Marathi News Update : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे १०० दिवस राहिले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चेंना वेग आला असून काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तर राज ठाकरे यांच्याकडून महायुतीत सामील होण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीनेही जागावाटपाचा निर्णय जवळपास अंतिम केला असून २७ तारखेला निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले आहे. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी विरोधात गेल्याचे दिसत आहे. याही विषयावर मनोज जरांगे पुढे काय भूमिका मांडतात याकडे आपले लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra News Live 22 February 2024

19:41 (IST) 22 Feb 2024
कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे घरी बसले - श्रीकांत शिंदे

महाराष्ट्राच्या जनतेसाठी वेगवेगळे निर्णय या सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र जनतेसाठी काम करत आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सार्थ ठरवत आहेत. करोना सारख्या कठीण परिस्थितीत काही लोकांनी घरात बसून खोटे आश्वासन दिले. परंतु एकनाथ शिंदे तेव्हा मंत्री होते. त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट रुग्णालयात जाऊन नागरिकांची विचारपूस केली, अशी भावना खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

19:19 (IST) 22 Feb 2024
मध्य रेल्वे सोलापूर मंडलाचे विभाजन; दौंड-मनमाड मार्ग पुणे मंडलास जोडला

सोलापूर : मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभाजन करून दौंड ते मनमाडदरम्यान २७० किलोमीटर रेल्वेमार्गाचा क्षेत्राधिकार सोलापूर मंडलातून पुणे मंडलास जोडण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. येत्या १ एप्रिलपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. या निर्णयामुळे सोलापूर मंडलावर अन्याय झाल्याची भावना सोलापूरकरांमध्ये पसरली असताना त्यावर सोलापूरच्या दोन्ही भाजपच्या खासदारांनी मौन पाळले आहे.

सोलापूरच्या हक्काची मंजूर झालेली शिक्षण, वीज, पाणी, धर्मादाय आयुक्त आदी कार्यालये अन्यत्र जिल्ह्यांमध्ये पळविण्याची परंपरा सुरू असताना अलिकडे सोलापूरसाठी मंजूर झालेले श्रीअन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आल्याबाबतचा संभ्रम अद्यापि कायम असतानाच आता मध्य रेल्वे सोलापूर मंडलाचे दौंड ते मनमाडपर्यंतचे क्षेत्रही पळविण्यात आले आहे. दौंड ते मनमाडपर्यंत ४९० किलोमीटरपैकी २७० किलोमीटरपर्यंतचा क्षेत्राधिकार मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातून पुणे मंडलास स्थानांतरीत करण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. म्हणजे आता २२० किमीपर्यंतचा क्षेत्राधिकार सोलापूर मंडलाकडे सीमित राहणार आहे. या निर्णयामुळे सोलापूर रेल्वे मंडलातील मनुष्यबळासह रेल्वे स्थानके आणि अन्य मालमत्तांचे पुणे मंडलाकडे वर्ग होणार आहे.

मध्य रेल्वे सोलापूर विभाग देशातील उत्तर-दक्षिण भागाला जोडणारा विकासाचा रेल्वेमार्ग आहे. दौंड ते मनमाड (मनमाड वगळून) दरम्यान रेल्वेमार्गासह लातूर ते मिरज व्हाया कुर्डूवाडी व पंढरपूर, सोलापूर ते वाडी (कर्नाटक) असे एकूण १०४३.३३ किलोमीटर भौगोलिक लांबीचा सोलापूर रेल्वे विभाग सध्या अस्तित्वात आहे. या विभागात एकूण १०६ रेल्वे स्थानके आहेत. देशातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या शंभर रेल्वे स्थानकांमध्ये सोलापूर रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. या विभागातील कुर्डूवाडी, दौंड, वाडी, कलबुर्गी आदी स्थानके जंक्शन आहेत.

यापूर्वी सोलापूर विभागाचे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला होता. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी कलबुर्गीतून लोकसभेत प्रतिनिधित्व करताना मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभाजन करून स्वतंत्र कलबुर्गी विभाग उभारण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यात सोलापूरला खेटून असलेल्या होटगीपासून ते वाडीपर्यंतचा रेल्वेमार्ग सोलापूर विभागातून तोडण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु सोलापूरचे तत्कालीन खासदार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर विभागाचे विभाजन रोखले होते.

या पार्श्वभूमीवर आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यानंतर सोलापूर विभागातून दौंड ते मनमाड (मनमाड वगळून) दरम्यानचा २७० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्राधिकार पुणे मंडलास जोडण्यात येत आहे. या निर्णयाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. इकडे या निर्णयाबद्दल सोलापूरकरांमध्ये नाराजी वाढलीअसताना भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चुप्पी साधली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजींचे दर गुरूवारी मौन असल्यामुळे बोलू शकणार नाहीत, असे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगितले गेले.

19:17 (IST) 22 Feb 2024
सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटीची मान्यता

वाई: साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांचा एकात्मिक विकासा करिता सुमारे ३८१ कोटी रुपये पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली. श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटनाचा समावेश आहे.

मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

18:35 (IST) 22 Feb 2024
एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपामध्ये परतावे - सून रक्षा खडसे

भाजपाचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये परत यावे, अशी विनंती त्यांच्या सूनबाई आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.

