Maharashtra Politics LIVE Updates : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्याबाबतही आमदार किरण सामंत यांनी मोठा दावा केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य देखील केलं आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. याबरोबरच तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबाबत कौटुंबीक न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. तसेच पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह राजकीय व इतरही महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:43 (IST) 7 Feb 2025

“१०० टक्के आम्ही नऊ खासदार…”, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर ठाकरे गटाच्या खासदारांचं स्पष्टीकरण

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं विधान केलं होतं. तसेच मंत्री उदय सामंत हे देखील माध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठं भाष्य केलं होतं. ठाकरे गटाचे काही खासदार संपर्कात असल्याचे दावे शिंदे गटाकडून केले जात होते. मात्र, यानंतर यावर आता ठाकरे गटाच्या खसदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच “१०० टक्के आम्ही नऊ खासदार कुठेही जाणार नाहीत”, असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलं आहे.

12:22 (IST) 7 Feb 2025

दीदी आपल्यातून गेलेली नाही… पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना

पुणे : गायक आपले अस्तित्व जेव्हा कलेच्या क्षेत्रात विसर्जित करतो तेव्हा त्याची अभिवृत्ती जन्म घेत असते. गाणं हेच लता दीदीचं जगणं होतं. आजही ती गाण्याच्या रुपात जीवंत आहे. दीदी आपल्यातून गेलेली नाही. ती इथेच आहे.

वाचा सविस्तर…

12:21 (IST) 7 Feb 2025

विम्याच्या नावाखाली ९१ हजारांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : क्रेडीट कार्डवरील विमा नको असल्यास प्रोसेस करून ओटीपी नंबर सांगण्यास भाग पाडून त्याद्वारे एका तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर, येथे १० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत तब्बल दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

12:21 (IST) 7 Feb 2025

पुणे : सात नव्या पोलीस ठाण्याची हद्द निश्चिती

पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

वाचा सविस्तर…

12:20 (IST) 7 Feb 2025

गुन्हेगारांना ‘अपवित्र’ करण्यासाठी कटिबद्ध, अमितेश कुमार यांची भूमिका

पुणे : शहरात वाढत चाललेले वाहनांचे तोडफोडीचे प्रकार तसेच अन्य गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने गुन्हेगारांना ‘अपवित्र’ केले जाईल असे भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केली.

वाचा सविस्तर…

12:20 (IST) 7 Feb 2025

सोलापूरकर यांच्याविरोधातील तक्रार अर्जाबाबत कायदेशीर पडताळणी करूनच निर्णय

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांबाबत कायदेशीर पडताळणी करण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दिली.

वाचा सविस्तर…

12:19 (IST) 7 Feb 2025

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधावर, नाशिक कृषी महोत्सवात ॲड. माणिक कोकाटे यांचे आश्वासन

नाशिक : सेवेकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अण्णासाहेब मोरे हे हितगुज साधतात, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे, अशी ग्वाही कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी दिली.

वाचा सविस्तर…

12:18 (IST) 7 Feb 2025

लोखंड व त्यावरील लेपनाची झीज मोजणे होणार शक्य, आयआयटी मुंबईच्या संशोधकांचे संशोधन

मुंबई : कोणताही धातू गंजू नये यासाठ त्यावर संरक्षणात्मक लेपन (कोटिंग) लावण्यात येते. काही कालावधीनंतर हे लेपन नष्ट होऊन धातू गंजण्यास सुरुवात होते. मात्र ही बाब लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे धातूवरील संरक्षणात्मक लेपनाच्या झिजण्याचे प्रमाण मोजण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थान मुंबईच्या (आयआयटी मुंबई) संशोधकांनी नवीन तंत्र विकसित केले आहे.

वाचा सविस्तर…

12:17 (IST) 7 Feb 2025

नवीन तानसा जलवाहिनी कार्यान्वित, बाधित परिसरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने

मुंबई : पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कार्यवाही गुरुवारी पूर्ण झाली.

वाचा सविस्तर…

12:17 (IST) 7 Feb 2025

कर आकारणीनंतरही बांधकाम अवैधच; अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : झोपडपट्टी भागातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, करनिर्धारण व संकलन खात्याच्या वतीने अशा आस्थापनांवर कर आकारणी करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 7 Feb 2025

मालमत्ता हस्तांतरण ‘डीआरपी’कडून धारावीतील पालिकेच्या जागेवरील इमारतींसाठी नियम, जी उत्तर विभागाकडून परिपत्रक

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरील मक्ता, भाडेतत्त्वावरील मालमत्ता, रिक्त भूभाग (व्हीएलटी) आणि इतर सर्व मालमत्तेचे हस्तांतरण आता पालिकेऐवजी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून (डीआरपी) केले जाणार आहे.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 7 Feb 2025

मुंबई-बदलापूर अंतर ६० मिनिटांत, तीन किमीच्या बोगद्यासह चार अंतरबदल मार्गिकांच्या प्रवेश नियंत्रण मार्गाचा लवकरच आराखडा

मुंबई : मुंबई-बदलापूर अंतर केवळ ६० मिनिटांत, तर बदलापूर-नवी मुंबई अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करणे येत्या काही वर्षांत सहज शक्य होईल. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बदलापूर- हेदुटणे, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका असा प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर…

11:42 (IST) 7 Feb 2025

राहुल गांधी आज दुपारी पत्रकार परिषद घेणार; कोणत्या विषयांवर भाष्य करणार?

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी १२:३० वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह आदी महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी नेमकी कोणते मुद्दे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

11:40 (IST) 7 Feb 2025

एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला संगीताचा नजराणा, लोकनाथ – एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ गाणी पुन्हा प्रकाशझोतात

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जुन्या गाण्यांच्या ध्वनिचित्रफिती पुन: प्रकाशित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी ‘एकनाथ तो लोकनाथ’ हे नवे गाणेही प्रदर्शित होणार आहे.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 7 Feb 2025

अमेरिकेने पाठवलेल्या भारतीयांबाबत पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारणार का? संजय राऊतांचा सवाल

“भारतीयांना ज्या पद्धतीने अमेरिकेतून पाठवण्यात आलं. त्यांना बेड्या घातल्या होत्या. भारतीय भूमीवर उतरवलं, म्हणजे विमानातून भारतीय भूमीवर उतरवतानाही त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत. हे आपल्या कायद्याचे उल्लंघन आहे. अमेरिकेतील प्रशासनाने आमच्या अमृतसरमध्ये उतरून आमचा कायदा हातामध्ये घेतला. आमच्यासाठी ते गुन्हेगार नाहीत, त्यांच्यासाठी असतील. विमानातून उतरताना त्यांच्या बेड्या काढणं आवश्यक होतं, पण अमेरिकेच्या प्रशासनाने त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत. आता पंतप्रधान मोदी हे अमेरिकेत जात आहे. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदी याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

10:22 (IST) 7 Feb 2025

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? “राज्यात ऑपरेशन टायगर होणार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांना विचारलं असता ते म्हणाले, “चर्चा जोरात सुरु आहे आणि’ऑपरेशन टायगर’ होणार देखील आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सहा खासदारांचं मन ओळवण्यात आलं अशी चर्चा आहे असं विचारलं असता संजय राठोड म्हणाले, “आता आमचे सहकारी उदय सामंत हे देखील माध्यमांशी बोललेत. खऱ्या अर्थाने ठाकरे गटातील आमचे काही सहकारी आहेत ते आम्हाला सातत्याने बोलतात. आम्ही केलेला उठाव आणि त्यानंतर आलेलं यश हे सर्वांना पटलेलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ योग्य वेळी होईल”, असं मंत्री संजय राठोड यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

10:21 (IST) 7 Feb 2025

‘काही गोष्टी राखून ठेवल्यात योग्य वेळी…’, उदय सामंत यांचं सूचक विधान

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवायचं असेल तर ठाकरे गटाचेच लोक आमच्याकडे येत आहेत. मग त्यांना कदाचित गुवाहाटीत घेऊन जाऊ, पण आम्हाला गुवाहाटीला जाण्याची आवश्यकता नाही. सक्षम महाराष्ट्र कसा असतो हे गेल्या अडीच वर्षांत जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

'काही गोष्टी राखून ठेवल्यात योग्य वेळी सर्व सांगणार', उदय सामंत यांचं सूचक विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)