Maharashtra Breaking News Today, 15 November 2023: बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेली निष्ठा आमच्या रक्तात आहे. संकट आलं की आम्ही पळून जात नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संकट आल्यावर भाजपाची वाट धरली आम्ही ते करणार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका केली आहे. तसंच यापुढे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण चालणार असंही त्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. परांडा या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. अजित पवार यांनी गोविंदबागेतल्या दिवाळीत उपस्थिती दर्शवली होती. त्याचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे आज भाऊबीजही साजरी केली जाणार आहे. यासह सगळ्याच प्रमुख घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-
Latest Latest Maharashtra News Updates| महाराष्ट्रात फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचंच राजकारण टिकणार, संजय राऊत यांचा दावा आणि इतर घडामोडी
मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर अटक झाली आहे.
मुंबई : दिवाळी आणि इतर सणांनिमित्त मिळणाऱ्या सुट्टीची संधी साधून अनेक जण रेल्वेने बाहेरगावी जातात. परंतु अनेकांना आरक्षित तिकिट मिळत नाही. आरक्षित तिकिटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल रेल्वे परिसरात फिरत असून, प्रवाशांची लूट करतात.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान असलेला बजरंग नावाचा वाघ आणि छोटा मटका नावाचा वाघ यांच्यात मंगळवारी जोरदार झुंज झाली. या दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत राहणारा समृद्धी महा मार्ग आज एक टोलनाका बंद पाडण्यात आल्याने पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र हा टोलनाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्हे तर स्वतः नाक्याच्या कर्मचाऱ्यांनीच बंद पाडलाय.
पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेचा वापर कोणत्या कारणासाठी करता येईल, याचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. या जागेचा वापर नगरचना योजना किंवा व्यावसायिक कारणासाठी करण्याचे नियोजित आहे.
पिंपरी : महापालिकेच्या विविध सोई-सुविधा मिळण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या अर्जांच्या रकान्यामध्ये आता तृतीयपंथीयांनाही स्थान देण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व अर्ज, आवेदनपत्रांवर लिंग या प्रकारासमोर स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असे तीन रकाने उपलब्ध असणार आहेत.
मुंबई : भायखळा येथील साखळी रोडवर असलेल्या एका दुमजली दुकानाला बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नागपूर: नोकरीचा शोध घेत असताना एका परिचारिकेला सायबर गुन्हेगारांना जाळ्यात अडकविले. टास्क पूर्ण केल्यास २५ लाख रुपये देण्याच्या आमिषाला ती बळी पडली. २५ लाख मिळविण्यासाठी परिचारिकेने स्वत:कडील ३ लाख रुपये गमाविले.
मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूद्ध न्यूझीलंड संघामध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होत असताना मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर धमकी देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये बंदुक, ग्रेनेड व काडतुसचे छायाचित्र असून सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे.
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आहे.
नागपूर: जिल्ह्यात १ जानेवारी ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान दहा महिन्यात हिवतापाचे केवळ ५ रुग्ण नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नोंदवले गेले आहे.
नागपूर: जेवणाचा डबा तयार करण्यासाठी विवाहित महिलेला घरी नेऊन युवकाने बलात्कार केला. महिलेचे नग्न छायाचित्र काढून जवळपास एक लाख रुपये उकळले. छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत आणखी ६० हजार रुपयांची मागणी केली.
कोल्हापूर : आज दिवाळी सणातील भाऊबीज. या महत्त्वाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी कडून खर्डा भाकरी देण्यात आली. ऊस दराचा तिढा सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागपूर: राज्य शासनाने ‘परमिटरूम’ असलेल्या रेस्ट्रॉरंटमधील मद्यावरील व्हॅट ५ टक्क्यांवरून दुप्पट म्हणजे १० टक्के केले आहे. त्यावर संताप व्यक्त करत नागपूरसह विदर्भातील मद्याचे ‘परमिटरूम’ १६ नोव्हेंबरला बंद ठेवले जाणार आहे.
पुणे : भररस्त्यात काेयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांसह सराइतांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने चाप बसला होता. काेयते बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केल्याने सराइतांना जरब बसली होती. त्यानंतर शहरात पुन्हा कोयते उगारून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
ठाणे : पाचपाखाडी येथील सरोवर दर्शन टॉवरमधील वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत ११ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर, तीन कारचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
नागपूर: कामठीतील वैष्णवदेवीनगर परिसरात घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले. केसासकट त्वचा निघाल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलीला कुटुंबीयांनी मेडिकल रुग्णालयात दाखल केले.
रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर दोघेही वरिष्ठ नेते आहेत. त्यांचातला वाद वैयक्तिक कारणावरुन झाला असेल असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच संजय राऊतला साप सोडण्याशिवाय काही काम नाही. गुवाहाटीला आम्ही गेलो तेव्हाच आम्ही त्याचं खरं रुप लोकांना दाखवलं यापुढेही दाखवत राहू असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरत आहेत. त्यामुळेच त्यांचा उल्लेख मूर्खांचे सरदार असा मोदींनी केला. जर राहुल गांधीची भीती वाटत नाही तर पंतप्रधान मोदी त्यांच्यावर टीका का करतात? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच बारामतीचं मैदान हे शरद पवारच मारतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. परांडा या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. त्यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. ते आता आपल्या सभेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.