Marathi News Today : लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसने काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांचीही यादी समोर आली आहे. तर, काही मतदारसंघात अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत वादामुळे अधिकृतरित्या जागा वाटप होऊ शकलेले नाही. दरम्यान, आज ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे वंचितने महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे येत्या काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत राहते की त्यातून बाहेर पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News Updates 26 March 2024 : महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण कमी झाले असून, दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाले आहेत.
सांगली : मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावर असलेल्या वांडरे कॉर्नरवर बेकायदा मद्य वाहतूक करणारी रिक्षा पकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुमारे सव्वालाखाचे विदेशी मद्य जप्त केले. कर्नाटकातून बेकायदा विदेशी मद्य वाहतूक रिक्षातून केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री पाळत ठेवून मद्याचा साठा घेऊन येणारी रिक्षा अडवून झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे १ लाख १७ हजार ३८० रुपयाचे मद्य आढळून आले. या प्रकरणी रिक्षा जप्त करण्यात आली असून रिक्षाचालक कुमार कांबळे (वय ४३ रा. भारतनगर) याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींसह महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. वीरशैव लिंगायत समाजात आदराचे स्थान असलेल्या काशीच्या जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींचे त्यांनी सोलापुरात भेटून आशीर्वाद घेतले.
नाशिक : बागलाण तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील महेंद्र धोंडगे (४३, रा. खामलोन) हे शेतातील विहिरीतून पाण्याची मोटार काढण्यासाठी दोरी टाकून पाईपवरून खाली उतरत असताना मोटारीची दोरी तुटून तोल जावून ते विहिरीत पडले.
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश्य भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती, स्वत:च्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा लागणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे.
पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) नियतकालिक मूल्यांकनाअंतर्गत २ ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन २ ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ४ ते ६ एप्रिल दरम्यान होणार आहे.
पनवेल : करंजाडे वसाहतीमधील टाटा पॉवर हाऊस असलेल्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तेथे पोलीसही पोहचले. मात्र हाणामारी करणाऱ्यांपैकी काहींनी पोलिसांना धक्काबुक्की केली.
इन्स्टाग्रामला मृतदेहाची स्टोरी ठेवणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी समांतर तपास करत एकाला अटक केली आहे. आदित्य युवराज भांगरे वय- १८ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बुलढाणा : जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव येथील 'एमआयडीसी' मधील एका कारखान्याला आज, मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.
मुंबई : दहिसर ते मालाड असा मोठा भाग असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा रेल्वे वाहतूक हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षात पश्चिम उपनगरातील लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे.
पनवेल : तळोजा वसाहतीमध्ये उन्हाळ्यासोबत पाणी टंचाई सुद्धा सुरु झाली आहे. सध्या तळोजा वसाहतीमध्ये अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणी खरेदी केले जात आहे.
रंगपंचमीच्या दिवशी (सोमवारी) सायंकाळी सेक्टर ५ मधील भूखंड ५८ वरील माहिर आर्केड या इमारतीमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने इमारतीमधील इतर सदस्य व रखवालदाराला सोसायटीच्या टाकीत पाणी कमी असल्याने रंगपंचमीत पाणी वाया जात असल्याची तक्रार केली. मात्र याचा राग मनात आल्याने या तरुणीला काही सदस्यांनी मिळून धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. या तरुणीने तळोजा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केली आहे.
पनवेल : भारतीय हवाई दलाच्या शेवा गावाजवळील विमान विरोधी क्षेपणास्त्र केंद्रातील (अॅण्टी एअरक्राफ्ट मिशाईल स्टेशन) प्रतिबंधित परिसरातील तांत्रिक क्षेत्रात संशयितपणे फिरणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पहाटे न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
नागपूर : महायुतीमध्ये जागा वाटप करताना काही ठिकाणी एक पाऊल मागे घ्यावा लागतो. नाशिक मतदार संघातील कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले असून जो काही निर्णय होईल त्यानुसार सर्वाना काम करावे लागणार आहे. कारण महायुतीसमोर केवळ नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्याचे ध्येय ठरले आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने विकसित केलेली स्वयंचलित प्रक्रिया आता सर्वच सक्षम यंत्रणांना वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय पात्रता निश्चित होणार आहे. पूर्वीप्रमाणे सहा ते आठ महिन्यांचा कालावधी न लागता आता काही दिवसांत पात्रता यादी तयार होणार असल्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले. या प्रक्रियेचा वापर न करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यावर यापुढे कारवाई केली जाणार आहे.
नागपूर : महाराष्ट्रातील उत्तर-पश्चिमी घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील संशोधकांना यश आलेले आहे. सोबत निमास्पिस गिरी गटातील इतर नऊ प्रजातींचे नव्याने वर्णन करुन जुन्या संशोधन निबंधांमधील विसंगती दूर करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली : काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटप करताना पैशांचे निकष लावण्यात आले. असा गंभीर आरोप करून काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कंगना रणौत यांच्यावर काँग्रेसने टीका केल्यानंतर खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी कंगना रणौत यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तो अपमान एकट्या कंगना यांचा नाही तर देशभरातील महिलांचा अपमान आहे. ज्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी, प्रियंका गांधी करतात त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे निंदनीय आहे. जो महिलांचा सन्मान करत नाही त्याचा सन्मान देखील देशातील जनता करणार नाही - नवनीत राणा, खासदार
वसई: सोमवारी संध्याकाळी धुळवड साजरी करून झाल्यानंतर वसईच्या कळंब समुद्र किनारी अंघोळ करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. साई किरण चेनुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे.
मुंबई : निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात रुग्णालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम रुग्णालयातील आरोग्य सेवेवर होत आहे, ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सुरळीत राहावी यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका प्रशासन करत आहे.
ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. २६ ते २७ मार्च आणि ३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत रात्री ११.५५ पहाटे ४ यावेळेत हे वाहतुक बदल लागू असतील.
मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील अविअर कॉर्पोरेट पार्क या व्यावसायिक इमारतीला मंगळवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्या ४० ते ५० जणांची सुटका करण्यात आली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांनी अवैध मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा उगारला असून चामोर्शी तालुक्यातील जंगमपूर जंगल परिसरातून तब्बल २८ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. कारवाईची कुणकुण लागताच तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
अकोला : सोयाबीन, हरभरा यासह शेतमालाचे भाव घसरले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत नाफेडणेही अद्यापपर्यंत हरभऱ्याची नोंदणी सुरू केली नाही. परिणामी, हमीभावापेक्षाही कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
डोंबिवली : ग्राहकाने आमच्याकडे गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला २० टक्के परतावा दिला जाईल. अशा पद्धतीने गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत डोंबिवली, मुंबई परिसरातील गुंतवणूकदारांकडून डोंबिवलीतील दोन भामट्यांनी ४४ लाख रूपये जमा केले. गुंतवणूकदारांना मूळ रक्कम नाहीच, पण वाढीव व्याज न देता त्यांची फसवणूक केली आहे. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
उरण : अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे मांडला आहे. त्यांचा प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पवार आणि ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा असं आमचं मत आहे - नाना पटोले</p>
प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर राहतील - नाना पटोले
उरण : शासनाने कितीही लोकोपयोगी आरोग्य सुविधा जाहीर केल्या तरी सर्वसामान्य गरीब रुग्ण हे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचार घेण्यासाठी जातात. मात्र उरण तालुक्यातील एकमेव असलेल्या कोप्रोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येथील रुग्ण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.
Maharashtra News Updates 26 March 2024 : महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर