महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक संशयी आत्मा आहेत. दिवसातला अर्धा दिवस हा त्यांचा संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्रात जातो. त्यांना असंही वाटलं असेल की बदलापूरचं आंदोलन हे पण जादूटोणा झाल्यानेच झालं असेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते म्हणाले आपले मुख्यमंत्री जादूटोणाप्रेमी आहेत. पण त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर कळेल की लाखो लोक चिडून रस्त्यावर उतरले. तुमच्या मुलाच्या मतदारसंघात लोक उतरले. तुमचा मुलगा तिथला खासदार आहे हे विसरु नका असं संजय राऊत म्हणाले आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी राखी पौर्णिमेबाबत प्रश्न विचारला असता मी नाशिकला होते असं म्हणत उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात बदलापूरसारख्या घटना घडणं निंदनीय आहे. महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार हे सरकार थांबवू शकत नसेल तर या सरकारला नैतिक अधिकार नाही सत्तेवर राहण्याचा असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. बदलापूर प्रकरण, पावसाचा अंदाज, निवडणूक, लाडकी बहीण योजना या आणि अशा प्रकारच्या बातम्या आपण आज लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Marathi News Live Update, 22 August 2024 | “एकनाथ शिंदे म्हणजे संशयी आत्मा”, संजय राऊत यांची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

19:18 (IST) 22 Aug 2024
कोकणवासियांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी स्वराज्यभूमीचे राजापूरात आंदोलन

राजापूर : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कोकणातील शेतकरी, मच्छीमार यांच्यासह अन्य प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधून ते प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने समृद्ध कोकण संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी, मच्छीमार बांधवांनी स्वराज्यभूमी आंदोलन छेडले. तालुक्यातील भू येथे झालेल्या या आंदोलनामध्ये शेतकरी, मच्छीमार सहभागी झाले होते.

कोकणवासियांचे प्रश्‍न प्राधान्याने तात्काळ सोडवावेत अन्यथा आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये घाम फोडू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाला दिला. या आंदोलनाच्या निमित्ताने भू बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये देण्यात आलेल्या घोषणा आणि आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये विविधांगी मागण्यांचे असलेल्या फलकांनी सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते.

18:57 (IST) 22 Aug 2024
“विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्या,” राष्ट्रीय संघटन सचिवांची भाजप नेत्यांना तंबी

वर्धा : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले. संघटना कार्यावर विशेष भर देणाऱ्या भाजपने ही निवडणूक लक्षात घेवून संघटनेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास पाठविणे सुरू केले आहे. भापजचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश हे आज वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास धडकले.

सविस्तर वाचा

18:41 (IST) 22 Aug 2024
तुम्हाला आता समजले असेल महाराष्ट्र पोलिसांनी विश्वासार्हता का गमावली, जितेंद्र आव्हाडांची पोलिसांवर टीका

शेवटी तुम्हाला समजले असेल की महाराष्ट्र पोलिसांनी तुम्हाला माहीत असलेल्या कारणांमुळे त्यांची विश्वासार्हता गमावली आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूरच्या घटनेवरून पोलिसांवर केली आहे.

सविस्तर वाचा….

18:01 (IST) 22 Aug 2024
केंद्रीय मंत्र्यांची बंदर कामगारांशी वेतन करारा संबंधी सकारात्मक चर्चा; भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाचे निवेदन

उरण : गुरुवारी केंद्रीय बंदर व जलमार्ग विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन बंदर कामगारांच्या प्रलंबित वेतन करारा संदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भारतीय पोर्ट व डॉक मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील यांनी दिली. यावेळी ज्ञानेश्वर सोनवणे व अनिल चिर्लेकर हेही उपस्थित होते. देशातील बंदर कामगारांची वेतन वाढ,पे फिटमेंट व कॅफेटरीया भत्ता, इत्यादी विषयी सकारात्मक चर्चा केली.

या संबंधी मंत्री महोदयांना देण्यात आले. यावेळी बंदर कामगारांचा होऊ घातलेला वेतन करार लवकरात लवकर पूर्ण करावा ही विनंती करण्यात आली. वेतन करार लवकरात लवकर संपन्न व्हावा म्हणून मंत्री महोदय आश्वासक असून त्याबाबतीत सर्व फेडरेशन सोबत दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी इंडियन पोर्टस् असोसिएशनच्या दिल्ली कार्यालयात बैठक बोलवण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

17:59 (IST) 22 Aug 2024
‘मेट्रो १’मधून १० वर्षांत १०० कोटी प्रवाशांचा प्रवास

मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३ ऑगस्ट रोजी पाच लाखांचा टप्पा पार केला. गेल्या १० वर्षांमध्ये ‘मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे.

