Maharashtra Politics Updates : दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यावरून आता राज्यात संतापनाट्य सुरू झालं आहे. एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून संजय राऊतांनी आगपाखड केली आहे. यावरून आता राज्यातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा रंगला आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली असून त्याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अजित पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उपस्थित नव्हते, यावरूनही राज्यात घमासान सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी त्यांची अस्वस्थता शिंदेंसमोर बोलून दाखवली आहे. मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. यासह राज्यातील विविध बातम्या पाहुयात.
Marathi News Live Update Today : राज्यातील लेटेस्ट बातम्या जाणून घ्या
कुडाळ पिंगुळी येथे झालेल्या अपघात एक ठार
सावंतवाडी: कुडाळ वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजिक बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हरेश संतोष नेरूरकर (वय १९, रा. नेरूर पंचशील नगर) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या समवेत मागे बसलेले प्रथमेश प्रकाश नेरूरकर (वय २७, रा. नेरूर पंचशीलनगर) व सुमित जाधव (वय २७, रा. नालासोपारा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, कुडाळ ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी एकाला गोवा बांबोळी येथे तर दुस-याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कर्करोग तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात एकूण ३५५ महिलांची तपासणी
बारामती : - जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी मोहिमेत तालुक्यात काटेवाडी येथे आयोजित शिबीरात १२, पणदरे ५६, मोरगाव १६५ आणि सुपा येथे १२२ असे एकूण ३५५ महिलांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
यामध्ये संशयित मुख कर्करोग २४८ स्तन कर्करोग ४० व गर्भाशय मुख कर्करोग ६७ असे एकूण ३५५ संशयित महिलांची तपासणी करण्यात आली आहे व त्यांच्या पुढील तपासणी व निदान झाल्यावर मोफत उपचार शासनामार्फत करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. खोमणे यांनी दिली आहे.
यंदा टंचाईची तीव्रता कमी भासण्याची शक्यता; अहिल्यानगरच्या मोठ्या व मध्यम प्रकल्पातून ७७ टक्के पाणीसाठा
अहिल्यानगरः जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातून सध्या सरासरी ७७ टक्के जलसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के अधिक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या झळांची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांतून पाणीसाठा असला तरी लाभक्षेत्रात पाण्याची आस निर्माण झाली आहे.
राहुल सोलापूरकर यांच्यावर 'त्या' विधाना प्रकरणी गुन्हा दाखल होणार का? पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच मोठ विधान
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वीसमोर आला होता. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.त्या विधानाच्या निषेधार्थ राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते.
शासकीय भात खरेदीत गतवर्षी पेक्षा यंदा सिंधुदुर्गात ६९२ शेतकऱ्यांची संख्या घटली
सावंतवाडी: शासकीय धान खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली तरच धान खरेदी केले जात आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षापेक्षा ६९२ पेक्षा जास्त शेतकरी योजनेपासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे खासगी खरेदीदारांचे फावले आहे. यंदा भात खरेदी दर प्रति किलो २३०० रूपये अधिक बोनस दिला जाणार आहे.
नागपूर : गटार स्वच्छतेचे काम पूर्णपणे यंत्राव्दारे! महापालिकेकडे ११ यंत्रे
नागपूर : शहरातील सिवर लाईन तसेच गडर लाईनच्या स्वच्छतेसाठी महापालिकेद्वारे १०० टक्के यांत्रिकी पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. गडर लाईन तुंबल्याच्या तक्रारींवर निराकरणासाठी महापालिकेने मनुष्यबळाचा वापर पूर्णत: बंद केला आहे. त्याऐवजी सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.
मलंगगडाचा निकालही दुर्गाडी प्रमाणेच लागेल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
उल्हासनगर: ज्याप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याचा निकाल न्यायालयातून मिळाला, तसाच निकाल मलंगडासाठीही मिळेल अशी आशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. बुधवारी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी होणाऱ्या आरतीसाठी शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
महिला सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात तरतूद काय ? खा. विशाल पाटील
सांगली: जत तालुक्यातील एका गावात मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला. हे आपल्या समाजाचे अपयश आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तुम्ही महिला सुरक्षेवर काय तरतूद केली आहे? ती आपली जबाबदारी नाही का, असा सवाल करत खासदार विशाल पाटील मंगळवारी खा.विशाल पाटील यांनी चर्चेदरम्यान केंद्र सरकारला केला.
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : दोषमुक्त करण्याची मुख्य परिचारिकेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले होते.
कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक स्नान करूनही गंगा नदी करते स्वतःला शुद्ध
नागपूर : कुंभमेळ्यादरम्यान शाही स्नानादरम्यान सरकार अनेक व्यवस्था करते. कोट्यावधी लोक गंगेत स्नान करतात. कोट्यवधी लोक स्नान केल्यानंतरही, काही काळानंतर गंगा स्वतःला मूळ स्थितीत आणते. गंगेत घाण साफ करण्याची शक्ती आहे. कोट्यवधी लोक एकत्र स्नान करतात. तरीही, स्नानाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर गंगेचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ दिसते आणि जिथे लोक स्नान करतात तिथे गंगा तीन ते चार दिवसांत अशा प्रकारे शुद्ध होते.
अमरावती : भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न…
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर उपचारासाठी दिरंगाई केल्याप्रकरणी संबंधित अधिपरिचारिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप करीत भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना जाब विचारला, यावेळी एका कार्यकर्त्याने कक्षातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी लगेच या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
पालघर घोटी राष्ट्रीय महामार्गाचा भाग विक्रमगड नगरपंचायत समितीने उखडला; रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश
पालघर: पालघर-जव्हार-त्रंबकेश्वर-सिन्नर व घोटी या राष्ट्रीय महामार्गातील विक्रमगड शहरातून जाणारा सुमारे १२५ मीटर लांबीचा रस्ता विक्रमगड नगरपंचायतीने दुरुस्तीच्या नावाखाली उखडला असून नागरिकांनी याविषयी आक्षेप नोंदवल्यानंतर काम थांबवण्यात आले.
नाशिक: भोंदुबाबाविरुध्द फसवणूक झालेल्या महिलेचा लढा; ग्राहक तक्रार निवारण आयोगामुळे यश
नाशिक – भोंदुबाबाकडून झालेल्या फसवणुकीविरोधात नाशिकमधील एका महिलेने खंबीरपणे लढत न्याय मिळवला. तक्रारदार महिलेला मूळ रकमेसह दंड स्वरुपातील रक्कम आणि त्रासापोटी भरपाई देण्याचा आदेश नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भोंदुबाबाला दिला आहे.
मानहानीकारक वक्तव्य करणाऱ्यांना तुरुंगात धाडा; राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांचे डोंबिवलीत प्रतिपादन
डोंबिवली – देशातील प्रत्येक राष्ट्रपुरूष, सन्मानिय व्यक्ति, सामान्य यांचा मान राखलाच गेला पाहिजे. कोणीही कोणत्याही जाती, धर्माच्या व्यक्तिबद्दल कोणतेही पुरावे नसताना मानहानीकारक व्यक्त करत असेल तर अशा व्यक्तिची शासनाने गंभीर दखल घ्यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
टिटवाळा सांगोडा येथे वनराई नष्ट करून उभारलेले १३० बेकायदा जोते भुईसपाट
कल्याण – मांडा टिटवाळा भागातील बल्याणी टेकडी, उंभार्णी परिसरातील १५० हून अधिक बेकायदा चाळी भुईसपाट केल्यानंतर बुधवारी सकाळपासून अ प्रभागाच्या तोडकाम पथकान टिटवाळ्यातील सांगोडा रस्ता स्मशाभूमी भागात वनराई नष्ट करून बांधलेली १३० बेकायदा जोती जेसीबाच्या साहाय्याने भुईसपाट केली.
इंदापुरात ‘शहा’ कुटुंबाच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांचे पती मुकुंद शहा व इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा या शहा कुटुंबायांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे. मागील काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पासून शहा कुटुंब बाजूला गेले होते.लोकसभा निवडणुकीपुर्वी शहा कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला .
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी दुपारी साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
श्रीतुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धन, पुरातत्वकडून मंदिराला मिळतेय गतवैभव, भाविकांसह तुळजापूरकरांना अपेक्षित विकासकामे
धाराशिव : तीर्थक्षेत्र तुळजापूर स्थित श्रीतुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
युवकांची आत्महत्या अन् बारावीच्या विध्यार्थ्याचा गळफास
बुलढाणा : दोन आत्महत्याच्या घटनांनी नांदुरा आणि मलकापूर नगरी हादरली. नांदुरा येथे बारावीच्या विध्यार्थ्याने गळफास घेत तर मलकापूर येथे एका युवकाने रेल्वे गाडीसमोर स्वतःला झोकून देत आत्मघात केला.
हा तर महादजी शिंदे यांचा अपमान; एकनाथ शिंदेंचा पलटवार, संजय राऊतांनी केलेला राजकीय दलालीचा आरोप
उल्हासनगर: दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. कोणाला कसेही सत्कार करतात, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पुरस्कारावरून राऊत यांनी ही टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी हा महादजी शिंदे यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पिंपरी: बेकरीच्या व्यवसायात नुकसान झाल्याने दागिन्यांची चोरी
पिंपरी : बेकरीच्या व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
पोलीस अधिकार्यांची अशीही अडचण; बदली होऊन परतले पण जागाच शिल्लक नाही
वसई- विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आलेल्या वसई आणि भाईंदरच्या ४ पोलीस अधिकार्यांची पुन्हा आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांची बदली करण्यास उशीर झाल्याने आता कुणाल्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जागा शिल्लक राहिली नाही.
डोंबिवलीतील चोळे पाॅवर हाऊस ते गोविंदवाडी वळण रस्त्याच्या कामाला प्रारंभ
डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर मधील चोळे पाॅवर हाऊस (बंद पडलेले), खंबाळपाडा खाडी किनारा ते कल्याणमधील गोविंदवाडी या खाडी किनारा भागातील बाह्य वळण रस्ते कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरूवात केली आहे. टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा हेदुटणे या ३० किलोमीटर लांबीच्या रस्ते मार्गातील ठाकुर्लीतील चोळे पाॅवर हाऊस ते गोविंदवाडी हा महत्वाचा टप्पा आहे.
कर थकबाकीचा डोंगर, पायाभूत सुविधांवर परिणाम! महापालिकेच्या निवडणूक अर्थसंकल्पात काय असणार?
नागपूर : मालमत्ता करवसुली न होण्याचे खापर कायम लोकप्रतिनिधींवर फोडणाऱ्या प्रशासनाकडे मागील दोन वर्षांपासून महापालिकेची सर्व सूत्रे आहे. मात्र, त्यांनाही करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंंदा सादर होणाऱ्या प्रशासनाच्या तिसऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"संजय राऊतांनी शरद पवारांचा अपमान केला", एकनाथ शिंदेंचा पलटवार
संजय राऊतांनी शरद पवारांचा अपमान केला. राजकारणाच्या पलिकडे जाऊन नाती जपायची असतात. १० वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत राजकाऱणाच्या कक्षेत स्वतःला बांधून घेतलं नाही. म्हणून मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. जे आज आरोप करत आहेत, दोष देत आहेत, लोकांचा अपमान करत आहेत, त्या सर्वांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल. दलाल म्हणून टीका करणाऱ्यांनी साहित्यिकांचा अपमान केला - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अंदाजपत्रक महापालिकेचे बैठका मात्र विभागीय आयुक्त कार्यालयात ?
महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठका थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्याचा नवीन पायंडा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाडला आहे.
महापालिकेतील माजी सभागृह नेत्यासाठी कोट्यवधींचा ‘खास’ निधी !
महापालिकेतील माजी नेत्याच्या भागातील कामे करण्यासठी महापालिकेत प्रशासकराज असतानाही २ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
निर्माणाधीन इमारतींतील धुळीचा कांजूरमार्गवासीयांना त्रास
कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून काही बांधकाम व्यावसायिक नियमांना हरताळ फासून रात्रीही बांधकाम करीत आहेत. कांजूरमार्ग परिसरातील रहिवाशांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ बांधकाम बंद करण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् सोयऱ्यांचा मेळा ! कशासाठी? वाचा…
बुलढाणा : चारचाकी वाहनांनी आलेले 'पाहुणे', त्यांच्या स्वागतासाठी जमलेला सोयरे आणि परिसर वासीयांचा मेळा, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, फुलांचा सडा, आनंदाने न्हावून निघालेला परिसर… आटपट बुलढाणा नगरीतील तानाजी नगरमध्ये काल संध्याकाळी असाच माहोल होता.
अकोला : शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी, नकार दिल्यावर मानसिक छळ
अकोला : पातूर येथील शिक्षणसंस्थेमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाला असून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नकार दिल्यावर शिक्षिकेचा मानसिक छळ तसेच पीडितेच्या पती व मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान यांनी अनुदानित उर्दू शाळांना भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह
Marathi News Live Update Today : राज्यातील लेटेस्ट बातम्या जाणून घ्या