Maharashtra Political Crisis News : राज्यात एकीकडे मुसळधार पावसाने विविध ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. काही ठिकाणी नागरिकांना स्थलांतरीत व्हावं लागलंय. विरोधी पक्षांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील राजकारणालाही वेग आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गंभीर आरोप केलेत. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसही आक्रमक झाल्याचं दिसत आहे. वाचा राज्यातील प्रत्येक प्रत्येक घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा.
Maharashtra Breaking News Updates : पाऊस, शेतीचं नुकसान, राजकीय घडामोडी व आंदोलन अशा राज्यातील प्रत्येक प्रत्येक घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांच्या बंडानंतर आता शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. हा लढा आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली.माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. वाचा सविस्तर
एस.टी. महामंडळाने सहा वर्षांपूर्वी राज्यातील १३ शहरांमध्ये विमानतळाच्या धर्तीवर बस तळ (बस पोर्ट) उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाची मुहूर्तमेढ पनवेलमध्ये रोवण्यात येणार होती. मात्र अद्याप पनवेलमध्ये बस तळाची एकही वीट उभी राहू शकलेली नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी पालिका, पोलीस, महावितरण विभागांसह गणेश मंडळ प्रतिनिधींची बैठक घेतली असून त्यापाठोपाठ आयुक्त आज, बुधवारी शहरातील गणेश विसर्जन घाटांचा पाहणी दौरा करणार आहेत.
मुंबईमधील आरेच्या जंगलातील ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कारशेडच्या संपूर्ण कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी स्वीकारली. लवकरच या याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दिल्लीतील ॲड. रिषव रंजन यांनी ही याचिका केली आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. ३१ महिने जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना विदर्भाचा दौरा करता आलं नाही. अजित पवार मंत्रीपद गेल्यावर दौरा करत आहेत. विदर्भात त्यांचं स्वागत आहे, पण त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जसा न्याय दिला, तसाच न्याय विदर्भातील शेतकऱ्यांना दिला पाहिजे, अशी टीका भाजपा प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी केली.
भारत आणि चीन सीमेवर भारतीय वायुदल डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. चीनचे युद्ध विमान आपल्या वायु क्षेत्राचे उल्लंघन करीत नाही. केवळ भारताला खिजवण्यासाठी म्हणून कधी कधी सीमा रेषेच्या अगदी जवळ येत असतात, असे प्रतिपादन अनुरक्षण कमानाचे वरिष्ठ वायू आणि कर्मचारी प्रशासकीय अधिकारी एअर वाईस मार्शल एम.व्ही. रामाराव यांनी केले.
शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या सडक सख्याहरींना जाब विचारणाऱ्या काकाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या जनहित याचिकेवर १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला वावण्यासाठी गेलेल्या वनरक्षकवरच बिबट्याने हल्ला केला.मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ४५ वर ही घटना घडली.जंगलालगतचे राष्ट्रीय महामार्ग आणि त्यावरुन जाणारी भरधाव वाहने वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.
मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बरेच अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले आहेत. त्यामुळे येथे आगीची घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे. डिकलने या यंत्रांना दुरुस्त करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले.
जुलैच्या सुरुवातीच्या १५-२० दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून तलावांच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पाणीसाठा ८८ टक्क्यावरच आहे. त्यात वाढ झालेली नाही.
राज्यात झालेल्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथीनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुधवारी वाढदिवस साजरा केला गेला. अंबरनाथ, बदलापूर शहरात ऐरवी मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या जाणाऱ्या या दिवशी शुकशुकाट पहायला मिळाला. दोन्ही शहरातील बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे यंदा जाहीर फलकबाजीही दिसली नाही.
डोंबिवली मागील १५ वर्षापूर्वीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदे उपभोगून नेते पदापर्यंत पोहण्यास पात्र डोंबिवली, कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिकांना शिवसेनेने उशिरा का होईना मानाची पदे देण्यास सुरुवात केल्याने शिवसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
करोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता मुंबईतील सर्व जम्बो करोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र केवळ मरोळ येथील सेव्हन हिल्स आणि चुनाभट्टीजवळील के. जे. सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार आहेत.
