Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याउलट निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीसांना स्थान देत पक्षाने त्यांना महत्त्व दिल्याचं बोललं जात आहे. तसंच मोहित कंबोज यांनी सिंचना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केल्यामुळेही राजकारण तापलं आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

18:20 (IST) 18 Aug 2022
गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा अभियान; स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पिंपरी पालिकेचे पुढचे पाऊल

उघड्यावर पडणारा कचरा, कचऱ्याभोवती पसरलेली दुर्गंधी, भटकी जनावरे असे नेहमीचे चित्र बदलण्याचा निर्धार पिंपरी पालिकेच्या ‘स्वच्छाग्रह’ मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक अधिकाऱ्याने नवकल्पना मांडून शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरीत नेहरूनगर लगत गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा अभियान राबवण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:09 (IST) 18 Aug 2022
सांगली : ब्रम्हनाळ गावच्या हद्दीत नदीकाठी मृतावस्थेत आढळली १४ फुटी मगर

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावच्या हद्दीमध्ये नदीकाठी १४ फुटी मगर मृतावस्थेत आढळून आली. मादी जातीची ही मगर असून दोन मगरींच्या भांडणात तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:56 (IST) 18 Aug 2022
नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ.विपीन इटनकर यांची नियुक्ती

नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर.यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तत्काळ नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ.ईटनकर हे मुळचे वैदर्भीय ( जि.चंद्रपूर) आहेत. वाचा सविस्तर बातमी...

17:47 (IST) 18 Aug 2022
पुणे : कारागृहातून सुटताच कारागृह रक्षक महिलेला चोरट्याचा गंडा

कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सराइत चोरट्याने कारागृहातील महिला रक्षकाला दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील लिपिक बोलत असल्याच्या बतावणीने चोरट्याने महिला रक्षकाला बदलीची धमकी दिली आणि बदली न करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळले. या प्रकरणी चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली. वाचा सविस्तर बातमी...

17:47 (IST) 18 Aug 2022
विश्लेषण: राजीनामा की नाराजीनामा? कमी काम करणं हे कर्मचारी आणि कंपनीच्याही भल्याचं

अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि मॅनेजर सध्या दबक्या आवाजात एकत्र राजीनामा देण्यासंबंधी चर्चा करत आहेत. युकेमध्ये २०२१ मध्ये नोकरी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. याशिवाय अनेकांनी चांगला पगार आणि समाधान मिळवण्यासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं आहे.

पण जर तुम्ही कामावर असामाधानी आहात, पण नोकरी सोडण्याचा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध नाही किंवा इतर कोणते चांगले पर्याय उपलब्ध नसतील तर तुम्ही “quiet quitting” हा पर्याय तपासून पाहू शकता. कामाच्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याप्रमाणे किमान काम करण्याचा हा ट्रेंड टिकटॉकवर सुरु झाला आणि आता तरुणांमध्ये रुजला आहे.

सविस्तर बातमी

17:41 (IST) 18 Aug 2022
कल्याण-तळोजा मेट्रोचे काम तातडीने सुरू करा ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

कल्याण-शिळफाटा रस्ता, शिळफाटा-महापे, नवी मुंबई, पनवेल रस्त्यावरील वाढती वाहन संख्या आणि या भागातील वाढते उद्योग व्यवसाय विचारात घेऊन शिळफाटा रस्त्यावर येणारा वाहनांचा ताण आणि वाहतूक कोंडीचा विचार करुन कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाने तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सविस्तर वाचा…

17:30 (IST) 18 Aug 2022
मुंबई : गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याच्या आमिषाने तरुणीची पावणेदोन लाख रुपयांची फसवणूक

गुंतवणुकीवर १० ते १५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षांच्या तरुणीची सुमारे पावणेदोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीच्या तक्रारीवरून साकिनाका पोलिसांनी अनोळखी भामट्याविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करीत आहेत. वाचा सविस्तर बातमी...

17:27 (IST) 18 Aug 2022
कल्याण, बदलापूर, विक्रोळी परिसरात घरफोड्या करणारे चोरटे अटकेत ; आठ लाखाचा ऐवज जप्त

कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, विक्रोळी परिसरात घरफोड्या करणाऱ्या तीन जणांना येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोन्या, चांदीचा ऐवज असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सविस्तर वाचा…

17:16 (IST) 18 Aug 2022
मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर उद्या लसीकरण बंद

गोपाळकाल्या निमित्त उद्या (शुक्रवार, १९ ऑगस्ट) रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या करोना लसीकरण केंद्रांवर या दिवशी लसीकरण बंद राहणार आहे. शनिवार, २० ऑगस्टपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू राहणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

17:14 (IST) 18 Aug 2022
नरिमन पॉईंट – दिल्ली अवघ्या १२ तासांत प्रवास; मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण

केंद्र सरकारने दिल्ली – मुंबई दरम्यान नवीन द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून हा महामार्ग मुंबईतील नरिमन पॉईंटशीही जोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबईत वीजेवर धावणाऱ्या दुमजली वातानुकूलित बसला गुरुवारी हिरवा कंदिल दाखविण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी दिल्ली-मुंबई महामार्गाची माहिती दिली. वाचा सविस्तर बातमी...

16:51 (IST) 18 Aug 2022
चंद्रपूर: चार जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद; ब्रम्हपुरी तालुक्यात घातला होता धुमाकूळ

ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात धुमाकूळ घालत चार जणांचे बळी घेणाऱ्या टी १०३ एसएएम - १ या (नर) वाघाला गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्रात शेतशिवार आणि मानवी वस्तीत संचार करणाऱ्या या वाघाने  २८ जून, १६ व १७ ऑगस्ट रोजी तिघांचे बळी घेतले. सविस्तर वाचा…

16:21 (IST) 18 Aug 2022
परकीय चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक ; अहमदाबादमधून एकास अटक

परकीय चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची साडेचार लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी अहमदाबादमधून येरवडा पोलिसांनी एकास अटक केली. न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. शशांक दिनेशभाई पराडिया (वय २८, रा. अहमदाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

16:19 (IST) 18 Aug 2022
ड़ोंबिवली लोढा हेवन येथे उद्वाहनच्या खड्ड्यात पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

डोंबिवली जवळील २७ गावातील निळजे गाव हद्दीतील एक गृहसंकुलात उद्वाहनच्या खड्ड्यात पडून एक ५० वर्षाचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला उद्वाहनची देखभाल दुरुस्तीची सेवा देणाऱ्या कंपनीचे मालक यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मयत सुरक्षा रक्षकाच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनी विरुध्द तक्रार केली आहे.

सविस्तर वाचा…

16:12 (IST) 18 Aug 2022
मुंबई : वातानुकूलित सेवेमुळे सामान्य ‘लोकल’वर गंडांतर

ठाणे-दिवा पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कल्याण, कसारा, कर्जत येथील प्रवाशांना नवीन फेऱ्यांचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या पाच महिन्यांत अवघ्या दोनच सामान्य विनावातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र वातानुकूलित फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या सामान्य प्रवाशांचे काय असा सवाल प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:04 (IST) 18 Aug 2022
विधानसभेत अजित पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्याही दुप्पट मदत जाहीर केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना केली.

वाचा सविस्तर

15:50 (IST) 18 Aug 2022
नागपूर : अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या १६ आणि १७ ऑगस्टच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून १६ ऑगस्टची परीक्षा २७ ला तर १७ ऑगस्टची परीक्षा २८ ऑगस्टला होणार आहे. परीक्षांची वेळ पूर्वीप्रमाणेच राहिल,असे परीक्षा विभागाने सांगितले आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:31 (IST) 18 Aug 2022
नागपूर : ध्यानसाधना शिकवणारे शांततेचाही व्यवसाय करतात – शांता गोखलेंनी व्यक्त केली खंत

“आजच्या स्पर्धात्मक युगात सतत बोलणे, ताबडतोब बोलणे याला अधिक महत्त्व आले आहे. जो जास्त बोलतो त्याला आपण हुशार समजतो. या बोलण्याच्या स्पर्धेमुळे आपण स्वत:शी संवाद साधणे, शांत राहणे विसरत चाललो आहे. स्वत:ला शोधणे थांबल्याने आज ध्यानसाधणा शिकवणारे मोठमोठे गुरू तयार झाले असून ते शांततेचाही व्यवसाय करीत आहेत.”, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या शांता गोखले यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर बातमी...

15:01 (IST) 18 Aug 2022
प्रभातफेरी पडली महागात ; भल्या पहाटे सोनसाखळी पळवली

बदलापूर शहरात आता सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या दाम्पत्याची ७० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी ओढल्याची घटना घडली आहे. सविस्तर वाचा…

14:38 (IST) 18 Aug 2022
उंबार्ली टेकडीवर १ हजार देशी झाडांची लागवड ; पर्यावरण प्रेमींच्या पुढाकाराने वृक्षारोपण

डोंबिवली शहराला लाभलेली मोठी वनसंपदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली टेकडीवर मागील दोन महिन्याच्या कालावधीत सुमारे १ हजार देशी प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले आहे. शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

14:34 (IST) 18 Aug 2022
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; एकास अटक

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत येरवडा पोलिसांनी एकास अटक केली आहे. साहील सत्यवान आल्हाट (वय २२, रा. गांधीनगर, येरवडा) याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:23 (IST) 18 Aug 2022
पिंपरी : अत्रे रंगमंदिर खासगी पद्धतीने चालवण्यासाठी देण्याचा निर्णय

वारेमाप खर्च आणि किरकोळ उत्पन्न, अशी परिस्थिती असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहे चालवताना महापालिकेची दमछाक होत असल्याने टप्प्याटप्प्याने नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर खासगी संस्थेला सशर्त चालवण्यासाठी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नाट्यगृह संबंधित संस्थेकडे दिले जाणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:18 (IST) 18 Aug 2022
डोंबिवली, २७ गाव खड्डे भरणीची कामे अंतिम टप्प्यात ; आठवड्यापासून दिवसा, रात्री ते पहाटेपर्यंत खड्डे भरणीची कामे

नव्या उमेदीने डोंबिवली विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार घेतल्या दिवसा पासून पालिका बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांच्या अभियंता पथकाने डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि २७ गाव भागातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे बहुतांशी पूर्ण केली आहेत. सविस्तर वाचा…

14:08 (IST) 18 Aug 2022
बदलापूर : …अन् महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली आजीबाईंची स्वाक्षरी; ‘गुलाबी ब्रिगेड’ अशी बिरुदावली देखील दिली

वयाच्या साठीनंतर किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून शाळेची पायरी चढणाऱ्या मुरबाड तालुक्यातील आजीबाईंच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थीनींना नुकतेच बॉलिवुडच्या महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले होते. ज्ञान मिळवण्याचा निश्चय साठीनंतर पूर्ण करणाऱ्या या आजीबाईंची स्वाक्षरी अमिताभ बच्चन यांनी आपल्या डायरीत घेतली. गुलाबी ब्रिगेड अशी बिरुदावली बच्चन यांनी यावेळी या आजीबाईंना दिली. वाचा सविस्तर बातमी...

14:07 (IST) 18 Aug 2022
अकोलेकर पोलीस अधिकाऱ्याची हरियाणात प्रभावी कामगिरी ; गुन्हेगारी, तस्करीवर नियंत्रणामुळे श्रीकांत जाधवांचा सन्मान

मूळ अकोलेकर असलेले वरिष्ठ अधिकारी श्रीकांत जाधव यांनी हरियाणा पोलीस दलात प्रभावी कामगिरी केली आहे. गुन्हेगारी, तस्करी रोखण्यासह, व्यसनमुक्ती व सामाजिक कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी स्व.राम जाधव यांचे श्रीकांत हे सुपुत्र आहेत. सविस्तर वाचा…

13:53 (IST) 18 Aug 2022
गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News; शिवसेनेच्या प्रश्नानंतर शिंदे सरकारची मुंबई-गोवा हायवेसंर्भात महत्त्वाची घोषणा

यंदा गणेशोत्सवनिमित्त रस्तेमार्गे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर असतानाच या महामार्गासंदर्भात आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

13:53 (IST) 18 Aug 2022
' ती' मॅकेनिकच्या प्रेमात पडली आणि दोघांनी घर सोडले

गॅरेजवर काम करणाऱ्या मॅकेनिक युवकाने वस्तीत राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याच्या उद्देशाने तिला घरातून पळवून नेले. परंतु, पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले. पोलिसांनी आरोपीला अटक केली तर मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. सविस्तर वाचा…

13:51 (IST) 18 Aug 2022
विधानसभेत शिंदे सरकारवर नामुष्की! पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची वेळ

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारवर उत्तर नसल्याने पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की ओढवली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचारला होता. पण याची उत्तरं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. सोमवारी या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे.

सविस्तर बातमी

13:39 (IST) 18 Aug 2022
पुणे : १०० किलो वॅाट वीज निर्मितीसाठी निविदा; ‘एनजीटी’च्या आदेशानुसार महापालिकेची कार्यवाही

उरूळी देवाची येथील कचरा भूमीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार असून छतावर १०० किलो वॅाट ऊर्जानिर्मिती करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या माध्यमातून निर्माण होणारी वीज पथदिवे आणि अन्य कामांसाठी वापरली जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानुसार महापालिकेकडून ही कार्यवाही करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:29 (IST) 18 Aug 2022
शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात १ लाख ९३ हजार वीज थकबाकीदार ;  केवळ १ हजार ७०० वीज थकबाकीदारांनी अभय योजनेत भरली थकीत रक्कम ;  ३१ ऑगस्टपर्यंतच अभय योजनेची मुदत

शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात १ लाख ९३ हजार कायमस्वरूपी खंडित (पीडी) वीज मीटरचे थकबाकीदार असून त्यापैकी केवळ १ हजार ७०० थकबाकीदारांनी विलासराव देशमुख अभय योजनेत थकीत रक्कम भरल्याची बाब समोर आली आहे. उर्वरित थकबाकीदारांनी अद्याप थकीत रक्कम भरलेली नसून या थकीत रक्कमेची वसूली करण्यावर टोरंट कंपनीने भर देण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा…

13:25 (IST) 18 Aug 2022
मेधा सोमय्या यांची मानहानीची तक्रार, आरोप मान्य करण्यास संजय राऊत यांचा नकार

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीचा आरोप आपल्याला मान्य नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिवडी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे राऊत यांच्यावर याप्रकरणी आता खटला चालवला जाईल.

वाचा सविस्तर...

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यावेळी जाहीर करणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जाहीर आदेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिला होता. पण, पक्षाच्या निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान देऊन पक्षाने त्यांचे महत्त्व अधोरेखित केलं असल्याचं मानलं जात आहे. तसंच भविष्यात फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, हा संदेश पक्षाने दिला आहे.

Story img Loader