय आहे. महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार हे सरकार थांबवू शकत नसेल तर या सरकारला नैतिक अधिकार नाही सत्तेवर राहण्याचा असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. बदलापूर प्रकरण, पावसाचा अंदाज, निवडणूक, लाडकी बहीण योजना या आणि अशा प्रकारच्या बातम्या आपण आज लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.
Marathi News Live Update, 22 August 2024 | “एकनाथ शिंदे म्हणजे संशयी आत्मा”, संजय राऊत यांची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
नागपूर : नागपूरमध्ये सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे पसरवले जात आहे. याचा देशभरात मोठ्या जोमाने प्रचारही होत आहे. मात्र, या सिमेंटच्या रस्त्यामुळे लगतचे वृक्ष गुदमरत आहेत. शहरातील अवाजवी विकासकार्यामुळे शहरातील वृक्षांची संख्या वेगाने कमी होत आहे. हिरव्या नागपूरची ओळख टिकवण्यासाठी विकास संस्थांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत करण्यात आली.
नागपूर : ‘आम्ही बघतोय, वित्त विभाग प्रत्येकवेळी न्यायक्षेत्राशी संबंधित फाईलवर ठाण मांडून बसत आहे. हा फार गंभीर विषय आहे’, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांनी वित्त विभागाला फटकारले. ‘आम्ही तुम्हाला भरपूर संधी आणि वेळ दिला, तरी तुम्ही निर्णय घेत नाही. आता निवडणुका आल्यावर पुन्हा तुम्हाला ‘बहाणा’ मिळेल’, असेही न्यायालयाने म्हटले.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल
Town Park Thane : येथील कोलशेत भागातील सुमारे २० एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता याच भागात टाऊन पार्कची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्कमध्ये मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्प यांचा समावेश असणार आहे.
girl molested in Ambernath – गेल्या महिनाभराच्या कालावधीत अल्पवयीन मुलगी घरासमोरील सार्वजनिक शौचालयात नैसर्गिक विधीसाठी आली की तिच्याशी जवळीक साधून, तिच्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग करणाऱ्या एका ३५ वर्षाच्या नराधमाविरुद्ध पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
वसई- भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार केला जाणार आहे. एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पूल असणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिला पूल असणार आहे. या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. यामुळे वसईतील मेट्रोचा मार्गही सुकर झाला आहे. दोन्ही पूल एकाच मार्गातून असल्याने खर्चातही बचत होणार आहे.
बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर २० ऑगस्टला बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ पाहण्यास मिळाला. संतप्त जमावाने शाळेची तोडफोड केली. रेल रोको केला. त्याचप्रमाणे अक्षय शिंदेच्या घराची प्रचंड तोडफोड केली असं त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं आहे.
वसई- नालासोपार्याच्या यादवेश विकास इंग्रजी शाळेतील १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणानंतर १० दिवसांनी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांविरोधात पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलाने या लैंगिक छळाबाबत त्यांना माहिती असूनही त्यांनी कारवाई न करता पीडितेच्याच भावाला मारहाण केली होती.
पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. कृषी विभागातल्या २०२१ आणि २०२२ च्या मुलांची निवड होऊनही नियुक्ती झालेली नाही. नवीन पदांच्या जाहिराती आलेल्या नाहीत. २०२३, २०२४ च्या मध्ये कृषी पदवीधरांसाठी जागा का नाहीत? हे प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
नागपूर : नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या ‘रिकार्पेटिंग’चे कार्य करण्यासाठी मार्च महिन्यांपासून दर दिवशी आठ तासांसाठी धावपट्टी बंद ठेवण्यात येत आहे. विमानतळाची धावपट्टी बंद ठेवल्यामुळे शहराच्या विकासाच्या गती मंदावली असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. मार्चपासून धावपट्टी बंद आहे, मात्र कार्य होताना कुठेही दिसत नाही. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. आणखी किती काळ ही परिस्थिती राहणार, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
मुंबई: नागपाडा येथे कर्णफुल, बांगड्या विकण्यासाठी आलेल्या फेरीवाल्याने ८ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी फेरीवाल्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे : लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी वारजे परिसरात एका दुचाकीस्वाराल धमकावून त्याला लुटल्याचे तपासात उघडकीस आले.
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याची एक कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४५ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर : महामेट्रोने नागपूरमध्ये डिजीटल तंत्रज्ञानावर अधिक भर दिला आहे. मेट्रोच्या वेळापत्रकापासून तर तिकीट खरेदीपर्यंत सर्वच सुविधा डिजीटल आहे. मेट्रोमहाकार्डमुळे प्रवाशांना तिकीट रांगेत उभे राहण्याची गरज नाही,अनेक सेवा ऑनलाईन आहेत. त्यात आमखी एकाची भर पडली आहे. त्याचे नाव आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’.
गेल्या काही वर्षांचा विचार करता पुणे विमानतळावरून हवाई प्रवास हे प्रवाशांसाठी एक दिव्य ठरत आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू होऊनही प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र पायाभूत सुविधांचा विस्तार तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यातच विमान कंपन्यांकडून वारंवार विमानांना होणारा विलंब प्रवाशांच्या अडचणींत भर घालणारा ठरत आहे.
नाशिक : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत येथे होणाऱ्या कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतून बसेस मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील प्रवासी, पासधारक विद्यार्थ्यांची दैनंदिन वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक संशयी आत्मा आहेत. दिवसातला अर्धा दिवस हा त्यांचा संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्रात जातो. त्यांना असंही वाटलं असेल की बदलापूरचं आंदोलन हे पण जादूटोणा झाल्यानेच झालं असेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते म्हणाले आपले मुख्यमंत्री जादूटोणाप्रेमी आहेत. पण त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर कळेल की लाखो लोक चिडून रस्त्यावर उतरले. तुमच्या मुलाच्या मतदारसंघात लोक उतरले. तुमचा मुलगा तिथला खासदार आहे हे विसरु नका असं संजय राऊत म्हणाले आहेत.