Mumbai News Updates : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकासआघाडीच्या घटकपक्षांकडून भाजपा आणि भगतसिंह कोश्यारींवर जोरदार टीका होत आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनंही करण्यात येत आहेत. दुसरीकडे सावरकरांवरील वक्तव्यावरूनही प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय राज्यात गोवरच्या साथीच्या पार्श्वभूमीवर काळजीचं वातावरण आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नागरिकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. अशाच राज्यातील प्रत्येक घडामोडींचा हा आढावा…
Marathi News Live, 22 November 2022 : राज्यातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा एका क्लिकवर...
नागपूर शहरात बांधकाम परवानगीसाठी विकास शुल्कात १०० टक्के वाढ करण्याचा स्थानिक प्रशासकीय पातळीवरील निर्णय रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूरच्या विविध प्रश्नांवर काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद व चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल मंगळवारी काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाल मानेवाडा चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधाशू यांचा मोर्चात निषेध करण्यात आला, एवढेच नव्हे तर त्यांच्या बाबत शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला.
कोण म्हणतो, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला? राज्यपालांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य केले नाही आणि ते तसे करूही शकत नाहीत. कारण, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या कामापासून प्रेरणा घेऊन काम करतो, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची पाठराखण केली.
ठाणे : राजकीय विरोधकांकडून ५० खोके घेतल्याचे आरोप होत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ९०० खोके दिले आहेत. पण, ते मतदार संघातील विकासकामांसाठी दिले असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आभारी असल्याची प्रतिक्रीया बाळासाहेबांची शिवसेनेेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. बातमी वाचा सविस्तर...
बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील, असा दावा केला आहे. तसेच ठाकरे गटातील उर्वरित पाचपैकी तीन खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत येतील,असं म्हटलं. ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बुलढाण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
मुंबई : विमानतळ वा बंदरमार्गे होणारी अमली पदार्थांची तस्करी शोधून काढणारे `स्निफरʼ श्वान अर्थात वासाद्वारे माग काढणारे कुत्रे आता परदेशातून येणारी पार्सल तपासण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. सीमा शुल्क विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर...
आम आदमी पक्षाचे (आप) नेते व मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार कारागृहात मालीश दिली जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्येंद्र जैन जेलमध्ये पलंगावर झोपलेले असताना एक व्यक्ती त्यांना मालीश देत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान ही मालीश नसून फिजिओथेरपी असल्याचा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. यादरम्यान तिहार जेलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर खळबळ उडाली आहे. सत्येंद्र जैन यांना मालीश देणारी व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून, बलात्काराचा आरोपी असल्याची माहिती मिळत आहे.
डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील ३०० रहिवाशांची वस्ती असलेल्या भूमी लाॅन्स गृहसंकुलाच्या प्रवेशव्दारावरील रस्त्यावर दुभाजकाच्या जागेतून सोसायटीतील रहिवाशांना वाहन जाईल एवढा रस्ता ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने नाकारल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बातमी वाचा सविस्तर...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली. या पदांचे वेतन आणि भत्त्यांचा खर्च विद्यापीठ निधीतून भागवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर...
किरीट सोमय्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार, अनिल परबांचा गंभीर इशारा, सोमय्यांनी नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा घेऊन जावं म्हणत खोचक टोला, पोलिसांवरही दबाव असल्याचाही आरोप
पुणे : शहरातील ३८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी १४२ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या पूर्वगणन समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. बातमी वाचा सविस्तर...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचारासाठी गेले आहेत. त्यामुळे दोन दिवस यात्रेला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशमधून सुरु होणार आहे. त्यात आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी 'भारत जोडो यात्रे'वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली आहे.
अनिल परब यांचं साई रिसॉर्ट तोडण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या कारवाईच्या वेळी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपा नेते किरीट सोमय्याही हजर आहेत.
जळगाव जामोद (बुलढाणा) : स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेने देशात इतिहास घडवला, त्याविषयी आम्ही जाणून होतो. स्वातंत्र्योत्तर काळात अशाच प्रकारच्या यात्रेत आपलाही सहभाग असावा, अशी इच्छा होती. बातमी वाचा सविस्तर...
सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. यावेळी सीमा भागातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच यासंदर्भात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा
मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. २० नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावरही दिसून आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबतच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी सुचक विधान केलं आहे. तसेच देशात हुकूमशाही असून त्याविरोधात सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई : शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास परवानगी न देणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रहिवाशांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील जमिनीवरील बीडीडी चाळींची दुरवस्था झाली असून रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सुमारे ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यासाठीच्या अटी-शर्ती जाहीर करण्यात आल्या. निवड प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम विभागांनी दरवर्षी राबवणे अपेक्षित असून, सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ या वर्षात पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विभाग स्तरावर कार्यक्रम आखण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने अन्य विभागांना दिले.बातमी वाचा सविस्तर...
टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते २७ गावातील हेदुटणे पर्यंत प्रस्तावित असलेल्या ३१ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील भोपर, आयरे गाव हद्दीत रहिवासी गेल्या सात वर्षापासून रस्त्यासाठी भूसंपादन करुन देत नसल्याने हा महत्वपूर्ण टप्पा रखडण्याची चिन्हे आहेत. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी ८९ हजार ३५३ कोटींवर गेल्या आहेत. ही रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर...
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतरही मनसेचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. असे असतानाच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. देशपांडे यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ लावले जात असून मनसे आगामी काळात नेमके काय करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वाचा सविस्तर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासह संबंध सुधारावेत अशी आपली इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे. मात्र भारतात भाजपा सत्तेत असताना तसं होण्याची अजिबात शक्यता नाही असंही ते म्हणाले आहेत. ‘The Telegraph’ ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी एकमेकांशी व्यापार केल्यास कोणते आर्थिक फायदे होऊ शकतात यावर भाष्य केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या गुजरातमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान गुजरातमध्ये राहुल गांधी यांची सभा सुरु असताना एका व्यक्तीने व्यत्यय आणला. तुम्ही अनुवादन करणाऱ्यासाठी न थांबता सलग हिंदीत बोला अशी विनंती त्याने केली. ‘तुम्ही हिंदीत बोला, आम्हाला समजेल. आमच्यासाठी भाषांतर करण्याची गरज नाही,’ असं त्या व्यक्तीने गर्दीतूनच ओरडून सांगितलं.
किरीट सोमय्या आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, "चला, ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचे स्मारक 'ट्वीन रिसॉर्ट तोडूया'. आज पहाटे ३.३० वाजता दापोलीमध्ये पोहोचलो. सकाळी १० वाजता दापोली पोलीस स्टेशनला असेन. त्यानंतर ११ वाजता सी कोंच रिसॉर्ट/साई रिसॉर्ट येथे असेन."
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी राज्यपालांना लक्ष्य करत असताना, दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान, मनसेनेही राज्यपालांवर टीका केली असून ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने राज ठाकरेंची एक जुनी ऑडिओ क्लिप शेअर केली असून यामध्ये त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले आहेत.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता आणखी एक महत्वाची घडामोड घडली आहे. आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आफताबला कोठडी संपत असल्याने आज दिल्लीमधील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं असता, त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याचं मान्य केलं. न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
नांदेड-लातूरमधील नात्याची राजकीय वीण विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री होण्यापासून विळ्या- भोपळ्याच्या उपमांनी वर्णिलेली. ‘भारत जोडो’मध्ये हे नातेही जोडले जाईल या भ्रामक कल्पनेत काही आशावादी कार्यकर्ते होते. पण अगदी पोस्टर छपाईपासून ते भारत जोडो यात्रेत काेणत्या जिल्ह्यात सहभागी व्हायचे यावरून विळा- भोपळ्याचे वर्णन अशोकराव आणि अमित देशमुख यांनी जपले असल्याची चर्चा यात्रा महाराष्ट्रातून परतल्यानंतर जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सुमारे ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यासाठीच्या अटी-शर्ती जाहीर करण्यात आल्या. निवड प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम विभागांनी दरवर्षी राबवणे अपेक्षित असून, सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ या वर्षात पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विभाग स्तरावर कार्यक्रम आखण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने अन्य विभागांना दिले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या ‘जिप्सी’मधील एक पर्यटक काही अंतरावर माया वाघीण आणि तिचे बछडे असतानाच जिप्सीखाली कोसळल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे काही वेळ पर्यटकांचा थरकाप उडाला होता. माया वाघीण व तिच्या बछड्यांचे छायाचित्र काढण्याच्या नादात पर्यटक कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सहकारी पर्यटकांनी त्याला वेळीच खेचल्याने पुढील अनर्थ टळला.