सविस्तर वाचा

17:49 (IST) 22 Aug 2024
मोफत वीज योजना : नाव शेतकऱ्यांचे, लाभ महावितरणचा, वीज ग्राहक संघटना म्हणते..

नागपूर: शासनाने ७.५ हाॅर्स पाॅवरपर्यंत जोडभार असलेल्या राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज देण्याची घोषणा केली. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी निवडणूक जुमला असू शकतो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा वीज वापर दुप्पट दाखवला जात असून शेतकऱ्यांच्या नावावर महावितरणलाच या योजनेतून जास्त लाभ होईल, असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला.

सविस्तर वाचा…

17:20 (IST) 22 Aug 2024
पेसा भरतीसाठी वणीत रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

नाशिक : वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची भरती सर्व सेवा नियमाप्रमाणे तत्काळ व कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नाशिक- सापुतारा तसेच नाशिक- कळवण वाहतूक ठप्प झाली.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 22 Aug 2024
वसई : नायगाव पोलिसांकडून मुख्याध्यापकांना सुरक्षिततेचे धडे

वसई: बदलापूर येथील एका शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. अशा घटना शाळेत व महाविद्यालयात घडू नये यासाठी नायगाव पोलिसांनी बुधवारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या विद्यालयातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयीच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

सविस्तर वाचा….

16:57 (IST) 22 Aug 2024
आपलं सरकार सेवा केंद्रात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप : रत्नागिरीतील १६, तर चिपळूणमधील २९ सेवाकेंद्र बंद

मुंबई : राज्य सरकारच्या ‘आपलं सेवा केंद्र’ या योजनेर्तंगत सुरू करण्यात आलेली रत्नागिरी आणि चिपळूण येथील अनुक्रमे १६ आणि २९ सेवा केंद्रे बंद असल्याची माहिती खुद्द राज्य सरकारनेच प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात दिली.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 22 Aug 2024
नाशिक : महिला अत्याचार निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

नाशिक : महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गुरूवारी येथे ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन नाशिक जिल्हा कौन्सिलच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ऑल इंडिया स्टुडंटंस फेडरेशनच्या (एआयएसफ) वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात कोलकाता येथील पीडित डॉक्टरचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्यावर अत्याचाराच्या खुणा दाखविण्यात आल्या. ही घटना मानवी संवेदना बोथट करणारी आहे. काही दिवसांपासून महिला तसेच अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार ही गंभीर समस्या झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्रसह इतर राज्यांमधूनही अशा गंभीर घटना घडत आहेत. या घटनांविषयी जबाबदार पदांवर असलेल्या विविध व्यक्तींकडून केली जाणारी स्त्रीविरोधी विधाने अत्यंत निंदनीय आहेत. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे.

16:48 (IST) 22 Aug 2024
वाघाला रिसॉर्टमध्ये आली डुलकी, नंतर आले हत्ती; अखेर…

नागपूर : मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतच्या एका ‘रिसॉर्ट’मध्ये ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी अचानक वाघ दाखल झाला आणि तिथेच तो पाय पसरून झोपी गेला. ‘रिसॉर्ट’ मध्ये दाखल होताच त्याने डरकाळी फोडली आणि पुन्हा तो झोपी गेला. मात्र, त्याची ही डरकाळी ‘रिसॉर्ट’मध्ये आराम करणाऱ्या पर्यटकांना चांगलीच हादरवून गेली.

सविस्तर वाचा…

16:39 (IST) 22 Aug 2024
वाढवण बंदर देशातील सर्वोत्तम बंदर बनणार; केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

उरण : डहाणू येथील वाढवण बंदर हे देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून गणले जाणार असल्याचे मत केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत जेएनपीए बंदराच्या प्रशासन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 22 Aug 2024
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश

नवी मुंबई</strong> : सिडकोने बांधलेल्या तसेच ३० वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या भक्कम इमारतीही धोकादायक ठरवून त्या पुनर्विकासाच्या सापळ्यात ओढण्याचे प्रकार नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच सिडको उपनिबंधकांनी घणसोलीतील अशा काही प्रकारांना सध्या तरी वेसण घातल्याची माहिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 22 Aug 2024
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात देवगड येथील शेठ म. ग.हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात शेठ म.ग. हायस्कूल, देवगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर एस.एम. हायस्कूल, कणकवली यांनी द्वितीय आणि न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे, कुडाळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सावंतवाडी येथे हा नाट्य महोत्सव झाला.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन सावंतवाडी बॅ. नाथ पै सभागृहात करण्यात आले.

15:25 (IST) 22 Aug 2024
गोकुळाष्टमीला सिडकोच्या ९०२ सदनिकांची सोडत

पनवेल : सिडको महामंडळ नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत महागृहनिर्माणातून हजारो सदनिका बांधत असल्याने या घरांची सोडत सिडको कधी काढणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले असताना सिडको मंडळाने मंगळवारी रात्री कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे यापूर्वी बांधलेल्या गृहसंकुलामध्ये बांधून पूर्ण असलेल्या उपलब्ध ९०२ सदनिकांची गृहविक्रीची सोडत कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर (२७ ऑगस्ट) काढणार असल्याचे जाहीर केले.

सविस्तर वाचा

15:25 (IST) 22 Aug 2024
पनवेल प्रारूप विकास आराखड्याबद्दल १० दिवसांत अवघ्या तीन हरकती

पनवेल : पनवेल महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा ८ ऑगस्टला प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबतच्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी एका महिन्याची (७ सप्टेंबर) मुदत नागरिकांना देण्यात आली आहे. पहिल्या १० दिवसांत आतापर्यंत प्रारूप विकास आराखड्यातील नकाशा पाहून अवघ्या तीन लेखी हरकती जमीन मालकांनी पालिकेच्या नगररचना विभागाकडे नोंदविल्या आहेत.

सविस्तर वाचा

14:53 (IST) 22 Aug 2024
अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरूवार, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख १८ हजार ९३९ जागांसाठी १७ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३ हजार १४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले.

सविस्तर वाचा

14:44 (IST) 22 Aug 2024
महावितरण कार्यालयावर हल्लाबोल; उरणमधील वीज वितरण सुरळीत करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

उरण : तालुक्यातील नागरिकांनी भेडसावत असलेल्या नित्याची वीज समस्या सोडवा या मागणीसाठी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.या वेळी शहरी व ग्रामीण भागातील जनेतच्या विजेच्या समस्या न सुटल्यास उरणमधील नागरिक वीज देयके भरणार नाहीत. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही अशी तंबीही दिली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून उरणमधील वीज वितरणाची समस्या गंभीर बनली आहे. शहर आणि विशेषत: ग्रामीण भागातील वीज १२ ते १४ तास खंडित केली जात आहे. त्यामुळे एकीकडे पावसाने मारलेल्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. या उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तर वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा परिणाम वृद्ध, आजारी व लहान मुलांवर होत आहे. ही समस्या नित्याची झाल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

14:43 (IST) 22 Aug 2024
जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेणार नाही का? उच्च न्यायालयाचा राज्य पोलिसांना संतप्त प्रश्न

मुंबई : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाच्या ढिसाळ तपासावर ताशेरे ओढताना उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य पोलिसांना धारेवर धरले, तसेच, बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ उसळलेल्या जनक्षोभाचा दाखला देताना जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे तुम्ही गांभीर्याने घेणार नाही का? असा संतप्त प्रश्न पोलिसांना केला.

सविस्तर वाचा

14:31 (IST) 22 Aug 2024
रायगड जिल्ह्यात डेंग्यू बळावला; पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला

Dengue in Raigad district – रायगड जिल्ह्यात मलेरीयाचे प्रमाण घटले असले तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वाच….

14:14 (IST) 22 Aug 2024
Gondia crime update : चुलबंद जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

गोंदिया : गोरेगाव  पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चुलबंद जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्यात बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साढे पांच वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.कादीर मतीन शेख (वय २८), कैफ अमीन शेख (वय २१ दोघेही रा. सडक अर्जुनी) अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

14:08 (IST) 22 Aug 2024
बदलापूरातील चिमुकलीच्या प्रकृतीची अफवा अन् रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आवाहन

बदलापूरमधील एका शाळेत अत्याचार झालेल्या दोन चिमुकल्यांच्या प्रकृतीची चुकीची माहिती समाजमाध्यांवर प्रसारित करून अफवा पसरविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर बदलापुर रेल्वे स्थानकात झालेले आंदोलन लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापुरपर्यंतच्या सर्वच स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

वाचा सविस्तर…

13:48 (IST) 22 Aug 2024
स्त्रीबीज दानावेळी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे प्रकरण: तीन डॉक्टर प्रकरणातून दोषमुक्त

मुंबई : कृत्रिम मातृत्वासाठी (सरोगसी) स्त्रीबीज दान करणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी वांद्रे पश्चिम येथील आयव्हीएफ क्लिनिकशी संलग्न असलेल्या तीन डॉक्टरांना उच्च न्यायालयाने नुकतेच दोषमुक्त केले. त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार नाही, असे न्यायालयाने या तिन्ही डॉक्टरांना प्रकरणातून दोषमुक्त करताना नमूद केले.

