Maharashtra Live News Updates, 26 August 2024 : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या नेत्यांचे सध्या महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच उमेदवारांची चाचपणी करत आगामी रणनीती आखली जात आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यासह राज्यातील राजकीय, सामाजिक घडामोडी वाचा, राज्यातील हवामानाचे अपडेट्स जाणून घ्या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.
Maharashtra News Live Today, 26 August 2024
"देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. छत्रपती शिवरायांचा हा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले? यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे", अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत केली आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काही दिवसांपूर्वी उभारण्यात आला होता. मात्र, आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण राजकोट येथील पुतळा कोसळला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करत कार्यालय फोडल्याची माहिती समोर येत आहे.
"भारतीय जनता पक्षाला आशा आहे की, हरियाणामध्ये त्यांचं सरकार टिकवता आलं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल. मात्र, भाजपाचं हरियाणामध्ये सरकार येणार नाही. महाराष्ट्रातही त्यांचं सरकार राहणार नाही. तसेच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपाचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रातील मोदी सरकार गडगडेल", असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
"अनिल देशमुख यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. त्यांना निवडणुकीत माझ्या विरोधात उभं राहायला काही हरकत नाही. जर मला पक्षाने सांगितलं त्यांच्या विरोधात उभं राहा तर मला काहीही अडचण नाही. जर महायुतीमधील नेत्यांनी मला सांगितलं अनिल देशमुखांच्या विरोधात उभे राहा तर मी तयार आहे", असं आव्हान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलं आहे.
वसई : नालासोपाऱ्यात शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा २ च्या पथकाने यातील ५ जणांना तर तुळींज पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर ४ जण जखमी झाले आहेत.
कराड : ऑलिम्पिकवीर, ख्यातनाम मल्ल (कै.) खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर (ता. कराड) या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पहिलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता राज्य शासनाने अखेर २५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करत कराडलगतच्या गोळेश्वरमध्ये खाशाबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यातील खडकवासला परिसरातील एका शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ कार्यक्रमात एका दहा वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. ६८ वर्षाच्या नराधमांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले.
मुंबई : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये आभासी प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आभासी प्रयोगशाळेद्वारे बी-बियाणे, रोपे त्यांच्या विविध भागाचे निरीक्षण करणे व त्यावर संशोधन करण्या मदत होणार आहे.
पुणे : पुरंदर येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण या भागातील लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार सुळे यांना वेळेवर देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार आशीष शेलार यांचा स्वीय साहाय्यक असल्याचे भासवणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. आरोपीने एका वकिलाला व इतर एका व्यक्तीला दूरध्वनी करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) बनावट संकेतस्थळ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
"महाविकास आघाडीत एकमत आहे. विधानसभेबाबत आमच्यामध्ये एकमत आहे. मैत्रीपूर्ण आमचं काम सुरु आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे. मग त्यामध्ये एका घटकाला काढून टाकायचं का? त्यामुळे नुकसान झालं का? ही चर्चा उघडपणे पुण्यात चाललेली आहे हे आपण पाहतो. मात्र, अशा पद्धतीचं वातावरण महाविकास आघाडीमध्ये नाही", असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
पिंपरी : भांडण झाल्याने घर सोडल्यानंतर दुचाकी कशी चालू करायची, हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे यूट्यूबवररुन पाहून महामार्गालगतच्या दुचाकी चोरणा-याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आठ लाख ९० हजार रुपयांच्या १८ दुचाकी जप्त केल्या.
पिंपरी : भांडण झाल्याने घर सोडल्यानंतर दुचाकी कशी चालू करायची, हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे यूट्यूबवररुन पाहून महामार्गालगतच्या दुचाकी चोरणा-याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आठ लाख ९० हजार रुपयांच्या १८ दुचाकी जप्त केल्या. तर, वाहनचोरीचे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) खासदार अमर काळे यांना मित्रपक्षांचा विसर पडला काय, अशी शंका सर्वजनिक चर्चेत उपस्थित केली जात आहे. बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीने मूक निषेध आंदोलन केले. त्यावेळी खासदार काळे गैरहजर होते. मात्र याच वेळी ते त्यांचे मामा माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल गावी निषेध आंदोलनात सहभागीझाले होते.
