Maharashtra News Today, 31October 2023: मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं घर जमावाने पेटवून दिल्यानंतर यासंदर्भात राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अनेक ठिकाणी आमदार, मंत्र्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण चालूच ठेवल्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
Maharashtra Political News in Marathi: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाभरातील जवळपास पावणे चारशे गावांमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
भाजपसह संवेदनशील पक्षांच्या कार्यालयांसमोरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोलापूर-पुणे लोहमार्गावर रेल्वे रोखली. यावेळी वाहनांचे टायर पेटवून लोहमार्गावर टाकण्यात आले होते.
आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय... पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात... कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार.. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात? एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का? - रोहित पवार
मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा, १ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण!
मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत हे मराठा समाजालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं गेलं. पण ते टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केलं. सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण गेलं असताना मुख्यमंत्री, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्ही आहात. तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, महिलांचा, माताभगिनींचा अपमान करणारे कोण होते हेही सकल मराठा समाजाला माहिती आहे. मराठा समाजाचं आरक्षण घालवण्यासाठी जबाबदार तुम्ही आहात. आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही समिती गठित केली आहे.इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही - एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली मराठा आंदोलनात राजकीय हस्तक्षेपाची शक्यता!
आज सकल मराठा समाज बांधवांनी नागपूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथे रास्ता रोको केला.
मराठा आरक्षण आंदोलन चिघळल्यामुळे अमरावती विभागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसगाड्या वाशीम आणि खामगावपर्यंतच चालवल्या जात असून खबरदारीचा उपाय म्हणून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या एकूण २४ बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
नाजूक अंगकाठी, सुंदर आणि तुकतुकीत कांती, काळेभोर रेखीव डोळे, चेहऱ्यावरचे निरागस पण तितकेच उत्सुक भाव असलेला प्राणी म्हणजे चितळ. चपळाई आणि प्रत्येक हालचालीतील डौल, नजाकत नजरबंदी करणारी असते. सविस्तर वाचा
मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असल्याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. तसेच, याप्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेत असल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अश्लाघ्य शेरेबाजी केल्याचा आरोप मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी केला.
वाघधरा येथे तीन मित्रांची निर्घृण हत्या करणारा आरोपी राजू बिरहा याला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फाशीची शिक्षा रद्द करत तीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज(३१ ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. इतके दिवस होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंशी बोलणं टाळत आहेत, अशी चर्चा सुरू होती. अशातच सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना फोन करून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली. दोघांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मुद्द्यावर २४ मिनिटे चर्चा झाली. यावर मनोज जरांगेंनी भाष्य केलं.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी (३१ ऑक्टोबर) महत्त्वाचा आदेश दिला. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर ३१ डिसेंबरआधी निर्णय घेण्यास सांगितले. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात उद्धव ठाकरेंनी देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं म्हटलं.
मुंबई : मुंबईत ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्राकडून व्यक्त होत होती. नवरात्रोत्सव आणि दसरा या सणासुदीच्या काळात घरखरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. त्याअनुषंगाने घरविक्रीत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या महिन्यात घरविक्री स्थिर राहिली आहे. ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला घरविक्रीतील मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,
सस्नेह जय महाराष्ट्र !
इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.
तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.
ह्यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश - बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.
आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेंव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.
भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे.
जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासनं कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मत मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या, आम्ही सत्तेवर येताच तात्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवलं कि, कोण तुम्ही? कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उध्दटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरं संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत. मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा.
तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू.. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत रहातात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक” असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू..
पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”..
शुभेच्छा आणि पुन्हा एकदा, जय महाराष्ट्र !
आपला
राज ठाकरे
मुंबई : मुंबईमधील काही विभागांमध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईतील पूर्व भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना तब्बल ४८ तास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, परेल, शिवडी या परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
पिंपरी : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय २३) आणि बिपलभ बिधन राणा (वय २४, दोघे रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
मंडळ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण व अंगावर वाहन टाकणाऱ्या तीन आरोपींना बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असल्याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. तसेच, याप्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेत असल्याचे स्पष्ट केले. शहरातील एकही भाग प्रदूषणविहरित नसल्याची टिप्पणीही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने केली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातही उग्र आंदोलन पेटण्याची चिन्हे आहे. त्या अगोदरच आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालय परिसरात एक ‘कार’ पेटली. सविस्तर वाचा…
नागपूर: शैक्षणिक उपक्रमांसाठी असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची नागपुरातील ६९८० चौ.मीटर जागा महामेट्रोला निःशुल्क हस्तांतरित करण्यात आली आहे.
नागपूर: मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यभर आंदोलने सुरू असताना आता मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीबाबत गंभीर बाब समोर आली आहे.
नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांत असलेल्या स्मशानभूमींची पुरेशी देखभाल होत नसल्याची ओरड सुरू असतानाच नेरूळ येथील एका स्मशानभूमीला रातोरात करण्यात आलेली रंगरंगोटी लक्ष वेधून घेत आहे. सविस्तर वाचा
खोपटे खाडीपूल व गव्हाण दिघोडे मार्गावरील जड कंटनेर वाहनांमुळे येथील नागरिकांना तासन्तासनाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या सातत्याने होणाऱ्या कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. सविस्तर वाचा
सिडको व जेएनपीटी यांच्यातील १३ सप्टेंबरच्या संयुक्त बैठकीत दसऱ्या पर्यंत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाची निश्चिती करून भूखंडावर नामफलक लावण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र या भूखंडावरील काम अपूर्ण आहे. सविस्तर वाचा
बेलापूर ते पेणधर या मार्गिकेवर नवी मुंबई मेट्रो रेल्वेचा प्रवास उदघाटनाअभावी सूरु न होऊ शकल्याने राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने सामान्य प्रवाशांसाठी लवकर उदघाटन करा अन्यथा आम्ही मेट्रोचे उदघाटन करु असा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
यवतमाळ: येथील किन्ही गावात सोमवारी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. व्ही-तारा ही कंपनी येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर तब्बल पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करून उद्योग उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यवतमाळ: येथील किन्ही गावात सोमवारी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. व्ही-तारा ही कंपनी येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर तब्बल पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करून उद्योग उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Maharashtra Political News in Marathi: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!