18:18 (IST) 22 Feb 2024
पिंपरी : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन टोळ्यांवर ‘मोक्का’; १७ गुन्हेगार तडीपार

आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 22 Feb 2024
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करत लुटणाऱ्या दोघांना अटक

गळ्यातील सोनसाखळी खिशात ठेवा असे सांगत हातचलाखी करून साडेसात तोळ्याची सोनसाखळी लंपास केली होती.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 22 Feb 2024
नाशिक : ग्रामीण भागात लुटमार करणाऱ्या तीन जणांना पोलीस कोठडी

जिल्ह्यात लुटमार करणाऱ्या तसेच रस्त्याने जाणाऱ्यांचे भ्रमणध्वनी खेचणाऱ्या तीन जणांना बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:53 (IST) 22 Feb 2024
सोलापूर : मोटार खरेदी व्यवहारात फसवणूक; शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

मनीष काळजे व आकाश मुदगल यांनी मुनगापाटील यांना रक्कम न देता किंवा मोटार परत न करता दमदाटी आणि शिवीगाळ करून हुसकावून लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

17:38 (IST) 22 Feb 2024
नागपूर : ऑटोचालकाशी सलगी तरुणीला भोवली अन् नको ते घडले

नागपूर : भेटीच्या बहाण्याने ऑटोचालक एका १७ वर्षीय तरुणीला त्याच्या सदनिकेत घेऊन गेला. तेथे जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून परत आणून सोडले. तरुणीने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी ऑटोचालक अक्षय भैसारे नावाच्या आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.

सविस्तर वाचा...

17:37 (IST) 22 Feb 2024
शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

बुलढाणा : भाजप आणि मिंधे सरकारच्या राजवटीत गद्दारांना ५० खोक्यांचा हमीभाव मिळाला. मात्र, चोहीबाजूने संकटाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकऱ्यांना भाव नाही. त्यांना केंद्रातील मोदी तर राज्यातील मिंधे सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

सविस्तर वाचा...

17:36 (IST) 22 Feb 2024
भाजपच्या मतदारसंघात अजित पवारांची बांधणी, सतीश चव्हाणांना बळ देण्यावर भर

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर मतदारसंघ बांधणीच्या कामास लागलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना राजकीय बळ देण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

सविस्तर वाचा...

17:19 (IST) 22 Feb 2024
२९ गावे वसई विरार महापालिकेतच राहणार, उच्च न्यायालयाने सर्व याचिका केल्या बरखास्त

उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटला आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 22 Feb 2024
मुंबई : खारमध्ये २७ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिका खार (प.) परिसरातील पाली हिल जलाशयाच्या जुन्या मुख्य जलवाहिनीचे पुनर्वसन व सशक्तीकरणाचे काम हाती घेणार आहे. संबंधित जलाशयाचे काम २७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत करण्यात येणार आहे. यादरम्यान खार विभागातील काही परिसरांमध्ये १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

या कामादरम्यान खारमधील कांतवाडी, शेरली राजन, गझधर बंध आणि दांडपाडा, दिलीप कुमार झोन, कोल डोंगरी झोन, पाली माला झोन आणि युनियन पार्क झोन, खार आदी भागांत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच, वांद्रे (प.) येथील काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित परिसरांमधील पाणीपुरवठा ११ मार्चनंतर पूर्ववत होईल. जलाशयाच्या पुनर्वसन व सशक्तीकरणाच्या कामादरम्यान नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

16:33 (IST) 22 Feb 2024
“… तर मी राजकीय संन्यास घेईल ! “, मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले संजय राऊत यांना प्रतिआव्हान

नगरः महानंदा संस्थेची गोरेगाव येथील जमीन विक्रीबाबत शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत आपण राजकीय संन्यास घेऊ, असे प्रत्युत्तर महसूल तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहे. याबरोबरच संजय राऊत यांच्या विरोधात आपण अब्रुनुकसानीचा दावाही ठोकणार असल्याचे मंत्री विखे यांनी पत्रकारांना सांगितले.

सविस्तर वाचा...

16:19 (IST) 22 Feb 2024
कोल्हापूर : गोकुळने दूध खरेदी दर पूर्ववत करावेत; सीमावासीय शेतकरी, एकीकरण युवा समितीची मागणी

गोकुळने सीमाभागातील कमी केलेले दूध खरेदी दर पूर्ववत करावेत, अशी मागणी बेळगावातील दूध उत्पादक शेतकरी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 22 Feb 2024
उरण : मोरा सागरी पोलीस ठाण्याचे काम निधीअभावी अपूर्णच

उरण : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील सुरक्षेसाठी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्यातील उरणच्या मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम निधीअभावी पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे ८५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला इमारतीचा सांगाडा हा या परिसरातील सरपटणाऱ्या आणि मोकाट प्राण्यांचे घर बनले आहे.

वाचा सविस्तर...

16:13 (IST) 22 Feb 2024
उरण : नवघर उड्डाणपुलावर खड्डे, अंधारामुळे अपघातांचा धोका

उरण : नवघर उड्डाणपूल उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या पुलामुळे पूर्व व पश्चिम हे विभाग जोडले जातात. मात्र मागील अनेक महिन्यांपासून नवघर उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे पुलावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पुलावर अंधारही आहे.

वाचा सविस्तर...

16:11 (IST) 22 Feb 2024
महारेरा अध्यक्षांसह सर्वांनाच आतापर्यंत दुहेरी आर्थिक लाभ, यापुढे पेन्शन वगळून वेतन

महारेराच्या आस्थापनेवर प्रामुख्याने शासनातील तसेच महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना वेतन आणि निवृत्तीवेतन असा एकत्रित लाभ मिळत होता.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 22 Feb 2024
गोएंका शाळेसमोर पालकांचा नऊ तास ठिय्या

ठाणे : कापुरबावडी येथील सी. पी. गोएंका शाळेसमोर पालकांनी शाळा व्यवस्थापनाला बदलण्याची मागणी करत पालकांनी सुमारे नऊ तास ठिय्या मांडला. काही पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. अनेक पालक उपाशीपोटी आंदोलन करत होते. न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला होता. पालकांचे शिष्टमंडळ आणि शाळेच्या विश्वस्त मंडळाची दुपारी उशिरापर्यंत बैठक सुरू होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने आणखी तीन जणांना निलंबित केले.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 22 Feb 2024
मुंबई : शताब्दी रुग्णालयात दोन दिवसांपासून रक्त चाचण्या बंद, रुग्णांचे हाल

कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून रक्त चाचण्या करणे बंद केले आहे. परिणामी, रुग्णांना रक्त चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागत आहे.

सविस्तर वाचा...

15:51 (IST) 22 Feb 2024
पेव्हरब्लॉक बसवण्यापूर्वीच खड्डे, पदपथाच्या स्लॅबला मोठी छिद्रे; कोपरखैरणे सेक्टर १५-१६ मधील प्रकार

नवी मुंबई : नवी मुंबईत अनेक ठिकाणी मनपाची अनावश्यक काम सुरू असल्याची ओरड आता सामान्य बाब झाली आहे. मात्र अशी कामे करत असताना दर्जाही राखला जात नसल्याचे समोर आले आहे. कोपरखैरणे सेक्टर १५-१६ येथे काही महिन्यापूर्वी नव्याने पदपथ दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यापूर्वीच त्याला मोठमोठी छिद्र पडणे सुरु झाले आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी टाकण्यात आलेल्या स्लॅबचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.

वाचा सविस्तर...

15:51 (IST) 22 Feb 2024
प्रक्रियायुक्त पाणी वापरावर भर, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

नवी मुंबई : सिडकोतील ठरावीक उपनगरांना मोरबे धरणातून करावा लागणारा पाण्याचा पुरवठा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणारे अपुरे पाणी यामुळे शहरातील जल वितरण व्यवस्थेत सातत्याने निर्माण होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने यंदाच्या वर्षी प्रक्रियायुक्त पाण्याचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर...

15:44 (IST) 22 Feb 2024
केंद्र सरकारची उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी; राजू शेट्टी यांची टीका

कोल्हापूर – केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली वाढ ही तोकडी आहे. शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता यामध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 22 Feb 2024
विद्यार्थी विनयभंग प्रकरण : भाजपचे पदाधिकारी गोएंका शाळेत शिरताच पालकांचा विरोध

ठाणे : सी.पी. गोएंका शाळेत भाजपचे आमदार संजय केळकर हे त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांसह शाळेमध्ये शिरले. परंतु पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर काढा अशी मागणी पालकांच्या काही गटाने केली. त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर पडावे लागले. दुपारी उशिरापर्यंत पालकांचा शाळेबाहेरील ठिय्या कायम होता.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 22 Feb 2024
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 22 Feb 2024
धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे फार फरक पडणार नाही - पंकजा मुंडे

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली बहिण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा प्रचाराची सुरुवात केली आहे. यासाठी त्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे मतांमध्ये वाढ होईल का? असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, त्यांच्या येण्यामुळे मतांमध्ये फार फरक पडणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस आता आमच्याबरोबर असल्यामुळे त्याचे मतांमध्ये किती रुपांतर होते, हे नक्कीच कळेल.

15:33 (IST) 22 Feb 2024
पुणे : शिरूर लोकसभा लढण्यासाठी अजित पवारांचे विश्वासू विलास लांडे इच्छुक!

२०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐनवेळी अमोल कोल्हे यांना देण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

15:25 (IST) 22 Feb 2024
खासदार अनिल देसाई यांच्या निकटवर्तीया विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिनेश बोभाटे यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनलयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर...

15:17 (IST) 22 Feb 2024
भिशीचे आमिष जळगावातील १३ महिलांना पडले महागात

शहरातील १३ महिलांना भिशीचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांना फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:05 (IST) 22 Feb 2024
जोगेश्वरी सुप्रिमो क्लब प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी

जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर, तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपातून राज्याचे माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

Sanjay Raut on Pm Narendra Modi Richness

संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांच्या श्रीमंतीवर टीका. (Photo - Loksatta Graphics)

Story img Loader