डोंबिवली : बदलापूर येथील दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदलापूर आणि डोंबिवली येथील त्यांचे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथील एका शाळेत दोन बालिकांसोबत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याने या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करणे योग्य वाटत नसल्याने मनसेने हा निर्णय घेतला आहे, असे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सांगितले.
नागपूर: राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे एकूण ९८ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असून, त्याशिवाय संगणकाशी संबंधित विदा विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांना पसंती मिळत आहे. राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
डोंबिवली : डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कांचनगाव येथे घराचे हप्ते थकविणाऱ्या कर्जदारांना नोटीस देण्यासाठी गेलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना कर्जदारासह त्याच्या इतर तीन साथीदारांनी शुक्रवारी कर्जदाराच्या घरासमोर बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला अधिकाऱ्यांचे कपडे फाडण्यात आले.
वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) खासदार अमर काळे यांना मित्रपक्षांचा विसर पडला काय, अशी शंका सर्वजनिक चर्चेत उपस्थित केली जात आहे. बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीने मूक निषेध आंदोलन केले. त्यावेळी खासदार काळे गैरहजर होते.
मुंबई: महारेराचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले असून नवीन संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. महाकृती नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संकेतस्थळाच्या वापराबाबतचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्यानुसार विकासक, तक्रारदार, विकासक आणि तक्रारदारांचे वकील तसेच इतर वापरकर्त्यांना संकेतस्थळ वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नागपूर : एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करुन प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी घातली. तिने नकार देताच अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करुन वडिलांचा खून करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला हुडकून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या.
"भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत २४० जागांच्या पुढे गेला नाही. मी सांगितलं होतं की, भाजपा २४० जागांच्या पुढे जाणार नाही. या देशात फक्त लोकांचा आवाज चालतो. काहींनी गद्दारी केली, पण आता येणारी विधानसभेची निवडणूक आपल्यासाठी महत्वाची असेल. येणारं सरकार आपलं असेल", असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पैठणमध्ये बोलत होते.
यवतमाळ : बदलापूरच्या घटनेसह राज्यात सध्या सुरू असलेल्या बाललैंगिक, स्त्री अत्याचारांच्या घटनांमुळे जनमानस ढवळून निघाले आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहे. अशा घटनांमधील आरोपींना थेट फासावर लटकविण्याची मागणी जनतेतून होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमाळात केलेल्या वक्तव्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील लोढा धाम भागात क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून एका वृद्धाकडील सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवरील लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला. जलद लोकल सेवांवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास खूप उशीर झाला.
Badlapur Case Custody : बदलापूरमधील चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेची पोलीस कोठडीची मुदत आज संपली असता आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई : मुंबईत शनिवारपासून पाऊस सक्रिय झाला असून रविवारीही शहर तसेच दोन्ही उपनगरांत सकाळपासूनच मुसळधारा कोसळल्या. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत सोमवारीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी मनापासून श्रद्धांजली अर्पण करून मी त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. तळागाळातील लोकप्रिय नेते वसंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारसरणीचा पाठिंबा आणि विस्तार केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsवरिष्ठ कांग्रेस नेता, नांदेड़ लोकसभा सांसद श्री वसंतराव चव्हाण जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है। उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हुए शोकाकुल परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।ज़मीन से जुड़े हुए लोकप्रिय नेता श्री चव्हाण आजीवन कांग्रेस की विचारधारा का… pic.twitter.com/uKLB6AqMaV
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 26, 2024
अकोले : खासदार कंगना राणावत यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले यांनी तीव्र निषेध केला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचे षड्यंत्र होते अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य कंगना राणावत यांनी केले आहे.
नाशिक - आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांवर होणारे हल्ले पाहता नाशिक पोलीस आयुक्तालयातंर्गत आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा पुरविण्यासाठी आणि त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत कारवाईसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कक्षात आयुक्त हे अध्यक्ष, समाजकल्याण अधिकारी हे सदस्य आणि जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना कोणाकडून काही त्रास असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.