लाचप्रकरणी तक्रार केल्यामुळे कथित अमलीपदार्थ प्रकरणात गोवल्याचा आरोप चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक यांच्यावर याचिकेद्वारे करण्यात आला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हा राज्यातील १३ कोटी जनतेचा अपमान असून सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ आणि सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोणी पालकमंत्री देता का, अशी विचारणाही या वेळी करण्यात आली.
डोंबिवलीतील एका हरहुन्नरी तरुणाने १५० दिवस दररोज २१ किलोमीटर धावून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा निर्धार केला आहे. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी हा तरुण दररोज कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात २१ किलोमीटर न थांबता अडीच तास सकाळच्या वेळेत धावत आहे.
गोवंडी रेल्वे स्थानकात डाउन मार्गावरील रुळाला बुधवारी सकाळी ७.५० च्या सुमारास तडा गेला. त्यामुळे वाशीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य तसेच देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांना दीर्घयुष्य लाभावे अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे. मात्र शुभेच्छा देताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख ऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. एकीकडे शिंदेंच्या या ट्वीटची चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा सविस्तर
“मुंबई शहरातील रस्ते आणि खड्ड्यांचा प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न सरकारच्या नियोजन, दूरदृष्टी आणि विचाराच्या अभावामुळे सोडवला गेला नाही. गेल्या २४ वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने २१००० कोटींहून अधिक खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या छोट्या निविदा काढण्यापेक्षा पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहरासाठी प्रत्येकी एक, फक्त ३ निविदा काढण्याची मुंबई महापालिकेला सूचना द्या,” अशी मागणी भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.
Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे असा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुकलं आहे. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. पक्षातील बंडखोरी आणि अनपेक्षित सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मुंबईचा घात होऊ शकतो, हे त्यांचं जुन स्वप्न आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी युती झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मी वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. त्या अश्रूंचं मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याती जनतेला केलं आहे. इतकंच नाही तर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मुंबईचा घात होऊ शकतो, हे त्यांचं जुन स्वप्न आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी युती झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात तातडीने जाणाऱ्या अजित पवारांनी विदर्भात येण्यास उशीर केला अशी टीका भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. अजित पवार पूरग्रस्त तसंच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी ही टीका केली. अनिल बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’मधील मुलाखतीवरुन देखील टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यात सध्या खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झालं असून यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून बंडखोरांवर जोरदार टीका केली जात आहे. बंडखोर आमदारांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. हा संघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै रोजी तर दुसरा भाग आज (२७ जुलै) रोजी प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर मनसेने खरमरीत टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे माझाच बॉल माझीच बॅट, मीच अपंयार आणि मीच बॉलर अशी आहे, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
बीडच्या परळीतील स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण देशभरात गाजलं होतं. आता त्याच परळीत पुन्हा एकदा एका महिलेचा अवैध गर्भपात करण्यात आलाय. दुसरी मुलगी नको म्हणून हा गर्भपात करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणी परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात पती, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि एकाला अटक करण्यात आली.
पहिली मुलगी असल्याने दुसरीही मुलगी नको म्हणून सासरच्या मंडळीकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. सासरकडील दोघांनी एका डॉक्टरला हाताशी धरून विवाहितेचे गर्भलिंगनिदान केले. यात मुलगीच असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून बार्शीच्या एका डॉक्टराने हा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात आणि गर्भलिंगनिदान होत असल्याचं समोर आलं आहे.
नागपूर विभागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. नागपूर जिल्ह्यात २८ हजार हेक्टरसह नागपूर विभागात तब्बल २ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ३५० हेक्टरवरील शेतातील सुपीक जमीन पिकांसह पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतपिकांचे युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत आहेत. नागपूर विभागातील सर्व तहसील कार्यालयांतर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. येत्या ८ ते १० दिवसात पंचनाम्याची कामं पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर त्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बुधवारी (२७ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राऊतांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंडखोरांपासून देशातील दडपशाहीपर्यंत अनेक प्रश्न विचारले. तसेच तुमच्याकडे दडपशाहीविरोधात लढण्याची इच्छाशक्ती आहे का? असाही सवाल ठाकरेंना केला. यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पाऊस, शेतीचं नुकसान, राजकीय घडामोडी व आंदोलन अशा राज्यातील प्रत्येक प्रत्येक घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…