सविस्तर वाचा

13:42 (IST) 22 Aug 2024
पनवेल : तळोजा उड्डाणपुलावर भगदाड

Taloja flyover : तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मुंब्रा पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या नावडेफाटा येथील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याने अपघातास आमंत्रण असे चित्र पुलावर आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी या भगदाडात कोणतेही वाहन अडकू नये यासाठी भगदाडापासूनच्या परिसराला बॅरीगेट्स लावून परिसर सुरक्षित केला. मात्र पुलावर पडलेल्या आरपार भगदाडामुळे पुलाच्या बांधकामाबाबत उद्योजकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

सविस्तर वाचा….

13:40 (IST) 22 Aug 2024
वाशीम जिल्ह्यात शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग; राज्यात चाललंय तरी काय?

अकोला : राज्यात एका मागे एक विद्यार्थिनींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो. आता वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथूनही नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली.

सविस्तर वाचा

13:39 (IST) 22 Aug 2024
फेरीवाल्यांवर कठोर कारवाईसाठी पालिकेची तयारी; अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरणार

मुंबई : येत्या काळात मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरण्याचे ठरवले आहे. लिपिक वर्गातून अंतर्गत भरतीद्वारे ही पदे भरली जातील.फेरीवाल्यांच्या विषयावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारल्यानंतर जून महिन्यात प्रशासनाने मुंबईत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी पालिकेने वीस महत्त्वाची ठिकाणे निश्चित केली होती.

सविस्तर वाचा

13:29 (IST) 22 Aug 2024
वसई : शाळा महाविद्यालयांची उदासीनता, तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय कागदावरच

complaint boxes Schools Vasai : विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाबाहेर तक्रार पेटी लावण्याचा निर्णय केवळ कागदोपत्री राहिला आहे. बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांनी या सूचनेकडे पाठ फिरवली आहे. पोलिसांनी देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

सविस्तर वाचा….

13:10 (IST) 22 Aug 2024
मोठी बातमी! MPSC ची २५ ऑगस्टला होणारी परीक्षा लांबणीवर.. कधी होणार परीक्षा?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) आज बैठक झाली. त्यात रविवारी (२५ ऑगस्ट) नियोजित असलेली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाचा सविस्तर…

13:10 (IST) 22 Aug 2024
मुलीच सुरक्षित राहणार नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या घोषणेचा अर्थ काय? -उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद हा काही राजकीय नाही. विकृतीचा निषेध नाही तर बंदोबस्त करण्यासाठी मी महाराष्ट्रातल्या माताभगिनींना आवाहन करतो आहे की या बंदमध्ये सहभागी व्हा. मुली, विद्यार्थिनी शाळेत जात आहेत त्या जर सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याचा अर्थ काय? संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्या माताभगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत ही प्रत्येक राजकीय पक्षाची, प्रत्येक नागरिकाची भावना असलीच पाहिजे. यामध्ये राजकारणाचा काही प्रश्न नाही. गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रातल्या घटनाच मी तुम्हाला सांगतो. पाच वर्षांत २० हजार बालिकांवर अत्याचार ही एक बातमी आली आहे. असंवेदनशीलतेचा निषेध, चांदिवलीत एका चिमुरडीवर अत्याचार झाला होता, मुंबईत बाललैंगिक अत्याचारात वाढ, ठाण्यातही अशीच घटना घडली आहे. हे नुसतं पाहात कुठपर्यंत बसायचं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. बंगालमध्ये गेल्या आठवड्यात आपण पाहिलं जी घटना घडली त्याविरोधात आगडोंब उसळला होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

13:05 (IST) 22 Aug 2024
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक पिशव्या, दुर्गंधीने पादचारी हैराण

Dombivli East Railway Station डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवाॅकखालील रस्ता दुभाजकावर मद्यपी रात्रीच्या वेळेत दारू पिण्यास बसतात. दारूच्या बाटल्या, चाखण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ तेथेच टाकून निघून जातात.

सविस्तर वाचा….

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक संशयी आत्मा आहेत. दिवसातला अर्धा दिवस हा त्यांचा संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्रात जातो. त्यांना असंही वाटलं असेल की बदलापूरचं आंदोलन हे पण जादूटोणा झाल्यानेच झालं असेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते म्हणाले आपले मुख्यमंत्री जादूटोणाप्रेमी आहेत. पण त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर कळेल की लाखो लोक चिडून रस्त्यावर उतरले. तुमच्या मुलाच्या मतदारसंघात लोक उतरले. तुमचा मुलगा तिथला खासदार आहे हे विसरु नका असं संजय राऊत म्हणाले आहेत.