Mumbai Pune Updates Today, 30 September 2024 : राज्यात नुकताच धर्मवीर-२ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावरून आता राजकारणदेखील तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करत होते, असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काल नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. या टीकेला आज शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील इतरही घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 30 September 2024 : अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज उदगीरमध्ये

10:47 (IST) 30 Sep 2024
धक्कादायक! सायबर चोरट्यांनी केली एवढ्या कोटींची फसवणूक, कुठे घडला प्रकार?

पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा पैसे देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीच्या घटना समोर येत असून पाच जणांची तब्बल एक कोटी ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली.

वाचा सविस्तर…

10:34 (IST) 30 Sep 2024
सिसिटीव्ही नाहीत मग परीक्षा केंद्र मिळणार नाही

वर्धा: शालेत विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्याची नोंद घेत महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही लावण्याचे आदेश दिले. पण आता एका मंडळाने अशी निगराणी नसणाऱ्या शाळेत परीक्षेचे केंद्रच नं देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

10:22 (IST) 30 Sep 2024

लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचे शिंदे सरकारवर टीकास्र

सध्या लाडकी बहिणी योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून ही योजना उद्याच्या निवडणुकीत मिंधे गटाला मत मिळवण्यासाठी आहे. मत विकत घेण्याची ही योजना आहे. त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे आणि प्रकल्पांचे पैसे या फक्त एका योजनेकडे वळविण्यात आले आहेत. त्यावरून तिघांमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना पत्र पाठवले आहेत. त्यात मुख्यमंत्री असा शब्द वापरण्यात आलेला नाही. त्यामुळे गडकरी म्हणत आहेत, ते बरोबर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

10:16 (IST) 30 Sep 2024
भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात ५६ लाखांची अफू जप्त

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात अफू विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.

वाचा सविस्तर…

10:01 (IST) 30 Sep 2024

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशावरून अंबादास दानवे यांचे शिंदे सरकारवर टीकास्र

१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

09:58 (IST) 30 Sep 2024

आदिवासी आमदारांचे आजपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन

राज्याचे ‌विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्यातील सर्व आदिवासी आमदार आजपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करणार आहे. सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. आंदोलनात राज्यातील विविध आदिवासी संघटना सहभागी होणार आहेत. आदिवासी आरक्षणामधून धनगरांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

09:55 (IST) 30 Sep 2024

थोड्याच वेळात राज्यमंत्रिमंडळाच्या बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उदगीरमध्ये दाखल होणार आहे. यावेळी उदगीरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेदरम्यान महिलांसाठी विशेष मेळावाही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.